पणजी: अपघातामुळे दरवर्षी गोव्यात शेकडो लोकांना जीव गमावावा लागतो. २०२४ मध्ये देखील अपघाताचे सत्र सुरुच असून, यावर्षी गेल्या सहा महिन्यात १६५ जणांचा अपघातात बळी गेला आहे.
पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अपघातांची संख्या कमी झालीय. २०२३ मध्ये पहिल्या सहा महिन्यात १६४ जण दगावले होते. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून २०२४ मध्ये १,३८७ अपघातांची नोंद झाली असून, याच काळात गेल्यावर्षी १,४७७ अपघात नोंदवले गेले.
रस्त्यावर तळीराम चालकांचे राज्य?
२०२४ मध्ये गेल्या सहा महिन्यात गोवा पोलिसांकडून २,३०० ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणे नोंदविण्यात आलीयेत. २०२३ मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत ५८५ प्रकरणांची नोंद झाली होती.
तर जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १,८५८ ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणे समोर आली होती. २०२२ मध्ये हेच प्रमाण १,५०९ ऐवढे होते. आकडेवारी पाहता यावर्षी ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये ३२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अपघातामध्ये पादचारी दगावल्याच्या घटनेत एकाने वाढ झाली आहे. यावर्षी जूनपर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्यावर्षी २१ पादचारी लोकांनी अपघातात जीव गमावला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. २०२२ मध्ये पहिल्या सहा महिन्यात तीन लाख चालकांविरोधात कारवाई करण्यात आली तर, यावर्षी यावर्षी २.४ लाख घटना नोंदविण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोळा केल्या जाणाऱ्या दंडात २० टक्के घट झाली आहे.
गेल्या सहा मिहिन्यात वाहतूक उल्लघंन केल्याप्रकरणी १४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला तर गेल्या वर्षी सहा महिन्यात १८ कोटींचा दंड वसुलण्यात आला आहे.
गोवा सरकारने राज्यातील साडे पाच हजार किमी रस्त्यांपैकी साडे चार हजार मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
गोव्यात २०२३ मध्ये एकूण २,८४६ अपघातांची नोंद झाली. यापैकी २,०७२ अपघात ग्रामीण भागात तर केवळ ७७४ अपघात शहरी भागात झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.