Carnival Festival Goa : सासष्टी, मडगावात आज रविवारपासून दोन दिवसीय कार्निव्हल महोत्सवाला प्रारंभ झाला. बोर्डा येथील होली स्पिरिट चर्च चौकातून चित्ररथ मिरवणूक सुरू झाली.
यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर,
मडगाव कार्निव्हल आयोजन समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मिलाग्रीस गोम्स यांनी हिरवा झेंडा फडकावून व आकाशात फुगे सोडून कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला सुरूवात केली. यावेळी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही उपस्थित होते.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, कार्निव्हल महोत्सव गोव्याची परंपरा, संस्कृती, वारसा प्रदर्शित करतो. हा महोत्सव गोमंतकीयांच्या एकात्मतेचे दर्शन घडविणारा आहे. तर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी गोमंतकीयांना कार्निव्हलच्या शुभेच्छा दिल्या व युवकांनी आमची परंपरा, संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
दिगंबर कामत म्हणाले, कार्निव्हल महोत्सव हा सासष्टीतील लोकांचा व खास करून मडगावकरांचा अगदी सलोख्याचा महोत्सव आहे. सदानंद शेट तानावडे यांनीही गोमंतकीयांना कार्निव्हलच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. होली स्पिरिट चर्च ते मडगाव नगरपालिका या जवळजवळ दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते.
आरोग्य खात्याचा स्तुत्य उपक्रम
आपल्या खात्याविषयी कुठे आणि कशी जागृती करायची, हे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना चांगलेच उमगले आहे. त्यामुळेच कार्निव्हल मिरवणुकीत लोकांची होणारी गर्दी पाहता त्यात त्यांनी आरोग्य खात्याचा चित्ररथ समाविष्ट केला आहे.
या चित्ररथाचा उद्देश कार्निव्हलसारख्या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या उपक्रमांबद्दल तळागाळापर्यंत जनजागृती करण्याचा आहे.
गोमेकॉच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची प्रतिकृती, कोरोनाविषयीची सुविधा, ट्रामा सेंटर आणि योगाचे महत्त्व अशा प्रतिकृती असेलले चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थित हजारो लोकांनी आरोग्य खात्याच्या आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्या कार्याचे कौतुक केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.