Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Anaya Bangar Hormone Replacement Therapy: पुरुषाच्या शरीरात स्त्री म्हणून राहताना होणारी वेदना कायम सोबत घेऊन जगताना होणारा आंतरिक त्रास झेलत अनाया ‘आर्यन’ म्हणून जगत होती.
Anaya Bangar Hormone Replacement Therapy
Anaya Bangar Hormone Replacement TherapyDainik Gomantak
Published on
Updated on

कविता आमोणकर

पुरुषाच्या शरीरात स्त्री म्हणून राहताना होणारी वेदना कायम सोबत घेऊन जगताना होणारा आंतरिक त्रास झेलत अनाया ‘आर्यन’ म्हणून जगत होती. वयाच्या आठव्या वर्षापासून तिला त्याची जाणीव होत होती. वयाच्या २१ व्या वर्षी हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरेपी घेतल्यावर आर्यनमधली सुंदर, देखणी अशी लावण्यवती अनाया जगासमोर आली. मनाच्या ज्या नाजूक परिस्थितीमध्ये तिची घुसमट होत होती, त्यातून कोषातील अळीला सुंदर रंगीबेरंगी पंख फुटून त्याचे फुलपाखरू व्हावे तसे अनायाचे रूप बदलून आले.

हार्मोनल रिप्लेसमेंट थेरेपी घेतल्यावर आर्यनचा अनायापर्यंतचा प्रवास कसा होता, याची मलाही उत्सुकता होती. माझ्या मुंबईच्या एका मैत्रिणीमुळे मला अनायाची मुलाखत घेण्याचा योग जुळून आला. तिच्याशी संवाद साधताना, तिच्या भावूक शब्दांतून तिच्या मनातील संवेदना खूप काही सांगून जात होत्या.

सुरवातीची आठ-नऊ वर्षे गेल्यावर मला वेगळे कपडे, भावना आकर्षित करत होत्या पण 21 व्या वर्षी मी खोल आत्मचिंतन केले आणि इतकी सर्व वर्षे मी चुकीच्या शरीरात अडकल्याची जाणीव झाली. माझ्यातली एक कोमल स्त्री बाहेर येण्याची वाट पाहत होती ...पुरुषाच्या देहात माझ्या मनाची होणारी वेदना जेंव्हा मी माझ्या जवळच्या मित्रांकडे बोलून दाखवली, तेव्हा बहुतेकांना धक्का बसला.

पण माझ्या पालकांचा मला आधार मिळाला. हे सर्व समजून घेताना माझे वडील संजय बांगर यांची अवस्था बिकट झाली. पण मी माझ्या विचारांशी ठाम राहिले. कारण कोणाचा पाठिंबा असो वा नसो ... मला माझ्यात दडलेल्या स्त्रीला बाहेर काढायचे होते.” अनाया हे सर्व सांगताना अत्यंत भावुक झाली होती.

हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरेपीमध्ये शरीराला मेंदूशी जोडण्यासाठी ओस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन ब्लॉकर्सचा वापर केला जातो. ही थेरेपी घेऊन लिंगबदल जरी झाला, तरी गर्भाशय नसल्यामुळे अशांना मासिक पाळी येत नाही आणि गर्भधारणाही होऊ शकत नाही. परंतु काहीजण ही थेरेपी घेण्याआधीच सुरवातीलाच स्वत:चे शुक्राणू सुरक्षित ठेवतात, जेणेकरून भविष्यातील पर्यायासाठी ते कामी येतात. भविष्यातील पर्याय निवडण्यासाठी अशी व्यवस्था अनाया होण्याआधी तिने करून ठेवली आहे.

दीड वर्षे हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरेपी घेतल्यावर अनायाच्या शरीरात मोठा बदल घडून आला. सुरवातीला ही नवीन भूमिका सांभाळताना आधी जगलेल्या सर्व वर्षांचे दु:ख उफाळून आले तरीही या वेदनांना तिने एका उद्देशात रूपांतरित केले. सुदर्शन क्रियेसारख्या आध्यात्मिक पद्धतींद्वारे स्वत:ला प्रमाणिकपणाने जगासमोर आणले.

लिंग बदलानंतर होणारे शारीरिक बदल हे फार भावनिक स्वरूपाचे होते असे सांगताना अनाया म्हणाली, “ आपले शरीर हे अधिक मृदू होताना शरीराची गोलाई जाणवत होती. पण या शारीरिक बदलापेक्षा माझ्यात होणारे आध्यात्मिक परिवर्तन मला जास्त प्रेरित करून गेले.

मी स्वत:शीच अधिक हळवी होऊन गेले. स्त्रीची ऊर्जा ही फक्त दिसण्यापुरती मर्यादित नाही, तर ती तिच्या जगण्यातला स्वत:चा मोकळा श्वास घेण्यासाठी, स्वत:चे अंतरंग खुलवण्यासाठी आहे. माझ्यातला प्रत्येक बदल हा माझ्या अंतरंगात प्रवेश करत होता आणि मी माझ्या स्वत:च्या मूळ अंतरंगात प्रवेश करत होते.’’

आर्यन ते अनायापर्यंतच्या प्रवासाच्या बदलाला समाजासमोर आणणे हे अनायाला क्लेशदायक होते. एकाचवेळी असुरक्षित व त्याचबरोबर मुक्त होण्यासारखेही तिला वाटत होते. अनायाने आपल्या या प्रवासाची कहाणी सोशल मीडियावर टाकली आणि लगेच ती व्हायरल झाली. अचानक तिला सगळीकडून आमंत्रित करण्यात येऊ लागले. ‘मला काहींनी गोंधळलेली म्हटले तर काहींनी धाडसी म्हटले पण मी स्वत:शी प्रामाणिक राहिले’, असे अनाया सांगते.

अनायाचे वडील, संजय बांगर हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक असल्याने क्रिकेट हे अनायाच्या रक्तात आहे. लहानपणापासून क्रिकेटच्या क्षेत्रात चमकण्याचे ध्येय उराशी बाळगून क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची चमक दाखवलेल्या अनायाला आता महिला क्रिकेटमध्ये खेळता येईल की नाही हा मोठा प्रश्न आहे.

कारण 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना सांगितले होते की, कोण काय स्वीकारत आहे हा ज्याचा त्याचा स्वतंत्रतेचा प्रश्न आहे. अनेक पुरुष आणि महिला यांनी आपल्या इच्छेनुसार आपले लिंग परिवर्तन केले आहे.

Anaya Bangar Hormone Replacement Therapy
Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

लिंगबदल करून स्त्री झालेल्या व्यक्तीला स्त्रियांच्या खेळात भाग घेण्याची परवानगी नाकारली जाते. याबाबत अनायाला विचारले असता ती म्हणाली, ‘हे अन्यायकारक आणि अवैज्ञानिक आहे. म्हणूनच मी इतिहास घडवला’. दीड वर्षांच्या एचआरटी थेरेपीनंतर तिने आपल्या शरीराचा एक वैज्ञानिक रिपोर्ट तयार केला आणि दाखवून दिले की ती सीआयएस महिला श्रेणींमध्ये बसत आहे.

संपूर्ण बंदीऐवजी आपल्याला वैयक्तिक चाचणीची आवश्यकता आहे हे दाखवण्यासाठी तिने हा पुरावा आयसीसी आणि बीसीसीआयला पाठवला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हे त्यांचे मौन म्हणजेच सहभाग आहे असे अनाया मानते.

Anaya Bangar Hormone Replacement Therapy
World Cup 2023 साठी शार्दुल ठाकूरची निवड योग्य की अयोग्य? भारताचेच दोन दिग्गज भिडले

समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्या आपले मूळ अस्तित्व नाकारून जीवन जगत आहेत. त्यांना मनाची उभारी देताना अनाया सांगते, “तुम्ही जगातही एकटे नाही आहात. तुम्हाला तुमच्यातील स्त्री, तुमचे अस्तित्व, तुमचे सत्य कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. जगाने तुम्हाला काहीही सांगितले नसले तरी तुमची ओळख ही वैध आहे. मी अनाया होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहिली. पण तुम्हाला कोणत्याही मान्यतेची जरूरी नाही. तुम्ही तुमचीच मान्यता मिळवा !!....’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com