Goa Crime News
पणजी: बेकायदा चरस बाळगल्याप्रकरणी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अश्वे-पेडणे येथील आरोपी माक्सिम कुशानी याला दोषी ठरवून तीन वर्षाची कैद व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. पोलिसांनी सादर केलेले पुरावे खटल्यावरील सुनावणीवेळी सिद्ध होत असल्याने त्याला ही शिक्षा ठोठावण्यात येत असल्याचे निरीक्षण निवाड्यात न्यायालयाने नोंदवले आहे.
अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने आरोपी कुशानी याला चरसप्रकरणी ताब्यात घेतल्यावर कायद्यानुसार सर्व प्रक्रिया केली आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या चरसची तपासणी घटनास्थळी करण्यात आली होती व सोबत असलेल्या साक्षीदारांनी सील केलेल्या या चरसच्या पाकिटावर सह्या केल्या होत्या.
गोव्यातील फोरेन्सिक सायंटिफिक लेबोरेटरीमध्ये केलेल्या तपासणीत जप्त केलेला ड्रग्ज हा चरस असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे संशयिताविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला आहे. या गुन्ह्यासाठी अधिकाधिक शिक्षा दहा वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्याच्याजवळ सापडलेल्या चरसच्या प्रमाणानुसार ही शिक्षा देण्यात येत असल्याचे निवाड्यात नमूद करण्यात आले आहे.
अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने २ एप्रिल २०१९ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आश्वे येथील स्काय बारजवळ संशयित माक्सिम कुशानी याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या पॉलिथिन बॅगमध्ये ४८० ग्रॅम चरस सापडला होता. या चरसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ लाख ४० हजार रुपये होती. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. खटल्यावरील सुनावणीवेळी दोन साक्षीदारांसह तपास अधिकारी तसेच चरस तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या साक्ष न्यायालयात नोंदवण्ल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.