पणजी: गोव्यात सर्व प्रकारचे उच्चशिक्षण उपलब्ध आहे. पण शेतीविषयक शिक्षण देणारे महाविद्यालय किंवा विद्यापीठ नाही. यासाठी दापोली कृषी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करून राज्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येईल. शक्य झाल्यास येत्या जूनपासून सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि महाराष्ट्र सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चरल इकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24 व्या राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेत ते बोलत होते. जुने गोवे येथील फर्न कदंब हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमास पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषिमंत्री रवी नाईक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आणि महात्मा फुले विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील राज्याचे कृषी संचालक डॉ. नेविल अल्फान्सो, आयसीएआर गोवाचे संचालक डॉ. प्रवीण कुमार, दापोली कृषी महाविद्यालयाचे सहअधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, डॉ. जुझे फालेरो, डॉ. संजय भाले, डॉ. सतीश नार्खेडे, राजीव कुमार उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, देशातील 65 टक्के लोक कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. देशाच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. 1950-51 मध्ये देशात 50 मे.टन धान्य पिकत होते. तर आज 2020-21 मध्ये सुमारे 303 मिलियन मे. टन धान्य उत्पादन होते. भाजीपाल्याचे 331 मिलियन मेट्रिक टन उत्पादन होते. वाढत्या कृषी क्षेत्रामुळे देशातील उद्योग, व्यापार, व्यवसाय वाढीस फायदा होत असल्याचे नाईक म्हणाले.
यावेळी आयसीएआरचे संशोधक डॉ. श्रीपाद भट यांनी यंत्र शिक्षण आणि कृषी विपणनमधील कौशल्य यावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रकाश महिंद्रे यांनी स्वागत केले. डॉ. संजय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेला मोठ्या संख्येने निमंत्रित लोक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.