अनवट इतिहास : मोहीम जिंजीची हिंदवी स्वराज्याची

नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले.
Cannon
CannonDainik Gomantak

(सर्वेश बोरकर)

छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणाऱ्या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस, ३ रात्री अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते.

सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार उरला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले.

बादशहाने राजास बंदोबस्ताने आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे सोंग करून शिवा काशीद यांनी शत्रूस चकवले होते.

हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक वीराने मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहादूर वीर! त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.

आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरवल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेय दिशेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.

बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट गुजरले. त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की, हा कोणी मातब्बर माणूस दिसतो. त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगितली. त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली. त्यांना कोसळणाऱ्या संकटाची चाहूल लागली.

तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजांस विनंती केली की, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावे, मागे आम्ही २-४ आसामींनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसटून मार्गात ठरावीक ठिकाणी येऊन मिळू. खंडो बल्लाळच्या या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले. इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ यांना कैद करून ठाण्यात नेले.

ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यांना चाबकाने फोडून काढले. डोक्यावर दगड दिले. तोंडात राखेचे तोबरे दिले; पण, ‘आम्ही यात्रेकरू’, याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही. तेव्हा हे खरेच यात्रेकरू आहेत.

महाराज असते, तर इतक्या मारापुढे बोलते झाले असते, असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले. सुटका होताच ते छत्रपती राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले.

छत्रपती राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला. बंगळूरपासून पूर्वेस ६५ मैलांवर असणाऱ्या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले. अंबूर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते आणि तेथे बाजी काकडे हे मराठा सरदार छावणी करून होते. त्यांना महाराज आल्याची वार्ता समजताच ते त्वरेने दर्शनास आले. आणि त्यांनी महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला. आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबूरहून वेलोरकडे निघाले.

वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता. २८ ऑक्टोबर १६८९ या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले. पन्हाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना ३३ दिवस लागले होते. वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. वास्तविक अंबूरहून थेट दक्षिणेस असणाऱ्या जिंजीकडे त्यांनी जावयास हवे होते; पण जिंजीकडे जाण्यात त्यांच्यासमोर एक अडचण उपस्थित झाली होती.

जिंजीला शिवरायांचे जावई हरजीराजे महाडीक होते, पण ते त्याच सुमारास वारले होते, अशातच छत्रपती राजाराम महाराज तिथे पोहोचल्यामुळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांचा विरोध झाला. परंतु विरोधाला मात देऊन राजांनी १५ नोव्हेंबर १६८९ जिंजी हस्तगत केली.

स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवले होते. पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला, तर येथे त्यास आश्रय घेता यावा, अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. भाकीत केले होते त्याचप्रमाणे घडले. औरंगजेब दक्षिणेस चालून आला. मराठी राजा संकटात पडला. तेव्हा जिंजी किल्ला साहाय्यास आला.

नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले. छत्रपती राजाराम महाराज जन्मताना ते पालथे निपजले म्हणून सर्वजण चिंतित झाले असता, छत्रपती शिवाजी महाराजांनी, ‘हा पातशाही पालथी घालेल’, असे भविष्य वर्तविले होते. प्रत्यक्षात जरी छत्रपती राजाराम महाराजांनी पातशाही पालथी घातली नाही, तरी त्यांनी पातशाही खिळखिळी केली ऐवढे नक्की!

अखेर त्यांची प्राणज्योत सिंहगडावर ३ मार्च १७०० रोजी मालवली. हा छत्रपती राजाराम महाराजांचा रायगड ते जिंजीचा थरारक व अद्वितीय प्रवास, ११ वर्षांची झुंज व त्यांनी या परिस्थितीतसुद्धा स्वराज्य राखले या इतिहासाला पाश्चात्त्य इतिहासकार आणि आपली माणसे न्याय देऊ शकलेली नाहीत, याची खंत वाटते.

संदर्भ :- शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ. जयसिंगराव पवार)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com