
म्हापसा: हणजूण पंचायत क्षेत्रातील झरवाड्यावरील तीव्र पाणीटंचाईवर उपाययोजना करणे तसेच गरजेनुसार लोकांना पाण्याच्या टँकरचा पुरवठा करणे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी स्थानिकांनी दत्तवाडी-म्हापसा येथील साबांखा पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा नेला.
वाड्यावरील पाणीटंचाई ही आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे. गावात विशेषतः झरवाडामधील लोकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मागील सहा महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असून, त्यात आता पदरमोड करून पाणी विकत आणून प्यावे लागते.
तसेच जो पाण्याचा टँकर साबांखाकडून पुरविला जातो, तो राजकीय हेतूमुळे सर्वांपर्यंत पोहोचत नाही, अशी कैफियत संबंधित मोर्चेकरांनी कार्यकारी अभियंत्यांसमोर मांडली. त्यानुसार अभियंत्यांनी संबंधितांना टँकरने नियमित पाणीपुरवठा होईल तसेच नळांना सुरळीत व योग्य पाणीपुरवठा देण्याचे प्रयत्न करणार, असं आश्वासन दिले.
मध्यरात्रीनंतर उशिरा कमी वेळेसाठी पाणीपुरवठा केला जातो; परंतु पाण्याचा दाब खूपच कमी असतो. आम्ही वयस्कर असल्याने रात्री उशिराने जागरण करून पाण्याची वाट बघत बसणे शक्य नाही. अभियंत्यांनी व साबांखाने यात गांभीर्याने लक्ष घालून यावर तोडगा काढावा.
त्याचप्रमाणे, साबांखाकडून पाण्याचा जो टँकर येतो, त्याचे पाणी आम्हाला मिळत नाही. लोकप्रतिनिधींकडून टँकरच्या पाणीपुरवठ्यात हेतुपुरस्सर भेदभाव केला जातोय. यापुढे थेट स्थानिकांशी संपर्क साधून हा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी संबंधितांनी केली.
स्थानिक महिला म्हणाल्या की, एकीकडे पाणीटंचाईची समस्या तीव्र असताना, प्रशासनाकडून नवीन पाणीपुरवठ्याची जोडणी दिली जाते. हा प्रकार ताबडतोड बंद झाला पाहिजे. विभागाने घरातील लोकांच्या नळांना योग्य पाणीपुरवठा होईल, याची व्यवस्था करावी. जी विद्यमान जलवाहिनी आहे, त्याची विभागाने पाहणी करावी.
मी वयस्कर असल्याने माझ्या औषधोपचारासाठी दोन हजार रुपये खर्च होतात. त्यात खासगी टँकरसाठी पदरमोड करून १२०० रुपये खर्च करावे लागतात. घरात एकटाच कमावता मुलगा आहे. आम्ही गरीब लोक असल्याने आमच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. अशा गंभीर स्थितीत आम्ही नक्की कुणाकडे पाहावे, अशी व्यथा एका वृद्धाने मांडत आपला संताप व्यक्त केला. बिगर गोमंतकीयांच्या मोठ्या हॉटेलना चोवीस तास पाणी असते; परंतु स्थानिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.