
पणजी: मांद्रे मतदारसंघातील जनतेने मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेची कामे करणे माझे कर्तव्य असून मांद्रेच्या विकासाला प्रथम प्राधान्य देत असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात आरोलकर बोलत होते. दरम्यान, आरोलकर म्हणाले, कोकणी ही आमची राजभाषा आहे, त्यात काहीच दुमत नाही किंवा माझा कोकणीला विरोध नाही. परंतु गोमंतकीयांची धार्मिक आणि व्यावहारिक भाषा ही मराठी आहे, त्यामुळे गोव्याची दुसरी राजभाषा मराठी व्हावी ही जनतेची मागणी विधानसभेत मांडली आहे.
गोव्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे मराठीत होते, तसेच येथे अनेक वृत्तपत्रेही मराठीत आहेत. माझी मागणी मान्य करायची की नाही, हा सरकारचा अधिकार आहे; परंतु मराठी राजभाषेसाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे.
माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अनेक प्रकल्प पेडण्यात आणले; परंतु पराभवानंतर निवडून आलेल्या आमदाराने मागील पाच वर्षांत या प्रकल्पांबाबत कोणताच पाठपुरावा केला नाही. मी पाठपुरावा करून प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. येत्या सात-आठ महिन्यांत तुयेतील हॉस्पिटलचे काम पूर्ण होईल.
उपकरणे आणि डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न होईल. त्यामुळे मांद्रे, पेडणेतील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा येथे उपलब्ध होतील. कौशल्य विकास केंद्र, ईएमसी आदी प्रकल्पही पूर्ण करण्यात येतील, असे आरोलकर यांनी सांगितले.
किनाऱ्यांवर ‘फिशरमॅन झोन’चा विचार!
निसर्गाने आपल्याला सुंदर समुद्रकिनारे दिले आहेत; परंतु या किनाऱ्यांचा पर्यटनाच्या अनुषंगाने योग्यरितीने वापर कसा करता येईल, स्थानिकांनाही कशाप्रकारे समावून घेण्यात येईल यासाठी प्रयत्नरत असून लवकर किनाऱ्यांवर फिशरमॅन झोन तयार करण्याचा सरकार निर्णय घेईल. जेणेकरून पर्यटन आणि स्थानिकांचा विचार यात केला जाणार असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.
पक्ष बळकटीसाठी कार्यरत!
मगो पक्ष हा राज्यातील सर्वात जुना पक्ष आहे. मांद्रे मतदारसंघातून गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर निवडून यायचे, त्यामुळे ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सद्यस्थितीत केवळ पक्ष म्हणून निवडून येता येत नाही. आपली स्वतःची वैयक्तिक मते असणे गरजेचे आहे. त्यामुळे मगो पक्षाच्या बळकटीसाठी तळागाळातून कार्य करणे, संघटना उभारणे, कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे गरजेचे असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.