
फोंडा: गोव्याच्या विधानसभा निवडणुका जरी दीड वर्षे दूर असल्या तरी फोंडा मतदारसंघातील चक्रे आतापासूनच वेगाने फिरू लागली आहेत. फोंड्याचा भाजप उमेदवार कोण असणार यावर सध्या इथे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या फोंड्यात दोन माजी नगराध्यक्षांत भाजपच्या उमेदवारीसाठी जोरदार चुरस लागली असून त्यामुळे शह -काटशहाचे राजकारण रंगताना दिसत आहे.
एका बाजूला कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र नगरसेवक रितेश हे आपली रणनीती आखताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला नगरसेवक विश्वनाथ दळवी हे आपले घोडे दामटताना दिसत आहेत. यामुळे सध्या फोंडा भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसू लागले आहे. याचे पडसाद फोंडा पालिकेत व या मतदारसंघातील एकमेव पंचायत कुर्टी- खांडेपार पंचायतीत उमटताना दिसत आहे.
पालिकेतील काही नगरसेवक रितेश यांच्या तर काही नगरसेवक दळवी यांच्या बाजूला दिसत आहेत. याचेच प्रतिबिंब खांडेपार पंचायतीत दिसत असून तिथेही भाजपच्या पंचायत सदस्यांचे विभाजन झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यात पुन्हा दोघांनीही यावेळी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केल्यामुळे एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसरा त्याचा पाय ओढू शकतो, ही शक्यताही वाढू लागली आहे.
आता लवकरच जिल्हा पंचायत निवडणूक होणार असल्यामुळे भाजपमधला अंतर्गत संघर्ष कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघावर परिणाम करू शकतो, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. आणि आताच जर या दुखण्यावर मलमपट्टी केली नाही, तर भविष्यात ही जखम अधिक चिघळू शकते, असा अंदाजही मांडला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यावर कोणता तोडगा काढतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून ‘अभी नही तो कभी नही’ ही वृत्ती बाळगून भाजप श्रेष्ठींना या समस्येवर तोडगा काढावा लागेल, असे बोलले जात आहे. अन्यथा भविष्यात प्रकरण आटोक्याबाहेर जाऊ शकते एवढे निश्चित.
फोंडा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी ही बऱ्याच अंशी मगो- भाजप युतीवर अवलंबून आहे. आगामी निवडणुकीत ही युती कायम राहिल्यास मडकई व प्रियोळ हे फोंडा तालुक्यातील दोन मतदारसंघ ‘मगो’ला तर फोंडा व शिरोडा हे दोन मतदारसंघ भाजपला दिले जातील, असा कयास व्यक्त केला जात आहे. तसे झाल्यास फोंड्यातील समीकरणे बदलू शकतात.
फोंडा पालिकेच्या निवडणुकीत सलग दोनवेळा रितेश यांना विधानसभा निवडून आलेल्या तसेच नगराध्यक्ष बनलेल्या रितेश नाईक यांना विधानसभा निवडणुकीचाही अनुभव आहे. २०२२ साली मडकईतून निवडणूक लढविलेल्या रितेश यांना तब्बल पावणे आठ हजार मते प्राप्त झाली होती. २०१२ सालापासून सुदिन ढवळीकरांच्या विरोधात निवडणूक लढवून प्राप्त झालेल्या मतांपैकी ही सर्वाधिक मते. अर्थात त्याचे बरेचसे श्रेय या मतदारसंघातून निवडून येऊन नंतर मुख्यमंत्री बनलेल्या रवीना जाते हेही तेवढेच खरे. सध्या रितेशही समाजकार्यात व्यग्र दिसत आहे.
सध्याच्या घडामोडींवर बोलताना आपण भाजपचा निष्ठावंत पाईक असल्याचे विश्वनाथ दळवी सांगतात. आपण सुरुवातीपासून भाजपमध्ये असून फोंड्याचा गटाध्यक्ष राहिलो असल्याचा ते उल्लेख करतात. प्रभाग सातमधून दळवी तीनवेळा निवडून आले असून गेल्या खेपेला ते बिनविरोध निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी राहिलेले दळवी सध्या दक्षिण गोवा भाजपचे सचिव असून ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’तर्फे समाज कार्य करत आहेत. हे कार्यच आपल्याला उमेदवारी मिळवून देईल,असा विश्वास ते व्यक्त करतात. असे असले तरी मुख्यमंत्र्यांशी असलेली ‘कनेक्टिव्हिटी’ हीच त्यांची प्रमुख पात्रता मानली जातेय.
सध्याच्या फोंड्यातील घडामोडीवर बोलताना कृषिमंत्री रवी नाईक नंतर बघूया अजून वेळ आहे, अशी सावध प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र, ते आपल्या भात्यातली अस्त्रे कधी बाहेर काढतील हे सांगणे कठीण आहे.
१९९९ ते २०२२ पर्यंत २०१२ सालचा अपवाद वगळता फोंडा मतदारसंघातून रवी नाईक हेच निवडून येत आहेत. १९९९, २००२, २००७ व २०१७ या चार निवडणुकांत काँग्रेसतर्फे तर २०२२ साली भाजपतर्फे रवी निवडून आले आहेत. २०१२ साली मात्र त्यांचा ‘मगो’च्या लवू मामलेदार यांच्याकडून पराभव झाला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या फोंड्यात गेल्या खेपेला भाजप प्रथमच शिरकाव करू शकला, तोही रवी यांच्यामुळेच.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.