पणजी, कला अकादमीची उभारणी ही भरती रेषेपासून केवळ २.५ मीटर उंचीवर आहे. गेली चाळीस वर्षे अकादमीच्या सभागृहात पाणी येत राहिले.
चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनही कला अकादमीतील समस्यांवर उपाय सुचवू शकले नाही, अशा खुलाशाद्वारे कला व संस्कृती मंत्री गावडे यांनी कला अकादमी संदर्भात झालेल्या आरोपांना बगल दिली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘आयआयटी’ रिपोर्ट कुठे गेला, असा खडा प्रश्न करून ‘ऑडिट’ची जोरदार मागणी केली.
ग्रामीण विकास, क्रीडा आणि कला संस्कृती खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री गावडे यांनी वरील भाष्य केले. यावेळी आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘जीएसआयडीसी’चे चिराग जैन यांनी सल्लागार म्हणून जराही काम केले नाही. मंत्री गावडे सभागृहाची दिशाभूल करीत आहेत.
प्रश्नांवर मंत्र्यांनी उत्तर दिलेले नाही. कला अकादमीत ७० कोटींचा घोटाळा आहे. दरम्यान, मंत्री गावडे यांनी कला अकादमीच्या मुद्यावर विस्ताराने भाष्य केले. या प्रकरणी अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न झाला. अकादमी ही जनवादी चळवळ झाली, हे विसरू शकत नाही. ९०च्या दशकात अकादमी वास्तूविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले, तेव्हाच वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला हवा होता. सभागृहात गेली ४० वर्षे पाणी साचत होते. भरती व ओहटी पाहूनच कार्यक्रमांचे बुकिंग घ्यावे लागत होते. गळती लागते म्हणून वॉटरप्रुफिंगचे काम करण्यात आले.
अकादमी ही वाळूच्या बेटावर उभी राहिली. कला अकादमी हटवू नये, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली. कला अकादमीला ६० वर्षे झाली नसल्याने ती वारसास्थळ बनली नाही.
वातावरणही या इमारतीला पोषक नसतानाही तिचे संरक्षण महत्त्वाचे होते. ताजमहालाच्या संरक्षणाचे काम ज्यापद्धतीने केले जाते, तेवढ्याच पद्धतीने हे कामही तसे व्हावे, असे आपले म्हणणे. परंतु बोलण्याचा त्याचा विपर्यास करण्यात आला. कला अकादमीच्या सर्व बैठकांविषयीची माहिती फाईलमध्ये आहे.
कपचे पडू लागल्याने ऑगस्ट २०१८ पासून खुले थिएटर बंद केले, असे ते म्हणाले. मेरशी येथील प्रस्तावित गोवा बझारची काही जागा महामार्गामध्ये गेली. त्यासाठी उच्च न्यायालयाची नोटीस आली होती. परंतु त्याविषयीची सर्व प्रक्रिया झाली होती. आता पुन्हा त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. दोन महिन्यांत या बझारची निविदा काढली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
महिलांचे सबलीकरण
मंत्री गावडे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे. म्हणूनच ग्रामीण विकास यंत्रक्षणेच्या अंतर्गत महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. ३ हजार ७२४ स्वयंसाह्य गट स्थापन करून ४७,२६९ घरसदस्य या मिशनअंतर्गत जोडले गेले आहेत.
या स्वयंसाह्य गटांना १९.०८ कोटी रुपये अदा केले. ८२७.७४ कोटी आत्तापर्यंत निधी दिला गेला आहे. या मिशनअंतर्गत महिलांनी विविध व्यवसायांची उभारणी केली आहे. स्वयंसाह्य गटाच्या १५ हजार ७५६ सदस्यांना लाभ झाला आहे. महिलांना प्रशिक्षण दिले जाते, समुपदेशन केले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.