Benaulim ZP By- Election : ‘आप’च्‍या संघटित कार्याला यश; मतदारांकडून ‘आघाडी’च्या राजकारणाला पावती

Benaulim ZP By- Election Result : या निवडणुकीत पिमेंता यांना एकूण ५,६७२ मते प्राप्‍त झाली. याउलट त्‍यांच्‍याविरुद्ध उभे राहिलेल्‍या तिन्‍ही अपक्ष उमेदवारांच्‍या एकूण मतांची बेरीज ३,७३९ एवढी भरते.
Benaulim ZP By- Election
Benaulim ZP By- ElectionDainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

मडगाव, बाणावली जिल्‍हा पंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार म्‍हणून रिंगणात उतरलेले आम आदमी पक्षाचे जोसेफ पिमेंता यांनी ३,०४९ मतांच्‍या आघाडीने प्राप्‍त केलेला दणदणीत विजय पाहिल्‍यास बाणावलीच्‍या मतदारांनी आघाडीच्‍या राजकारणाला दिलेली ही निर्विवाद पावती असे म्‍हणावे लागेल.

या निवडणुकीत पिमेंता यांना एकूण ५,६७२ मते प्राप्‍त झाली. याउलट त्‍यांच्‍याविरुद्ध उभे राहिलेल्‍या तिन्‍ही अपक्ष उमेदवारांच्‍या एकूण मतांची बेरीज ३,७३९ एवढी भरते. मतांच्‍या तराजूत पिमेंता यांना एका पारड्यात बसविले व इतर तिन्‍ही उमेदवारांना दुसऱ्या पारड्यात बसविले, तरीही पिमेंता यांचे पारडे ९३३ मतांनी अधिक जड होते. या निवडणुकीत ग्रेफन्‍स फर्नांडिस यांना २,६२३, रॉयला फर्नांडिस यांना १,८४० तर फ्रँक फर्नांडिस यांना फक्‍त २७६ मते मिळाली.

भाजपला सत्तेपासून राेखायचे असल्‍यास सर्व विराेधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, अशी सासष्‍टी भागातील मतदारांची नेहमीच मागणी असते. मात्र, यापूर्वी या मागणीला मूर्त स्‍वरूप कधी मिळत नव्‍हते.

यावेळी इंडिया आघाडीच्‍या नावाखाली पहिल्‍यांदाच समविचारी पक्ष एकत्र आले आणि त्‍याचा फायदा दक्षिण गोव्‍यात तसेच बाणावलीत दोन्‍हीकडे दिसून आला. त्‍यानंतर लगेच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत मतदार अजून त्‍या मूडमधून बाहेर पडलेला नाही, हे आजच्‍या निकालाने स्‍पष्‍ट केले आहे.

बाणावली जिल्‍हा पंचायत क्षेत्रात येणारी सर्वांत जास्‍त मतदार असलेली पंचायत म्‍हणजे बाणावली पंचायत. मागच्‍यावेळी ‘आप’ने बाणावली पंचायतीचाच मतदार असलेल्‍या हेंजल फर्नांडिस यांना उमेदवारी दिली हाेती आणि ते निवडून आले होते.

Benaulim ZP By- Election
B 32 Muthal 44 vare : ब्रा साईज पाहणाऱ्यांच्या कानाखाली वाजवणारा विद्रोही मल्याळम चित्रपट माहितेय का?...

मात्र, यावेळी उभे केलेले जोसेफ पिमेंता हे बाणावलीबाहेरील होते. त्‍याउलट चर्चिल आलेमाव यांचे पुत्र सावियो आलेमाव यांचा पाठिंबा मिळालेले ग्रेफन्‍स फर्नांडिस आणि पुतण्‍या वाॅरन आलेमाव यांचा पाठिंबा मिळालेल्‍या रॉयला फर्नांडिस हे दाेन्‍ही उमेदवार बाणावलीचे होते. असे असतानाही बाणावली पंचायतीतही पिमेंता यांना २,४७२ मते प्राप्‍त झाली. याउलट ग्रेफन्‍स यांना १,८०४ तर रॉयला यांना फक्‍त ६७८ मते प्राप्‍त झाली. यामुळे बाणावलीकरांनी ‘भायलो-भितल्‍लो’ या वादालाही तिलांजली दिली असे म्‍हणावे लागेल.

बाणावली पंचायतीत एकूण ११ प्रभाग येतात. त्‍यापैकी ९ प्रभागांत पिमेंता यांनी आघाडी घेतली. अवघ्‍या दाेन प्रभागात ग्रेफन्‍स यांना आघाडी मिळाली. यात प्रभाग १ आणि प्रभाग ९ यांचा समावेश हाेता. प्रभाग १ हा स्‍वत: ग्रेफन्‍स यांचा प्रभाग असून प्रभाग ९ हा ग्रेफन्‍सला पाठिंबा दिलेले बाणावलीचे सरपंच झेवियर फर्नांडिस हे प्रतिनिधित्‍व करणारा प्रभाग आहे.

रॉयलाच्‍या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम?

२०१७ च्‍या विधानसभा निवडणुकीच्‍यावेळी ‘आप’च्‍या उमेदवार म्‍हणून लक्षवेधक कामगिरी केलेल्‍या रॉयला फर्नांडिस यांच्‍याकडे त्‍यावेळी बाणावलीच्‍या भावी आमदार म्‍हणून लाेक पाहत होते. मात्र, मागच्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत त्‍यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्‍यावर त्‍यांना ही जागा जिंकता आली नाही.

रॉयला फर्नांडिस यांनी जिल्‍हा पंचायत निवडणूक लढविण्‍याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता हे त्‍यावेळी सिद्ध झाले होते. या निवडणुकीत त्‍यांना दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्‍त झाली होती.

यावेळी पुन्‍हा एकदा बंडाचे निशाण फडकावीत अपक्ष म्‍हणून त्‍या रिंगणात उभ्‍या राहिल्‍या आणि त्‍यांना फक्‍त १,८४० मते मिळाल्‍याने त्‍या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्‍या गेल्‍या. दुसऱ्यांदा जिल्‍हा पंचायत निवडणूक लढविण्‍याचा रॉयला यांचा निर्णय हा त्‍यांच्‍या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम देणारा तर ठरणार नाही ना, हीच चर्चा सध्‍या बाणावलीत सुरू आहे.

विरोधक ढेपाळले :

बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्‍हिएगस यांनी आरोग्‍य आणि शिक्षण क्षेत्रात बाणावली मतदारसंघात जे काम केले त्‍या कामालाही बाणावलीच्‍या मतदारांनीही दिलेली ही पावती असा अर्थ या निकालातून काढता येणे शक्‍य आहे. त्‍याशिवाय यावेळी आम आदमी पक्षाने बाणावलीत अगदी शिस्‍तबद्ध आणि नियोजनपूर्वक प्रचार केला होता. याउलट विरोधक विखरल्यासारखे वाटत होते. विराेधकांच्‍या अस्‍थिरपणाचाही फायदा ‘आप’ला बाणावलीत मिळाला, असे म्‍हणावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com