Goa News: खवय्यांसाठी थोडी खुशी थोडा गम, ‘मानकुराद’ चा दर घटला मात्र मासे महाग

राज्यात पापलेट 1000, इसवण 700, बांगडे 200 रुपये किलो
Mango, Fish
Mango, FishDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News राज्यात मासळीच्या दरांत अव्वाच्या सव्वा वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मासळी परवडत नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात बाजारात आंबे दाखल होऊ लागल्याने मानकुरादसहित इतर आंब्याच्या दरात घट झाली आहे.

इसवण 700 तर पापलेट हजार रुपये किलो झाले आहे. गेल्या आठवड्यात दीडशे रुपये किलो दराने मिळणारे बांगडे आता 200 रुपये किलो तर मोठ्या आकाराचे बांगडे 300 रुपये किलो दराने विकले जात आहेत.

आज पणजी बाजारात मध्यम आकाराचा मानकुराद दीड हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात होता. हापूस हजार रुपये दराने विकला जात आहे.

महिन्याभरापूर्वी 5 हजार रुपये प्रतिडझन दराने मानकुराद विकत होते. एकीकडे मासळीचे दर वाढले आहेत, तर आंब्यांचे दर घटले आहेत त्यामुळे खवय्यांसाठी थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती आहे.

मुबलक प्रमाणात मासळी उपलब्ध

लेपो 250 ते 300 रुपये, सुंगटे (कोळंबी) आकाराप्रमाणे 300 ते 500 रुपये किलो अशी विकली जात आहेत. तारलेदेखील 150 ते 200 रुपये किलो दराने विकले जात आहेत. आज पणजी मासळी बाजारात इसवण, कर्ली, लेपो, माणकी, खुबे, कोळंबी, समुद्री खेकडे आदी विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात विक्रीस उपलब्ध होती.

सकाळी 9 च्या सुमारास मासळी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ अधिक होती. काही मासळी विक्रेते किलोच्या दरात विकत होते; तर काही प्रतिवाटा दराने विकत होते. वाट्याला लहान बांगडे 150 रुपयांना 8 ते 10 या दराने उपलब्ध होते.

Mango, Fish
Ponda Municipal Election 2023: खडपाबांधमधील अनेक विकासकामे रखडली

दरवाढीची शक्यता : मासळीचे कालवण (हुमण), फिश फ्रायचा आस्वाद घेण्यासाठी अनेक खवय्ये तसेच पर्यटक गोव्यात येतात. मात्र, मासळीच्या दरवाढीमुळे मासळी प्लेटचाही दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांना तर दररोजच्या जेवणात मासळी लागतेच. त्यामुळे ते ती खरीदणारच.

शेजारील राज्यात मासळी स्वस्त

शेजारील महाराष्‍ट्रात शंभर रुपयांना दहा ते पंधरा बांगडे दिले जातात. इतर मासळीचे दर देखील तुलनेत कमी आहेत.

परंतु गोव्यातच मासळीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

गोव्यातील विक्रेते मोठ्या प्रमाणात मासळीचे दर का वाढवतात? एवढी महाग मासळी का विकली जाते? असे प्रश्‍न अनेक मत्स्यप्रेमी उपस्थित करत आहेत.

हापूस, पायरी आंबेही बाजारात दाखल

मानकुराद आंब्यासोबतच हापूस, पायरी, शेंदुरी, शाबेर अशा विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले असून आठशे-हजार दरम्यान प्रतिडझन दराने विकले जात आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना एवढी रक्कम देऊन आंब्याची चव चाखणे शक्य नसल्याने किमतीत घट होण्याची वाट पाहिली जात आहे.

पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्‍याचे उत्पादन वाढेल, त्यावेळी सर्वांना परवडण्यायोग्य दर होईल, असे विक्रेते सांगतात. पिकलेल्या मानकुराद आंब्यांचे उत्पादन कमी असले तरी मोठ्या प्रमाणात कच्च्या कैऱ्या बाजारात दाखल होत आहेत. आकाराप्रमाणे दरात चढउतार आहे.

फळांना वाढती मागणी : राज्यात उकाडा वाढल्याने अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात कलिंगड, मोसंबी, सफरचंद, द्राक्षे तसेच इतर रसदार फळे खरेदी करताना दिसत आहेत.

त्यामुळे फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कलिंगडाला इतर फळांच्या तुलनेत अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

Mango, Fish
Subhash Shirodkar: शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी जलसंसाधन खात्याने घेतलाय 'हा' महत्वाचा निर्णय

भाजीपाल्याचे दर स्थिर : राज्यात भाजीपाल्याचे दर गेल्या महिन्याभरापासून स्थिर आहेत; परंतु हिरव्या मिरचीने तोंडचे पाणी पळविले आहे. हिरवी मिरची 120 रु. प्रति किलो दराने विकली जात आहे.

मिरचीला चांगला भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात उत्पादन घेतले. परिणामी मिरची उत्पादनात घट झाली. त्यामुळे मिरचीचा तुटवडा भासत असल्याने दरात वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगतात.

लिंबांनी फोडला घाम : राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढल्याने नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यात लिंबू पाणी, लिंबू सरबत, लिंबू सोड्याचे सेवन अधिक प्रमाणात होत असल्याने लिंबांना मागणी वाढली आहे.

2 रुपयांना एक मिळणारे लिंबू आज 5 ते 7 रुपयांना मिळत आहे. लिंबाच्या दराने ग्राहकांना घाम फोडलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com