Asgaon News : आसगावातील घर पाडण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद; विरोधकांकडून आरोपांच्या फैरी

Mla Carlos Ferreira : चौकशी आयोग स्थापण्याची आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांची मागणी
Asgaon
Asgaon Dainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथील घर भर पावसात बाऊंन्सर्सद्वारे पाडून प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या कुटुंबीयांना बेघर करण्याच्या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला असून आरोपांच्या फैरी झडत आहेत.

हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत आज आसगाव येथे जाऊन पीडित आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, विशेषतः पोलिस बेकायदेशीरपणे घर पाडण्याच्या वेळी मूक प्रेक्षक म्हणून उभे राहिले असा आरोप केला जात आहे. २२ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास महिला व पुरुषांचा समावेश असलेल्या अज्ञात व्यक्तींच्या गटाने जेसीबीच्या साहाय्याने आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घरावर चाल करून ते घर पाडले होते.

Asgaon
Goa CM On AAP: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आपमध्ये जुंपली, दिल्लीत केजरीवालना विचारला जाब

यावेळी प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या मुलाचे कथित अपहरण करण्यात आले. पीडितांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कारमध्ये डांबून परस्पर अनोळखी जागेवर जबरदस्तीने फिरवले. तसेच त्यांचा मोबाईल फोन बंद केला होता. त्यानंतर रात्री उशिरा संबंधितांना हणजूण येथील बॉबी बारजवळ रात्री १० च्या सुमारास सोडण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित आगरवाडेकर कुटुंबीयांनी दावा केला आहे की, त्यांचे कुटुंब मागील २५ वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य करते. मात्र, कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता, बाऊन्सर्सच्या मदतीने जेसीबी ऑपरेटरने घर पाडण्यास सुरवात केली. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता आगरवाडेकरांचे घर पाडले. संबंधितांना कोणतीही नोटीस बजावली नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच, हणजूण पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांना मोडतोड थांबवली, परंतु तोपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते. यात तीन खोल्या, संरक्षक भिंत तसेच जिना पाडण्यात आला.

सखोल चौकशीची कुटुंबीयांची मागणी :

पूजा शर्मा या बिगर गोमंतकीय महिलेने फॉर्म १ व १४ वर त्यांचे नाव नोंदणीकृत असल्याचे सांगून या घराच्या मालकीचा दावा केला. त्यांनी मूळ मालकाकडून जमीन खरेदी केल्याचे सांगितले व आगरवाडेकर कुटुंब हे भाडेकरू असल्याचा आरोप केला आहे.

शर्मा यांच्या दाव्यानंतरही, आगरवाडेकरांना घरातून बाजूला करण्यासाठी वापरलेल्या पद्धतींच्या कायदेशीरतेबाबत प्रश्न निर्माण झाले. प्रदीप आगरवाडेकर यांनी आपण घराचे पैसे भरले, पण विक्री करार पूर्ण केला नसल्याचे सांगितले. या घटनेतील हणजूण पोलिसांची भूमिका छाननीखाली आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे हादरलेल्या आगरवाडेकर कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत, घर पाडल्याची व अपहरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संशयित मोकाट ही निंदनीय बाब ः सरदेसाई

याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, गोव्यात स्थानिकांचे घर पाडले जाते व संशयित मोकळेपणाने फिरतात. ही निंदनीय बाब आहे. या घटनेचा तसेच पोलिसांच्या प्रतिक्रियेला झालेल्या दिरंगाईचा मी निषेध करतो.

त्यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था बाहेरील लोकांना आऊटसोर्स केली आहे का? पोलिसांना कायदेशीर मार्गाने विषय सोडविण्यात अपयश आले आहे. दुसरीकडे ते दिल्ली व उत्तरप्रदेशमध्ये वापरल्या जाणाऱ्या रानटी व असभ्य पद्धतींना प्रोत्साहन देत आहेत. मुळात सरकार हे गोवा सरकारसारखे वागायला कधी लागेल?

गोवेकरांसाठी ही धोक्याची घंटा ः युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घटनेचा निषेध करीत म्हटले की, भाजपाच्या राजवटीत रिअल इन्स्टेटवाल्यांना सगळेच माफ असते. हेच या घटनेतून अधोरेखित होते.

मुख्यमंत्री व सरकारचे घटनेकडे लक्ष आहे की नाही? जमीन विक्रीतून आपली तिजोरी भरण्याचा व्यवसाय भाजपा सरकारात सुरू आहे. आपल्या जमिनी बिगर गोमंतकीयांना विकणाऱ्या गोवेकरांसाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका आलेमाव यांनी केली.

घर पाडण्यामागे पोलिस अधिकारी ः

फेरेरा मालमत्ता जरी कुणीही खरेदी केलेली असली, तरी जागा खाली करण्याची कायदेशीर पद्धत असते. अशाप्रकारे अचानकपणे जेसीबीच्या साहाय्याने घर पाडू शकत नाही. हे घर एका रात्रीत उभे राहिलेले नाही.

घर पाडण्याचे काम पोलिसांच्या सहकार्याशिवाय होऊच शकत नाही, असा आरोप हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरांनी केला. याप्रकरणात एका उच्च पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असून त्यांनी घर पाडण्यासाठी मदत केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com