
डिचोली: जवळपास ४० वर्षांचा इतिहास असलेले डिचोली तालुका सरकारी वाचनालय कायमस्वरूपी स्वतंत्र जागेच्या प्रतीक्षेत असून, ही स्वप्नपूर्ती कधी होणार, त्याकडे वाचकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.
वाचनालयाच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि वाचकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने या वाचनालयासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज अशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाचकवर्गाकडून होत आहे. गेल्या साडेसहा वर्षांपासून हे वाचनालय भाड्याच्या जागेत म्हणजेच शहरातील पालिका इमारतीतील सभागृहात कार्यरत आहे.
मात्र, कधी ना कधी वाचनालयाला सध्याची भाड्याची जागा सोडावी लागणार आहे. त्यावेळी जागेची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील नियोजित प्रशासकीय इमारत संकुलामध्ये वाचनालय स्थलांतरित करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे. ही आनंदाची बाब असली, तरी त्यासाठी किमान दोन वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याच्यावतीने १५ फेब्रुवारी १९८४ साली डिचोलीत तालुका वाचनालय सुरू करण्यात आल्यानंतर केंद्र शाळा इमारतीत हे वाचनालय कार्यरत होते. मात्र, सहा वर्षांपूर्वी ज्यावेळी नवीन इमारत प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शाळा इमारत पाडण्यात आली, त्यावेळी शाळेचे वर्ग पोलिस स्थानकाच्या जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले.
मात्र, तालुका वाचनालयासमोर जागेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर तत्कालीन आमदार राजेश पाटणेकर यांच्या पुढाकारातून आणि पालिकेच्या सहकार्यातून एकदाची भाडेतत्त्वावर पालिका सभागृहात वाचनालयाला जागा मिळाली. जानेवारी २०१९ पासून तालुका वाचनालय पालिका सभागृहात कार्यरत आहे. वाचकांची सोय व्हावी, म्हणून रविवारी सुट्टीच्या दिवशीही वाचनालय उघडे ठेवण्यात येते. प्राप्त माहितीनुसार, वाचनालयासाठी प्रतिमहिना ३२ हजार ५२४ रुपये भाडे आकारण्यात येत आहे.
तालुका वाचनालयात कथा, ललित, कादंबरी, नाटक आदी वेगवेगळ्या विषयांवरील मिळून ३० हजारांहून अधिक पुस्तके आहेत. या वाचनालयाच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्याही ३ हजारांहून अधिक आहे. त्याशिवाय या वाचनालयात नियमित येणाऱ्या वाचकांचा आकडाही समाधानकारक आहे. वर्तमानपत्रे आणि मासिके वाचण्यासाठी वाचनालयात नियमित वाचक येत असतात. वाचनालयात लहान मुलांसाठी पुस्तके उपलब्ध असून, त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आहे.
सध्या पालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वाचनालय कार्यरत आहे. ही जागा खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी गैरसोयीची आहे. पायऱ्या चढून वाचनालयात जाताना ज्येष्ठ नागरिक असलेल्या काही नियमित वाचकांना अडचण आणि त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी वाचनालयात नियमित येण्याचे टाळले आहे. काहींनी तर वाचनालयाकडे पाठ केली आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाचनालयासाठी सुविधांनीयुक्त अशी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.