Goa Loksabha 2024 Result: उत्‍कंठा, हुरहूर आणि बरेच काही! रात्री झोप लागते का? गोव्यातील उमेदवारांच्या प्रतिक्रिया

Goa Loksabha 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 04 जून रोजी लागणार असून, याबाबत गोव्यातील उमेदवारांना काय वाटतं याचा घेतलेला धांडोळा.
Goa Loksabha 2024
Goa Loksabha 2024Dainik Gomantak

‘ज्‍यासाठी केला होता अट्टहास’... अशा लोकसभा निवडणुकीच्‍या निकालास पाच दिवस (४ जून) बाकी आहेत. जसजसा प्रत्‍येक दिवस पुढे जातोय, तसतशी उमेदवार तसेच नेत्यांची उत्‍कंठा आणि हुरहूर वाढते आहे.

यासंदर्भात त्‍यांचे रोचक अनुभव काय आहेत? मतदानानंतर दिवस कसे गेले? रात्री झोप लागते का? सध्‍या काय विचार आहेत मनात? निवडून आल्यास पहिले प्राधान्य काय असेल? याचा घेतलेला धांडोळा.

मतदानानंतर मिळाला आराम, विजयाची मला पूर्ण खात्री!

North Goa Lok Sabha Constituency | shripad naik
North Goa Lok Sabha Constituency | shripad naik

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी, कार्यकर्ते व पक्ष प्रचारात सहभागी झालो. मतदानानंतर आढावा घेण्यासाठी आम्ही लोकांच्या पुन्हा गाठीभेटी घेतल्या. या काळात लोकांची मते जाणून घेतली.

त्यातून लोकांनी सहाव्यांदा मला व भाजपाला आशीर्वाद दिल्याचे अधोरेखित झाले आहे. यावर निकालादिवशी शिक्कामोर्तब होईलच, असे भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

राहिला प्रश्न उत्कंठतेचा तर आम्ही सकारात्मक आहोत. ज्याप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळाला यातून आम्ही सरशी घेणार हे निश्चित. तसेच मध्यल्या काळात आराम करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ मिळाला. मध्यंतरी प्रचाराच्या काळात झोपायला उशीर व्हायचा व पुन्हा सकाळी लवकर उठायचो. तसेच मतदान झाल्यानंतर पुन्हा दिवसाला शेकडो कार्यकर्ते व लोकांचे फोन असतात. त्यातून जनसंपर्क चालूच असतो.

निवडून आल्यानंतर गोव्यात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याला पहिले प्राधान्य देणार आहे. यासाठी कौशल्य विकासावर भर देऊन खासगी व इतर क्षेत्रात युवकांना नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात यासाठी जास्त प्रयत्न करणार आहे, तसेच गोव्यातील इतर प्रश्न व अडचणी सोडविण्यावर भर असेल. तसेच अधिकाधिक प्रमाणात जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीन.

माझ्यापेक्षा कार्यकर्ते उत्सुक; कामांची यादी आधीच तयार

Ramakant Khalap | Goa News
Ramakant Khalap | Goa News Dainik Gomantak

मतदानानंतर आम्ही सर्व ठिकाणांचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्ते, नेतेमंडळी व लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यातून आमचा विजय निश्चित आहे. निकालाची उत्कंठा माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना अधिक आहे.

याशिवाय फोनवरून आमचा जनसंपर्क सुरूच आहे. उत्तरेतून काँग्रेस शंभर टक्के बाजी मारणार यात कुठलाही वाद नाही, असे काँग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार रमाकांत खलप यांनी सांगितले.

राहिला प्रश्न झोपेचा तर झोप निवांत लागते. कारण माझ्यासाठी ही काही पहिलीच निवडणूक नव्हती. यापूर्वी अनेक निवडणुका व राजकारणाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे विजयाची खात्री आहे. तसेच उत्तरेतून केवळ एकमेव विधानसभा आमदार काँग्रेसचा आहे. उर्वरित सत्ताधाऱ्यांचे आहेत. अशा परिस्थितीत मी हे अग्निदिव्य नक्की पार करीन. चटका बसेल; परंतु यशाचा भरवसा आहे.

तसेच लोक स्वतःहून फोन करून काँग्रेसच्या विजयाची हमी देत आहेत. दोन दशके राजकारणात सक्रिय नसलो तरी समाजकार्यात मी सक्रिय होतो. मी कधीच राजकारणच सर्वस्व किंवा लोकप्रतिनिधी बनावे, असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले नाही. येत्या ४ जूनला गोमंतकीयांची पोचपावती मलाच मिळणार आणि निवडून येताच, कामाचे प्राधान्यक्रम ठरलेले आहे. कामाची यादी मी आधीच तयार करून ठेवली आहे.

दबाव नाही वा चिंता नाही; लोकांचे प्रश्‍‍न सोडविणार

South Goa Congress Candidate Viriato Fernandes
South Goa Congress Candidate Viriato FernandesDainik Gomantak

मतमोजणीला केवळ सहा दिवस राहिले तरी आपल्या मनावर कसलाही दबाव किंवा चिंता नाही. मतदानात लोकांनी जो जोश व उत्साह दाखविला, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला ते पाहता माझाच विजय होईल. लोकांना केवळ ‘ईव्हीएम’बद्दल शंका आहे.

कित्येकजण मला ‘ईव्हीएम’ सुरक्षित आहेत ना, हाच एकमेव प्रश्र्न विचारत आहेत. ‘ईव्हीएम’ हे नेता निवडण्याचे माध्यम आहे व त्यावरच लोकांचा विश्र्वास नसेल तर लोकशाही धोक्यात आहे, असेच म्हणावे लागेल, असे इंडिया आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

निवडून आल्यास गोमंतकीयांचे दुःख कमी करण्याचा आपला प्रयत्न राहील. सध्या गोव्यात भ्रष्टाचार, लाचलुचपत या प्रकारांत भयंकर वाढ झाली आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या दुःखात वाढ झाली आहे. निवडून आल्यास आपण गोव्याचा नाश होणार नाही याकडेही जास्त लक्ष पुरवीन. नद्यांचा राष्ट्रीयीकरणापासून बचाव करीन व म्हादई नदी सांभाळण्यासाठी प्रयत्न करीन. जमीन संपादन कायद्यामध्ये बदल करून गोव्याच्या जमिनींचे रक्षण करीन.

मतदानानंतर आपण दक्षिण गोव्यातील सर्व मतदारसंघांचा दौरा केला. सर्व कार्यकर्त्यांना व मतदारांना भेट दिली व त्यांचे आभार व्यक्त केले. आमच्यापुढे आर्थिक संकट होते; पण लोकांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. प्रचारावेळी फिरताना लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत होते. मला लोकांचा अभिमान वाटतो. निकाल आमच्या बाजूनेच लागेल यात शंका नाही.

मूलभूत प्रश्‍नांवरून आवाज उठवणार : रिव्हॉल्युशनरी गोवन्स

Viresh Borkar | Goa News
Viresh Borkar | Goa News

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून गोवेकरांनी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान केले आहे. विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय जनतेने ‘आरजी’ला भरभरून प्रेम दिले होते, तेव्हा आम्हाला १० टक्के मते मिळाली होती.

आता लोकसभा निवडणुकीतही आमच्या मतांची टक्केवारी वाढणार आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आम्ही पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत विषयांना प्राधान्य देणार आहोत, असे विधान सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

राज्यात आजही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. विजेचीदेखील मोठी समस्या असून काही घरांचे आजही विद्युतीकरण झालेले नाही, तसेच रस्त्यांची समस्या ही गंभीर आहे. त्याशिवाय केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांची पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. ही पदे गोमंतकीयांना मिळणार याची खात्री आम्ही करून घेणार आहोत, असा दावा बोरकर यांनी केला.

गोवेकरांनी आमच्यासाठी मतदान केले असून दोन्ही उमेदवार विजयी होणार आहेत. ‘आरजी’चा हेतू लोकांपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवला आहे. प्रचारादरम्यान आम्हाला अनुभव आला, की भाजपच्या कार्यकाळात जनता त्रस्त आहे. बेकारी, महागाईसारख्या ज्वलंत समस्या शिखरावर आहेत. सरकारकडून जनतेसाठी काहीही केले जात नसल्याने जनतेत तीव्र नाराजी आहे.

म्हादई, खाण उद्योग आणि पर्यावरण जतनासाठी आग्रही

amit palekar
amit palekar Dainik Gomantak

लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम गोव्याची जीवनदायिनी म्हादईचा जलतंटा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी झुंजणार, तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी संसदेत हा विषय मांडणार आहोत.

यंदा आम्ही इंडिया गट म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, तेव्हा दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते, तरीदेखील मतदानाच्या दिवशी अनेकजण झाडू चिन्ह शोधत होते, अशी माहिती ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

म्हादई जलतंटा विषय हा न्यायालयाच्या बाहेर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सहमती न झाल्यास संसदेत हा विषय मांडून त्याचे निवारण करण्याचाही पर्याय आहे.

त्याशिवाय बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे; कारण गोमंतकीय जनतेशी तो निगडित आहे. भाजप केवळ तारखा देत आले आहे, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन वर्षांनंतर खाणी सुरू होणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली आहे.

निवडणुकीत प्रचारादरम्यान एक गोष्ट लक्षात आली की यंदा मूक मतदान होणार आहे. लोकांच्या मनात भीती असल्याने आवाज न करता गुपचूप मतदान करून आले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल कोणत्या बाजूने जाणार हे सांगता येणार नाही. भाजपकडून आपण जिंकणार असल्याचा दावा केवळ दिशाभूल करणारा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com