छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ख्रिस्ती धर्मगुरू फादर बोलमॅक्स यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून गोव्यात मोठा वाद झाला. फादरच्या वक्तव्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले होते.
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आता या प्रकरणावरून फादर बोलमॅक्स यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमात आर्लेकर बोलत होते.
"छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही याबाबत कोणाच्या मनात शंका का निर्माण व्हावी? ज्या लोकांच्या मनात देशप्रेम नाही तेच लोक अशी वक्तव्य करतात. प्रत्येक राष्ट्रीय हिरो आमच्यासाठी देव आहे." अशी भूमिका आर्लेकर यांनी मांडत फादर बोलमॅक्स यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
दरम्यान, बोलमॅक्स यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले होते. चर्चिल आलेमाव यांनी देखील बोलमॅक्स यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच, मंत्री सुदीन ढवळीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव होते आणि राहतील असे म्हटले होते. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, बोलमॅक्स यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वास्को येथे गुन्हा दाखल झाला. बोलमॅक्स यांना याप्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
बोलमॅक्स यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी वास्को पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच रात्री उशीरा बोलमॅक्स यांच्यावर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. तसेच, ख्रिस्ती बांधवांनी देखील बोलमॅक्स यांच्या समर्थनात मोबाईल टॉर्च दाखवत पाठींबा दर्शवला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.