
Himachal Pradesh officials visit waste project in bicholim
डिचोली: डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या धर्तीवर हिमाचल प्रदेशमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विचारात घेण्यात येईल, असे हिमाचल प्रदेश प्रशासनातील अनुसूचित जाती विभागाचे अतिरिक्त संचालक जगन ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
कचरा व्यवस्थापनाविषयी अभ्यास करण्यासाठी स्वच्छता मिशनचे तज्ज्ञ देश सैनी यांच्यासह जगन ठाकूर गोव्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुचविल्याप्रमाणे दोघांनीही काल सायंकाळी डिचोलीतील लाखेरे कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पातील कचऱ्यावरील प्रक्रिया आणि एकंदरीत व्यवस्थापन पाहून जगन ठाकूर आणि देश सैनी भारावून गेले.
यावेळी डिचोली पालिकेचे नगरसेवक विजयकुमार नाटेकर, मिनरल फाऊंडेशन आणि पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच कॅजिटन वाझ, श्रीकुमार, व्यंकटेश नाटेकर हे स्वच्छतादूत उपस्थित होते.
हिमाचल प्रदेशचे अतिरिक्त संचालक जगन ठाकूर आणि देश सैनी यांनी लाखेरे प्रकल्पस्थळी येताच सर्वप्रथम तेथील बायो-मिथेनेशन प्रकल्पाची पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर या प्रकल्पात बायोगॅस तयार कसा होतो. बायोगॅसवर वीजनिर्मिती कशी होते. त्याविषयी सविस्तर माहिती त्यांनी प्रकल्पातील अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर जगन ठाकूर आणि देश सैनी यांनी प्रकल्पातील महिला स्वच्छता कामगारांशी संवाद साधला. कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कामाचे व्यवस्थापन आदी माहिती त्यांनी या महिला कामगारांकडून जाणून घेतली. कचऱ्याच्या नियोजनासाठी हिमाचल प्रदेशातही महिला स्वयंसाहाय्य गटांना सामावून घेण्यात येईल, असे जगन ठाकूर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.