मर्मवेध : तिरस्कार...!

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा पुसण्याच्या निमित्ताने नक्की काय साध्य करायचे आहे? गेल्या शेकडो वर्षांच्या सहवासातून गोव्याची संकल्पना तयार झाली आहे. त्यातून तयार झालेल्या गोंयकारपणाला नवी दिशा देऊन गोव्यात नवा वसाहतवाद निर्माण करण्याचे हे दु:स्वप्न असल्याची टीका होत आहे. राजकीय ध्रुवीकरणाची ओढ त्यातून प्रकर्षाने जाणवली तर आश्चर्य वाटायला नको
Allow Christians To serve The Nation
Allow Christians To serve The NationDainik Gomantak

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अगदीच सध्या राष्ट्रप्रेमाचा पुळका आला आहे. पोर्तुगिजांच्या सर्व पाऊलखुणा पुसून टाकण्याचा पण त्यांनी केला आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी त्यांना जरी हे विचार स्फुरले तरी ते खात्रीने उत्स्फूर्त नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते नजीकच्या काळात या विषयावर अधिक तीव्रतेने बोलू लागले तर नवल नाही. परंतु पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा पुसून टाकणे आणि गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्र भावनेचे स्फुल्लिंग चेतवणे वेगळे.

पोर्तुगिजांची ४५० वर्षांची राजवट हा राज्याच्या इतिहासाचा भाग बनला आहे. तो पुसून टाकण्यासाठी सावंतांना घड्याळाचे काटे उलटे फिरविता येणार नाहीत. परंतु राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग पेटविणे त्यांच्या हातात जरूर आहे. किंबहुना त्यांच्याहूनही कठोर शब्दात गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक म्हणून ज्यांना मानले जाते, त्या त्रिस्ताव ब्रागांझा कुन्हा यांनी देशप्रेमाची ज्योत पेटविली आहे. त्यांचा राष्ट्रवाद प्रमोद सावंतांच्या भाजपला परवडणार आहे का, हा खरा प्रश्‍न आहे.

राष्ट्रवादाचा वन्ही चेतविणाऱ्या भाजपला स्वातंत्र्यवीर सावरकर परवडत नाहीत. कारण आजचे राजकारणी पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा संपविण्याची भाषा बोलतात, तेव्हा त्यांना द्वेषाचे राजकारण अपेक्षित असते. कुन्हा यांना हिंदू-ख्रिश्‍चनांच्या सौहार्दातून नवा गोवा अपेक्षित होता. तो भारतीयत्वाच्या तत्त्वाने जोडण्याचे काम त्यांनी चालविले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अलीकडे पोर्तुगिजांच्या पाऊलखुणांबद्दल वारंवार वक्तव्य केले आहे. पोर्तुगिजांनी मोडून टाकलेली मंदिरे पुन्हा उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. नार्वे येथे सप्तकोटेश्‍वराचे देऊळ शिवाजी महाराजांनी उभारले होते. त्याचप्रकारे गोव्यातील नेस्तनाबूद मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

परंतु सप्तकोटेश्‍वराच्या देवळाची नवीन मुहूर्तमेढ मनोहर पर्रीकर सरकारच्या काळात रोवण्यात आली होती, त्यात तथ्य आहे. सावंतांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातही पोर्तुगिजांनी नेस्तनाबूद केलेल्या गोव्याच्या श्रीमंत संस्कृतीला पुनर्जीवित करण्याचाही संकल्प सोडला होता. अर्थसंकल्पात मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

परंतु मंदिरांचे पुनर्जीवन करण्याचे ठरविले तर राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्पही पुरणार नाही. त्यासाठी अर्थव्यवस्थेला नवी दिशा द्यावी लागेल. दुर्दैवाने सरकारच्या अर्थकारणातील कल्पना कृतीत येत नाहीत. कला-संस्कृती व शिक्षण या क्षेत्रातही बजबजपुरी माजली आहे.

मुख्यमंत्री सावंत यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदू मतांचे ध्रुवीकरण करावयाचे आहे, हे लपून राहत नाही. भाजप सरकारविरोधात वेगवेगळ्या कारणांमुळे अल्पसंख्याक घटक दूर जाऊ लागला आहे. त्यामुळे राज्यात हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजप हरप्रकारे प्रयत्न करेल, यात शंका नाही. त्याचाच एक भाग म्हणून पोर्तुगिजांनी मोडलेली देवळे पुन्हा उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असावा.

परंतु पोर्तुगिजांच्या ४५० वर्षांच्या काळात असंख्य देवस्थाने तोडून टाकण्यात आली, त्यासंदर्भात वस्तुनिष्ठ संशोधन झालेले नाही. काही देवळांचे इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळांमध्ये रूपांतर करण्यात आले. परंतु सर्वच ठिकाणी असे घडले नाही. तोडलेल्या देवळांचे दगड व इतर सामग्री वापरून जवळपास व अन्यत्र चर्चेस उभारण्यात आल्या. अनेक ठिकाणी अशी मंदिरे भग्नावस्थेत सापडतात. या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही, असे नाही. परंतु त्या कामी हिंदू परंपरा, समज आणि रूढी आड आल्या.

हिंदू धार्मिक सणांचा बीमोड झाल्यानंतर तेथे हिंदूंना पूज्य असलेल्या प्रतिकांचा बळी देऊन त्याचे पावित्र्य भग्न करण्याचाही प्रयत्न झालेला असू शकतो. त्याकाळात हिंदू समाज रूढी-परंपरा आणि अनिष्ट संस्कारांनी एवढा जडत्व पावलेला होता की, विहिरीत मांस टाकले किंवा घरावर शिजलेल्या भाताचा गोळा करून टाकला तरी ते घराणे बाटल्याचे मानले जात असे. वास्तविक त्या काळातील प्रथा आणि परंपरांचे अधिक संशोधन झाले तर हिंदू समाजाने त्यावेळी जे काही नियम लावून घेतले होते, त्या नियमांच्या कोष्टकात तो समाज अडकला होता. याच प्रथा आणि समजुतींचा वापर करून ख्रिस्ती मिशनरींनी लोकांना बाटवले, त्यांच्यावर धर्मच्छल लादला व देवळे भग्न केली.

हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांमुळेच हा समाज एकत्र येऊन लढू शकला नाही. राष्ट्र ज्या तत्त्वावर उभे राहायला हवे, त्यात सामंजस्य, करुणा, बंधुत्व यांचा अभाव होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत बंधुत्वाची कल्पना पुढे आली व राष्ट्र उभारणीत तिला महत्त्व प्राप्त झाले. बंधुत्व तत्त्वाचे कट्टर पुरस्कर्ते बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजात आपल्याच देशातील बांधवांकडून अन्याय, अत्याचार होत असल्याबद्दल व्यथित होत. त्यातून पददलितांवर अस्पृश्यता लादण्यात आली होती. त्यांनी लिहिले आहे ः हिंदू समाजातील करुणा व बंधुभावाच्या अभावातून जातीय अभिमान बळावला व परकीय शक्ती भारतावर वसाहतवाद लादू शकल्या.

हिंदू देवळे आणि धार्मिक प्रतिके उच्चवर्गीय समाजाने आपल्या हातात ठेवली. भूमिपुत्रांवर अन्याय केला. त्यांची धार्मिक प्रतिके आणि परंपरा नष्ट केल्या. त्यामुळे पुरातन काळातील हिंदू पद्धती आणि श्रद्धास्थानांचा इतिहास हुडकून न काढणे हेच इष्ट. हा समग्र इतिहास लोकांपुढे आल्यास हिंदू समाजाची अनेक शकले पडतील.

गोव्यात टी. बी. कुन्हा यांनी सांगितलेला राष्ट्रवादाचा इतिहास मात्र शिकविला गेला पाहिजे. हा इतिहास तरुणांसमोर येण्यासाठी शिक्षणाचाही वापर झाला पाहिजे. देवळांचे पुनर्निर्माण करून किंवा आज जेथे ख्रिस्ती चर्चेस इतर धर्मस्थळे उभी आहेत, त्यांच्यावर धावा बोलून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग पेटवण्याऐवजी कुन्हा यांनी सांगितलेल्या वैचारिक, राष्ट्रवादाची तत्त्वे ः जी धर्मनिरपेक्षतेने बांधली आहेत व भारतीय घटनात्मक मूल्यांची पाठराखण करतात-शिक्षणक्षेत्रातून तरुण पिढींपर्यंत जाणे उचित ठरेल.

गोव्याच्या राष्ट्रीयत्वाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्यांनी आपला जाज्वल्य इतिहास गोवेकरांनी समजून घ्यावा, यासाठी चिंतन, मनन आणि लेखन केले. पोर्तुगिजांच्या वसाहतवादाविरुद्ध जनमत तयार करण्यात कुन्हा यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली.

आपल्याच भूमीत निस्तेज बनलेल्या, स्वत्व हरवून बसलेल्या तसेच पोर्तुगिजांना आपली संस्कृती मानणाऱ्या गोव्याच्या ख्रिस्ती समाजाविरोधात कुन्हा यांनी लेखणीचे फटके लगावले. त्यांना येथे राष्ट्रीयत्वाचा झालेला ऱ्हास पुनर्स्थापित करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी प्रभावी चर्च व प्रस्थापितांची पर्वा केली नाही.

पोर्तुगीज भाषेची तसेच संस्कृतीची सक्ती गोवेकरांना राष्ट्रवादापासून दूर नेत आहे आणि ते स्वत्व हरवून बसले आहेत असे त्यांनी सतत लिहिले. जे लेखन अजूनही ख्रिस्ती समाजाच्या पचनी पडलेले नाही.

त्यावेळच्या अनेक ख्रिस्ती बुद्धिवाद्यांनी हिंदू विचारवंतांपेक्षा अधिक तीव्रतेने आणि जळजळीतपणे पोर्तुगीज सरंजामशाहीविरोधात लिहिणे कमी केलेले नाही. गोवेकरांना राष्ट्रीय प्रवाहात घेऊन येण्यासाठी अनेकांनी पाश्‍चात्त्य चालीरीती व संस्कृतीविरुद्ध जोरदार हल्ला चढविला आहे. किंबहुना राष्ट्रीयत्व व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे अनेक लेखक व स्वातंत्र्यसैनिकांनी लिहिले.

इतिहासाची जाण नसल्याने गोव्यातील ख्रिस्ती समाज म्हणजे पोर्तुगीजधार्जिणा, असे एक चित्र नेहमी रंगविले जाते. परंतु पहिल्या पिढीतील अनेक स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ख्रिस्ती बांधव होते, अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे लेखन पत्रकार वाल्मिकी फालेरो यांनी सतत केले. त्यांचा स्तंभ आम्ही ‘गोमन्तक’मध्ये वर्षभर चालविला.

आम्ही या स्तंभात टी. बी. कुन्हा यांच्या ‘गोमन्तकीय राष्ट्रवादाचा ऱ्हास’ या पुस्तकाचा उल्लेख प्रकर्षाने करावयाच्या मागेही हीच भावना आहे. कारण गोमंतकीयांत राष्ट्रीयत्वाची भावना रुजविणे व विदेशी सत्तेच्या पायावर घालून घेण्याची निलाजरी प्रवृत्ती मिरविण्यामध्ये केवळ ख्रिस्ती नव्हते. परंतु कुन्हा यांनी आपल्या ग्रंथांत ख्रिस्ती समाजाच्या या प्रवृत्तीवर अत्यंत टोकदारपणे लिहिले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा त्यांनी जाज्वल्य पुरस्कार केला. त्यांनी महात्मा गांधींचा असहकार लढा व स्वातंत्र्यांच्या विचारांची संपूर्ण युरोपला ओळख करून दिली. गोव्याच्या वसाहतवादाच्या गुलामगिरीविरुद्ध ताशेरे ओढले व मुक्तीलढ्याला तेज प्राप्त करून दिले.

जालियनवाला बाग घडले तेव्हा देशाबाहेर ही बातमी जाणार नाही या गोष्टीची काळजी घेणाऱ्या ब्रिटिशांना धक्का देताना कुन्हा यांनी या हत्याकांडांसंदर्भात फ्रान्समध्ये लेखन करून ब्रिटिश राजसत्तेची लक्तरे वेशीवर टांगली.

‘भारताचे फ्रान्समधील पहिले राष्ट्रप्रेमी राजदूत’, असे त्यांचे सार्थ वर्णन पण्णीकर यांनी केले आहे. कुन्हा यांनी विलक्षण ताकदीने गांधींवर चरित्रात्मक लेखन केले, शिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अनेक पैलू जगासमोर आणले. त्यामुळे विदेशात भारताप्रति आदराची भावना निर्माण झाली, असे पण्णीकर यांनी लिहून ठेवले आहे.

टी. बी. कुन्हा यांनी पोर्तुगीज भाषेविरोधात लिहिले नाही, परंतु कोकणीचा मात्र जरूर पुरस्कार केला. १६६४ पासून बंदी लागू केलेल्या कोकणी भाषेला पुढे २०० वर्षे बंदिवासात पडावे लागले. त्या काळात उच्चवर्णीय ख्रिश्‍चन (अनेक हिंदूही) स्वतःला पोर्तुगीज म्हणून घेऊ लागला होता. पोर्तुगीज संस्कृती स्वतःची समजून बसला होता. या समाजाने स्थानिक भाषा, संस्कृती व परंपरा यापासून फारकत घेऊन पोर्तुगीज भाषा आपली मानली होती.

पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या दीर्घकालीन सत्तेमुळे येथे गोवेकरांमध्ये राष्ट्रप्रेमाचा विकास होऊ शकला नाही. पोर्तुगीज राजवटीने येथे इतर वसाहतवादी शक्तीप्रमाणे लूट तसेच शोषण केले. परंतु त्यांनी त्याही पुढे जाऊन धर्म लादला व गोवेकरांच्या व्यक्तित्वाचाही ऱ्हास केला. त्यामुळे येथील माणसाचे पुरते खच्चीकरण झाले आहे व ते मानसिकदृष्ट्याही गुलाम बनले आहेत, असे सांगून कुन्हा यांनी चर्चविरोधातही आपली लेखणी चालविली.

दहशतीच्या जोरावर तसेच सामूहिक बाप्तिस्माद्वारे धर्मांतराचा प्रयोग गोवेकरांवर करण्यात आला. त्यामुळे लोकांनी धर्म सोडला, व्यक्तित्व घालवले आणि त्यांच्या नैतिक मूल्यांचाही ऱ्हास झाला... परंतु हे केवळ ख्रिश्‍चनांबाबतच घडले असे नाही.

पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा पुसण्याची भाषा मुख्यमंत्री करतात, तेव्हा त्यांना वसाहतवादी मानसिकता बदलायची निकड वाटते का? ज्या प्रकारे मॅकोले शिक्षणपद्धतीमुळे भारतीयांचे खच्चीकरण झाले, आपल्या संस्कृतीबद्दल अनभिज्ञ असलेली पिढी तयार झाली व भारतीयत्वापासून समाज तुटून गेला.

येथे रवींद्रनाथ टागोरांचे उदाहरण देता येईल. सन १९०० मध्ये भारतात राष्ट्रीय शिक्षण चळवळीची मुहूर्तमेढ रोवताना त्यांनी विश्‍वभारतीची स्थापना केली. एक गोष्ट खरी आहे की, पोर्तुगीज भाषा गोवा मुक्तीच्या दुसऱ्या दिवसांपासूनच आम्ही सोडून दिली. पण इंग्रजी आमच्या मानगुटीवर बसली आहे व भाषा धोरणाबद्दल सध्या सरकारी नेते काही बोलत नाहीत.

सावंत यांना वसाहतवादाच्या पाऊलखुणा सर्वार्थाने मिटवायच्या असतील तर त्यांच्याकडे असा काही रोडमॅप आहे काय? शिवाय आक्षेप आहे तो त्यांना अपेक्षित असलेला मार्ग हिंदुत्वाचा तर नव्हे? ही शिकवण उदारमतवादी असेल? कारण आपल्याच विचारवंतांनी म्हटल्याप्रमाणे हिंदुत्ववाद वेगळा आणि भारतीय परंपरा वेगळी.

भारतीय परंपरेत गौतम बुद्धापासून मोहम्मद, कबीर, माधव, नानक व गांधी अशा भारतीय विचारधारांचा समावेश होतो. लोकवेदात रामायणाचेच ३०० अवतार आहेत व देशाच्या उन्नत लोकवाङ्मयाचा ते भाग झालेले आहेत. भारतीय सांस्कृतिक वैविध्य हेच आपले वैभव आहे, असे मानले जात असताना विद्याभारतीने ‘सांस्कृतिक अभिसरणा’च्या दृष्टीने जो कार्यक्रम तयार केला आहे, त्याला देशात तीव्र विरोध आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. कारण भाजपचा हिंदुत्ववादी कार्यक्रम हा ब्राह्मणीकरणाचा पुरस्कार करतो व त्यालाच ते भारतीयत्व असे नाव देतात.

टी. बी. कुन्हा यांचे अनेक उतारे आणि त्यांचे व्यक्तित्व या स्तंभात मांडण्याचे कारण मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादावरचे भाषण हेच आहे. गोव्यात गेली अकरा वर्षे भाजपचे सरकार आहे, त्याआधी अधूनमधून भाजपने संपूर्ण स्वतःच्या ताकदीने किंवा इतर पक्षांची मोडतोड घडवून सरकारे घडविली आहेत. यावेळी तर प्रमोद सावंत यांना संपूर्ण बहुमत मिळविता आले. त्यानंतरही त्यांना इतर पक्षांची मोडतोड करून कधी नव्हे एवढे बहुमत प्राप्त करावे लागले. तरीही राष्ट्रवादासंदर्भात जागृती करण्यास, त्यांना कोणी अडविलेले नाही. मात्र ही वैचारिक देवाणघेवाण स्थानिकांना गोवा तत्त्वाचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरावी.

नवीन शैक्षणिक धोरण तर राष्ट्रवादाचीच कास धरत असल्याची कबुली अनेकांनी दिली आहे. २०१४ पासून नव्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास सुरू झाला आणि २०१९ मध्ये या धोरणाचा आराखडा राज्याला प्राप्त झाला होता. किंबहुना २०२० पासून गोव्याला नवी शैक्षणिक धोरण राबविण्याची पावले टाकण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळीही सावंत यांचेच सरकार होते, तरीही शिक्षण खात्याला हे धोरण राबविण्यासंदर्भात पूर्वतयारी करता आली नाही.

नवीन शैक्षणिक वर्ष या आठवड्यापासून सुरू झाले, परंतु शिक्षणाचा मूलभूत पाया ज्या प्राथमिक शिक्षणापासून सुरू व्हायला हवा, त्या बाबतीत तर आमच्याकडे सावळागोंधळ आहे. आम्हीच उजेड टाकल्यानंतर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांना बोलते केल्यानंतर नवीन धोरण राबविण्यासंदर्भात सरकारने कसलीच पूर्वतयारी केलेली नाही, एवढेच नव्हे तर सरकार नवीन कन्टेन्ट तयार करण्याबाबतही संपूर्णतः काळोखात असल्याचे उघड झाले. गेल्या आठवड्यात मग धावपळ करून सरकारने आपल्याला निकट असलेल्या शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमली आहे. शिक्षक प्रशिक्षणाबद्दलही गोंधळ आहे.

वास्तविक नव्या शिक्षण धोरणात गोव्याची नवी संकल्पना किती प्रमाणात मांडून येथील समाजात बंधुभाव तत्त्वाचा प्रसार करण्यासाठी काय उपाय योजले जातील, हा खरा प्रश्‍न आहे. गोव्याची संकल्पना ज्याला आम्ही हिंदू-ख्रिस्ती बंधुभावात आहे, असे मानतो- जे हजारो वर्षांपासून टिकून असलेले सौहार्द पुढे नेतो, ते शिक्षण येथे आवश्यक आहे.

सध्या संपूर्ण जगात सामाजिक, आर्थिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नात जहाल राजकारणाची कास धरली जात असून, एकता व बंधुता या तत्त्वांना हरताळ फासला जातोय. त्यामुळे आपल्याही देशात तणाव वाढू लागला आहे. हिंदुत्वाला मुख्य भारतीय प्रवाहात स्थान देण्याच्या हव्यासाने ध्रुवीकरणाच्या राजकारणाची कास धरण्याचे प्रयत्न सरकारनेच चालविले आहेत.

यापूर्वीच्या राजकर्त्यांनी जातीय, धार्मिक हिंसाचाराकडे आडनजर केली नव्हती असे नव्हे, परंतु सध्याच्या राजवटीचा अशा घटनांना संपूर्ण राजकीय आश्रय मिळू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर अहिंसा, निर्भयता व समता या तत्त्वाबरोबरच संवादाचा मार्ग खुला करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून, नव्या शिक्षण प्रणालीतून या विचारांना चालना मिळेल, की राज्यकर्ते ध्रुवीकरणाच्या आशेने सामाजिक फूट आणखी रुंदावण्याचा प्रयत्न करतील, हाच खरा प्रश्‍न आहे.

गोव्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न व सर्वसामान्यांचे अस्तित्वाचे प्रश्‍न सरकारला डोईजड ठरलेले असताना, पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा पुसण्याचा प्रश्‍न जीवनमरणाचा बनलाय काय? लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्‍न ज्वलंत बनलेले आहेत, प्रशासन ढेपाळले आहे.भ्रष्टाचार माजला आहे, लोक भरडले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न चालले आहेत. त्यातूनच मोडलेली देवळे पुन्हा उभारण्याचा संकल्प सोडला जातो. तर कधी पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा पुसण्याच्या बाता केल्या जातात. लोकांना ही गोष्ट माहीत नाही, असे थोडेच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com