Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Pooja Sharma Assagao Demlition: पुढील सुनावणीपर्यंत तिला अटक न करण्याचा अंतरिम आदेश द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली.
रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड
Assagao House DemolitionDainik Gomantak

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घराची जागा पूजा शर्मा हिने खरेदी केली होती. हे घर पाडण्यासाठी तिने बाऊन्सर्स तसेच यंत्रणा तैनात केली होती. ती या घटनेमागील मुख्य सूत्रधार आहे. दोनवेळा समन्स बजावूनही ती चौकशीस उपस्थित राहिलेली नाही.

त्यामुळे तिला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी भूमिका क्राईम ब्रँचच्या एसआयटीने सत्र न्यायालयात घेतली. पोलिसांच्या उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी तिच्या वकिलांनी आज वेळ घेतल्याने अटकपूर्व जामिनावरील सुनावणी शुक्रवारी, ५ जुलैला ठेवली आहे.

पूजा शर्माच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी बाजू मांडली. एसआयटीने सादर केलेल्या उत्तराची माहिती काही मिनिटांपूर्वीच दिली आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी वेळ मिळावा. पुढील सुनावणीपर्यंत तिला अटक न करण्याचा अंतरिम आदेश द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. ज्या तऱ्हेने पोलिसांनी तिच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला आहे, त्यावरून तिची पोलिस कोठडी पोलिसांना हवी आहे.

त्यामुळे हा आदेश नसल्यास ते अटक करण्याची भीती तिला आहे. मात्र, सत्र न्यायालयाने त्याला नकार देत, अटकपूर्व अर्ज न्यायालयात प्रलंबित असणे म्हणजेच तिला संरक्षण मिळते, असे तोंडी निरीक्षण केले. मात्र कायद्यानुसार अटक न करण्याचा आदेश नसल्यास पोलिस केव्हाही अटक करू शकतात.

याप्रकरणी केलेल्या तपासात आगरवाडेकर यांचे घर पाडण्याचे कटकारस्थान रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजले होते. अर्शद ख्वाजा याने हे घर पाडण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानेच पूजा शर्माला ही जमीन मिळवून देण्यास मदत केली होती. एक-चौदाच्या उताऱ्यात पूजा हिचे नाव आहे.

मात्र, प्रदीप आगरवाडेकर कुटुंबीयांनी त्यांच्याकडे वीज व पाण्याचे कनेक्शनसाठी असलेला ना हरकत दाखला तसेच घरपट्टीची पावती चौकशीवेळी सादर केली आहे. या घराच्या मोडतोडप्रकरणी पूजा हिने संशयित अर्शद ख्वाजा याच्याशी संपर्क साधला होता का, याची चौकशी आवश्‍यक आहे. तिने केलेला गुन्हा गंभीर असून हे घर मोडण्यासाठी गुंड तैनात केले होते.

दिवसाढवळ्या आगरवाडेकर यांचे अर्धवट घर जेसीबीने व बाऊन्सर्सचा वापर करून पूजाच्या इशाऱ्यानुसार मोडल्याचा तक्रारदारांनी आरोप केला आहे. बाऊन्सर्सचा वापर करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे व शांतता भंग केली आहे. ही घटना गंभीर असून त्याच्या सविस्तर तपासकामासाठी तिची कोठडीतील चौकशी आवश्‍यक आहे.

रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड
Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

काहीजण रडारवर

बाऊन्सर्स तसेच जेसीबी ऑपरेटरला पैसे कोणी दिले, याचाही तपास करायचा आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या संशयित अर्शद ख्वाजा याला तिने हे घर पाडण्यासाठी तैनात केले होते, याचा शोध घ्यायचा आहे.

या प्रकरणातील आणखी काही संशयितांना अटक करायची आहे. यामधील बहुतेक संशयित हे गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेले आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, असा युक्तिवाद क्राईम ब्रँचने केला.

तपासात अनेक पैलू उघड

मुख्य सूत्रधार पूजा शर्मा हिच्यासह इतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासकामात आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे पूजा हिची पोलिस कोठडीतील चौकशी आवश्‍यक आहे.

पूजाने जमीन खरेदी केली होती, तर तिने कायदेशीर मार्गाने ती ताब्यात घेणे गरजेचे होते. त्यामुळे या घटनेची पूर्ण चौकशी करण्यासाठी न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असे क्राईम ब्रँचने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com