BITS Pilani: 'आणखी किती बळी हवेत'? विजय सरदेसाईंचा संतप्त सवाल; पाटकरांची न्यायालयीन चौकशीची मागणी

BITS Pilani Goa student death: ‘बिट्‌स पिलानी’ या राज्‍यातील अग्रेसर असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थेत गेल्‍या नऊ महिन्‍यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाल्‍यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
Student safety in BITS Pilani campus | Judicial inquiry demand BITS Pilani
BITS Pilani Campus GoaDainik Gomantak
Published on
Updated on

‘बिट्‌स पिलानी’ या राज्‍यातील अग्रेसर असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थेत गेल्‍या नऊ महिन्‍यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाल्‍यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभ्‍यासाचा ताण, ड्रग्‍सचे अतिसेवन की आणखी काय कारण असावे हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. दरम्‍यान, रात्री उशिरा ‘बिट्‌स पिलानी’ने पत्रक प्रसिद्ध करुन ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

बिट्‌स पिलानी जबाबदारी कधी स्वीकारणार?

बिट्स पिलानी या शैक्षणिक संस्‍थेत वारंवार घडणाऱ्या विद्यार्थी मृत्यूच्या घटना अत्यंत धक्कादायक आहेत. त्‍यातून संस्थेमध्‍ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अभाव आणि मानसिक आधाराच्या कमतरतेचे स्पष्ट दर्शन घडते, अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

या संस्थेत एका पाठोपाठ एक विद्यार्थी मृत्युमुखी पडत असतानाही बिट्स पिलानी जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. या संस्थेला आणखी किती बळी हवे आहेत? असा संतप्‍त प्रश्‍‍न सरदेसाई यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर उपस्‍थित केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी. बिट्स पिलानीसारखी नामांकित संस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्‍या बाबतीत इतकी निष्काळजी कशी काय ठरते? याची जबाबदारी संस्थेने घेतलीच पाहिजे, असेही सरदेसाई म्‍हणाले.

एसआयटी नेमून चौकशी करा

गोव्यातील शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या धक्कादायक घटना बिट्स पिलानी महाविद्यालयात घडत आहेत. गेल्‍या नऊ महिन्‍यांत पाचव्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केली आहे.

चौधरी म्हणाले की, राज्य सरकार बिट्स पिलानीमधील वारंवार होणाऱ्या मृत्यूंबाबत योग्य पावले उचलण्‍यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे अनेक निरपराध विद्यार्थ्यांचे जीव जात आहेत. पोलिस महासंचालकांनी तातडीने एसआयटी जबाबदार असलेल्‍यांवर कारवाई केली पाहिजे.

विद्यार्थ्यांच्‍या मृत्‍यूंना गृहमंत्रालय जबाबदार

बिट्स पिलानी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्‍या वारंवार होणाऱ्या मृत्यूंना गृहमंत्रालय म्‍हणजेच सरकार जबाबदार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते ओलेन्सियो सिमॉईस यांनी केला.

बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण मतदारसंघात भीती व अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, वेर्णा पोलिस निरीक्षक आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे एसआयटी चौकशीची मागणी वारंवार करूनही सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल सिमॉईस यांनी संताप व्‍यक्त केला.

राज्‍यात कायदा-सुव्‍यवस्‍था पूर्णपणे ढासळली आहे. सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, जुगाराचे वाढते प्रमाण, बेकायदेशीर कॉल सेंटर, खून, बलात्‍कार अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्‍यात आता महाविद्यालयीन कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्‍या मृत्‍यू प्रकरणांची भर पडत आहे व ही धक्कादायक बाब होय, असे सिमॉईस म्‍हणाले.

या सर्व घटनांनी प्रशासनाचे अपयश उघड झाले आहे. गृहमंत्रालय राज्‍यातील विशेषत: कुठ्ठाळीतील नागरिकांना सुरक्षितता व न्याय देण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोपही सिमॉईस यांनी केला.

गुन्हा दाखल करून दोषींना तत्‍काळ अटक करा

बिट्स पिलानी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून दोषींना तत्काळ अटक करावी.

शैक्षणिक दबाव, ड्रग्‍स व संबंधित साखळीची स्वतंत्र एसआयटी चौकशी व्हावी.

कॅम्पसभोवती चालणारे बेकायदेशीर बार तातडीने बंद करावेत.

न्यायालयीन चौकशी व्हावी

‘बिट्स पिलानी’मधील २० वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू ही धक्कादायक घटना आहे. गेल्या वर्षभरात घडलेल्या अशा पाच घटनांवर सरकार आणि प्रशासनाने ठोस पावले न उचलणे हे लज्जास्पद आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्‍हटले आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास काँग्रेस हा मुद्दा विधानसभा, विद्यापीठ अनुदान आयोग आणि शिक्षण मंत्रालयापर्यंत नेईल, असा इशाराही दिला आहे.

एकाच वर्षात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू हा निष्काळजीपणा आहे. पालक आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्याच्या आशेने गोव्यात पाठवतात; परंतु त्यांना हृदयद्रावक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या मृत्यूंमुळे कॅम्पसमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही पाटकर यांनी म्‍हटले आहे.‍

सुचवल्‍या या उपाययोजना

गेल्या वर्षभरातील सर्व मृत्यूंची न्यायालयीन चौकशी व्हावी

कॅम्पसचे ३० दिवसांचे सुरक्षा व मानसिक-आरोग्य ऑडिट केले जावे

पालकांना कॅम्पसला थेट प्रवेश मिळावा

२४ तास रॅगिंगवर लक्ष ठेवले जावे

दर तीन महिन्यांनी सुरक्षा आढावा घ्यावा

निवृत्त न्‍यायाधीशांची समिती स्‍थापन करा

बिट्स पिलानी कॅम्पसमध्‍ये अलीकडच्या काळात झालेल्या पाच विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर आम आदमी पक्षाने चिंता व्यक्त केली आहे. या मृत्यू प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती स्‍थापन करून त्‍यांच्‍या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

गेल्या नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू ही धक्कादायक बाब आहे. या घटनांमुळे कॅम्पसमधील विद्यार्थी कल्याण, आधारयंत्रणा आणि सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच अन्‍य विद्यार्थ्यांमध्‍ये असुक्षिततेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Student safety in BITS Pilani campus | Judicial inquiry demand BITS Pilani
BITS Pilani: प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल, हैद्राबादहून गोव्यात आला; ‘बिटस पिलानी’तील विद्यार्थ्याच्या मृत्युचे गूढ कायम

चौकशीमध्ये शैक्षणिक दबाव, मानसिक आरोग्य समस्या आणि सपोर्ट सिस्टीमचा अभाव या मूळ कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच संस्थेची भूमिका, आपत्कालीन प्रोटोकॉलची परिणामकारकता व सरकारने केलेली उपाययोजना तपासल्या जाणे गरजेचे आहे, असे ‘आप’चे नेते सुनील लोरेन म्‍हटले आहे.

Student safety in BITS Pilani campus | Judicial inquiry demand BITS Pilani
Bits Pilani: 'कुठल्याही विद्यापीठाला, गोव्याला अशा घटना परवडणार नाहीत'! ‘बिट्स’ कॅम्पसचे पैलू; वास्‍तव आणि समस्‍या

विद्यार्थ्यांच्‍या सुरक्षिततेसाठी पावले उचला

मानसिक आरोग्य साहाय्य वाढवणे. समुपदेशन, थेरपीसारख्या सोयी सुलभ व गोपनीय पद्धतीने उपलब्ध करणे.

सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी. आपत्कालीन प्रतिसाद योजना आणि सुरक्षितता उपाय काटेकोरपणे लागू करणे.

आनंददायी वातावरण निर्माण करणे.

मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई व सहकार्य द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com