
वाळपई: सत्तरीत बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर केबलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यामुळे संपूर्ण तालुक्यात ‘बीएसएनएल’ची सेवा ठप्प झाली आहे. ही परिस्थिती वीज खात्याच्या कंत्राटदाराने भूमिगत वीजवाहिनी टाकताना केलेल्या हलगर्जीपणामुळे उद्भवली आहे.
संपूर्ण प्रकाराबाबत ‘बीएसएनएल’ खात्याने आधीच तीनवेळा वाळपई पोलिस स्थानकात तसेच संबंधी खात्याला याबाबत तक्रारी दिल्या असून, आज शनिवारी पुन्हा एकदा वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप संबंधित कंत्राटदाराविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
ग्रामीण भागात ‘बीएसएनएल’ ही एकमेव सेवा पुरवणारी संस्था असल्यामुळे रुग्णसेवा, पोलिस यंत्रणा, अग्निशमन दल आणि सामान्य नागरिकांची दूरसंचार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण असताना आणि अनेक जवान देशासाठी लढत असताना, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होणे अत्यंत कठीण झाले आहे. दरदिवशी अनेक ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
त्यामुळे ही केवळ सार्वजनिक सेवा ठप्प होण्याची बाब नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर समस्या आहे. सरकार आणि पोलिस प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि ‘बीएसएनएल’ खात्याकडून होत आहे.
‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोदकाम करताना पूर्वसूचना दिली गेली नाही. रात्रीच्या वेळेस गुपचूपपणे खोदकाम केले जाते आणि त्यामुळे ‘बीएसएनएल’च्या केबलवर वारंवार तडे जातात. काही ठिकाणी ५ कि.मी.पेक्षा अधिक लांबीची केबल पूर्णतः निकामी झाली आहे. त्याचबरोबर कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सतत लाईनमध्ये बिघाड होत असल्याने, तोडलेल्या केबलचा दोष शोधणेही अशक्य झाले आहे.
कंत्राटदारावर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२७, ४३०, ५०६ व ३३६ अंतर्गत गुन्हा नोंदवावा.
राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा, १९८० अंतर्गत तातडीने कारवाई करावी.
कंत्राटदाराने संपूर्ण नुकसानग्रस्त केबल (सुमारे ५ किमी) व संबंधित डक्ट संरचना स्वतःच्या खर्चावर पुनर्स्थापित करावी.
काम पूर्ण होईपर्यंत ‘बीएसएनएल’ केबल पुनर्संचयित झाल्याशिवाय पुढील खोदकामास परवानगी देऊ नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.