डिचोली, मुळगाव येथे एका महिलेच्या घराला आग लागून घरातील किमती साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना सोमवार (ता.२७) रात्री घडली.
मुळगाव येथील हरिजनवाड्याजवळ असलेल्या आचल कुंडईकर या महिलेच्या घराला ही आग लागली. आगीची घटना घडली, त्यावेळी घरात कोणीच नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेवेळी आचल कुंडईकर या म्हापसा बाजारात गेल्या होत्या. तर त्यांचा छोटा मुलगा आणि मुलगी उन्हाळी सुट्टीनिमित्त आजोळी आहे.
ही आग नेमकी कशी लागली, ते समजू शकले नाही. या आगीत नेमके किती नुकसान झाले, त्याचा निश्चित आकडा उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, आपले पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले, असे आचल यांनी सांगितले आहे.
सोमवारी रात्री आचल कुंडईकर यांच्या घराला आग लागली. किमती ऐवज जळून खाक झाला. आग लागताच स्थानिकांनी डिचोली अग्निशमन दलाला माहिती दिली. दलाचे उपअधिकारी प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
दलाच्या जवानांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. स्थानिकांनीही मदतकार्य केले. दरम्यान, राज्याबाहेर असलेले आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बेघर झालेल्या आचल कुंडईकर यांना शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
पंचायत मंडळाची धाव
या घटनेची माहिती मिळताच मुळगावचे रहिवासी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांच्यासह उपसरपंच गजानन मांद्रेकर, पंचसदस्य मानसिक कवठणकर आदीनी घटनास्थळी धाव घेतली. बेघर झालेल्या आचल यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी प्रदीप रेवोडकर यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.