
बी. व्ही. जोंधळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हते तर जे- जे रंजले- गांजले आहेत त्या सर्वांचा कैवार घेणारे राष्ट्रीय लोकनेते होते. बाबासाहेबांचा दलितमुक्तीचा ध्येयवाद जरूर होता; पण मानवमुक्तीच्या सर्व प्रवाहांना बरोबर घेऊन त्यांच्या भौतिक सुधारणांचा प्रयत्न करतानाच भारतीय राज्यघटनेत सर्वच उपेक्षित घटकांच्या ‘दुःखमुक्तीचा जाहीरनामा’ही त्यांनी समाविष्ट केला.
बाबासाहेब सर्वच वंचित- शोषित- पीडित घटकांच्या प्रश्नावर संसदेत आणि संसदेबाहेर बोलत राहिले, आंदोलने करीत आले आणि हे सर्व करताना देशाची एकात्मता दुभंगणार नाही, याचीही काळजी घेत आले.
दलित, वंचित, बलुतेदार, आलुतेदार, आदिवासी, भटके विमुक्त, स्त्रिया, ओबीसी, शेतकरी, कामगार, कष्टकरी, श्रमिकांच्या उन्नतीसाठी व विषमतेच्या चरकातून त्यांची मुक्ती करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करून कार्यक्रम आखला, लढे उभारले, तरी आपल्या जातव्यवस्थेने बाबासाहेबांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून फक्त ‘दलितांचे कैवारी’ ठरविले. वास्तव असे की, देशातील राजकीय आणि सामाजिक व्यवस्था सर्वांच्या कल्याणाची असावी, यासाठी ते झटत आणि झगडत आले.
बाबासाहेबांनी कापड गिरणीकामगार; तसेच रेल्वे, खाण, चहा मळे आदी क्षेत्रातील कामगारांच्या चळवळी केल्या. केंद्रात मजूरमंत्री या भूमिकेतून कामगारहिताचे अनेक निर्णय घेतले. कामगारांच्या कामाचे तास व स्त्री-पुरुषाना समान वेतन हे धोरण निश्चित करण्यात आले. महिलांसाठी प्रसूतीपूर्वी १० आठवडे आणि प्रसूतीनंतर चार आठवडे रजा द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. महागाई निर्देशांकानुसार भत्ता मंजूर झाला.
स्त्रियांच्या प्रगतीचा विचार
स्त्रियांची प्रगती, स्त्रीशिक्षण, स्त्रियांचे आरोग्य, कुटुंबनियोजनातील स्त्रियांची जबाबदारी, संपत्तीमध्ये स्त्रियांचा वारसाहक्क, स्त्रियांची मानसिक, लैंगिक छाळातून मुक्तता, द्विभार्या प्रतिबंध यासाठी बाबासाहेबांनी आपला आवाज बुलंद केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बऱ्याच जणांचा विरोध असताना बाबासाहेबांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्याच्या प्रस्तावास घटनासभेची मान्यता मिळविली आणि हिंदू स्त्रियांच्या प्रगतीसाठी व त्यांना समान हक्क मिळवून देण्यासाठी हिंदू कोड-बिल आणले; ते नामंजूर होताच कायदेमंत्रीपदाचाही राजीनामा दिला.
बाबासाहेबांनी शेतीप्रश्नाचे मूलभूत चिंतन केले होते. छोटा शेतकरी हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. भारतातील शेतीसमस्येवर उपाय म्हणून सहकारी तत्त्वावर शेती करण्याचा, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी पीकविमा विकसित करण्याचा, शेतजमिनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा, शेतीसाठी आधुनिक अवजारे पुरविण्याचा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी त्यांच्या मजूर पक्षाच्या वतीने १० जानेवारी १९३८ रोजी मुंबई प्रांतिक विधिमंडळावर मोर्चाही नेला होता.
आणि कोकणातील खोतशाहीविरुद्ध त्यांनी आंदोलनही केले होते. शेती आणि उद्योगांचा विकास झाला तर शेतीवरील भार कमी होऊन शेतकरी स्वतःच स्वतःची भांडवली गुंतवणूक शेतीत करू शकेल. शेतीतील गुंतवणूक वाढली तर शेतीचे उत्पन्न वाढेल व शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि गरीब कुटुंबीयांची गरीबी संपेल, असे भारतीय समाजजीवनाचे सुंदर चित्र बाबासाहेबांनी पाहिले होते.
बाबासाहेब कायम प्रागतिक चळवळीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या वकिलीच्या प्रवासात त्यांनी दोन खटले दलितेतरांच्या बाजूने लढविले. यापैकी एक सत्यशोधक दिनकरराव जवळकर यानी १९२५ साली लिहिलेल्या ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकासंदर्भात होता. ब्राम्हणांवर टीका असलेल्या या पुस्तकास केशवराव जेधे व केशवराव बागडे यानी प्रस्तावना लिहिली होती.
या पुस्तकाच्या संदर्भात कृ. म. चिपळूणकर यांनी जवळकर, जेधे, बागडे यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. दुसरा खटला र. धो. कर्वे यांच्या १९३१ च्या ‘समाजस्वास्थ्य’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ‘व्यभिचाराचा प्रश्न’ या लेखाच्या निमित्ताने गुदरला गेला. या दोन्ही खटल्यातील आरोपींचे वकील बाबासाहेब होते. या खटल्यांचा दलितांच्या प्रश्नांशी संबंध नव्हता.
सामाजिक चळवळ गतिमान करण्याच्या उद्देशाने बाबासाहेबानी हे खटले विनामोबदला लढविले. यशापयशाचा मुद्दा गौण होता. बाबासाहेबांची सामाजिक परिवर्तनाची भूमिका येथे महत्त्वाची होती. मात्र याचा अर्थ बाबासाहेब ब्राह्मणद्वेष्टे नव्हते. ‘‘महाडच्या सत्याग्रहात कोणाही ब्राह्मण व्यक्तीस सहभागी करून घेऊ नये, अशी सत्याग्रहास पाठिंबा देण्याची अट घालणाऱ्या जेधे-जवळकरांना एक जुलै १९२७ च्या ‘बहिष्कृत भारत’मधून उत्तर देताना बाबासाहेब लिहितात, ‘‘आम्ही ब्राह्मणांच्याविरुद्ध नाही, आमचा कटाक्ष ब्राह्मण्यावर आहे.
ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असे आम्ही समजतो. या भावनेने प्रेरित झाल्याने ब्राम्हण्यग्रस्त ब्राम्हणेतर हा आम्हास दूरचा वाटतो व ब्राह्मण्यविरहित ब्राह्मण आम्हाला जवळचा वाटतो.’’
शोषणमुक्तीचा विचार
देशातील प्रत्येक व्यक्तीच्या शोषणमुक्तीचा विचार करणाऱ्या बाबासाहेबांकडे देशविकासाची उत्तम दृष्टी होती. मजूरमंत्री असताना त्यांच्याकडे बांधकाम, पाटबंधारे, ऊर्जा ही महत्वाची खाती सुद्धा होती. त्यावेळी बाबासाहेबांनी सिंचन, रस्ते, दळणवळण, वीज, उद्योग यासह अनेक बाबींचा विचार करून विकासयोजना राबविल्या. पाटबंधारे मंत्री म्हणून बिहार आणि पश्चिम बंगाल सरकारच्या समन्वयातून दामोदर खोरे प्रकल्प विकसित केला; तर ओडिशा राज्यातील महानदीवर हिराकुंड प्रकल्प उभारला. नदी जोड प्रकल्पांची निर्मिती केली.
डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर गरीब माणसाची चिंता वाहिली. त्यांची उन्नती झाल्याशिवाय राष्ट्रउभारणी होऊ शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. बाबासाहेब प्रखर राष्ट्रवादी होते. समाजाला विज्ञाननिष्ठ डोळस करण्यासाठी त्यांनी आत्मा, पुर्नजन्म, कर्मकांडाचा विचार नाकारला. त्यांनी बुद्ध धम्माचा मार्ग समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची वाट सुकर करण्यासाठीच स्वीकारला.
विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ असलेला बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या बाबासाहेबांनी राष्ट्र आणि धर्म या बाबी सर्वस्वी वेगळ्या असल्याचे ठाम प्रतिपादन केले. बाबासाहेबांचे हे चिंतन आजची देशाची राजकीय वाटचाल पहाता अस्वस्थ व्हायला होते. डॉ. आंबेडकर दलितांचेच नव्हे, तर जनतेचे नेते म्हणून बाबासाहेबांच्या सामाजिक विचारांचे पुन्हापुन्हा स्मरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.