Margao History: गोव्यात निर्माण झालेले पहिले शहर, दामोदर देव घोड्यावर स्वार होऊन करतात राखण; संस्कृतीच्या खुणा जपणारे 'मठग्राम'

Margao City History: नैसर्गिक झरी व तलावाचे पाणी, निर्भेळ शांतता आणि अन्नधान्य पिकवण्यासाठी सुपीक जमीन यातून जन्मलेले, विस्तारलेले मडगाव शहर त्या झरींना, तलावांना विसरले आहे.
Margao City History Old Photo
Margao City History GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

गोव्यात निर्माण झालेले पहिले शहर कोणते असेल तर ते म्हणजे मडगाव, असे तज्ज्ञ मानतात. गोव्यातील प्रमुख शहरात मडगावला अग्रक्रम आहे. आजच्या घडीस अनेक क्षेत्रांत मडगाव शहराचा वावर पाहिल्यास अचंबित व्हायला होते. कला, क्रीडा, विद्या, व्यापार, फळफळावळ, संस्कृती, उत्सव, राजकारण, अशा अनेक क्षेत्रांत मडगावचा नावलौकिक आहे.

गोव्यावर अनेक राजवटींनी राज्य केले. त्यांच्या कालखंडात बौद्ध, जैन, मुसलमान, ख्रिश्चन असे अनेक पंथ विस्तारले. त्यांच्या खाणाखुणा या शहराने जपून ठेवल्या आहेत. बौद्ध गुंफा, जैन गुंफा, चर्च, देवळे, मशीद येथे आहेत. संस्कृतींच्या खुणा जपणारे हे शहर खऱ्या अर्थाने ओळखले जाते ते व्यापारासाठी आणि कृषीधान्यासाठी. साळ नदीच्या काठावर खारेबांध नावाने ख्यातकीर्त बंदरावर पूर्वी परकीय जहाजे येऊन व्यापाराची देवाण घेवाण करीत होती.

नंतरच्या काळात चांदोर, (गोवा वेल्हा) गोपकापट्टणम, पणजी, जुने गोवे, आणि आजचे विशाल मुरगाव बंदर व्यापाराच्या देवाणघेवाणीची केंद्रे झाली. मात्र कोणत्याही जागी शहराची निर्मिती व विकास होण्यास सर्व प्रथम गरज लागते ती पाण्याची. आज मडगाव शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला तो साळावली आणि कुशावती धरणातील पाण्यावर. पण, हे प्रकल्प येण्यापूर्वी मडगाव शहरात प्रत्येकाच्या घरी विहिरी होत्या. व्यापारी केंद्राचे शहर होण्यास हातभार लावला तो इथल्या मोती डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दोन नैसर्गिक झरी आणि एक तलाव यांनी.

झरी व तलावाच्या पाण्याने येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांना वस्ती करण्यास भाग पाडले. पोर्तुगीज राजवटीने जुलूम जबरदस्तीने येथील लोकांचे ख्रिस्तीकरण केले. पण, स्थानिकांनी त्यांची कृषीसंस्कृती सोडली नाही; सोबतच व्यापार व दामोदर देवावरील भक्तीही सोडली नाही. तलाव, झरीच्या पाण्यावर जगणाऱ्या लोकांची ताकद ते नष्ट करू शकले नाहीत. कारण, झरीच्या, तलावाच्या पाण्यावर जगलेल्या मठग्रामस्थांचे पाणीच वेगळे होते.

काहीजण बाटाबाटीच्या भयाने आपली दैवते घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेले, पण तिथे राहिलेल्या काही पूर्वजांनी देव आणि देवस्थाने सोडली नाहीत. आज मडगावात फातोर्ड्याचे दामोदर लिंग, पिंपळा-पेड, हरिमंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, दामोदर साल या स्थळांना मोठे देवत्व प्राप्त झाले आहे. बाटाबाटीच्या काळी दामोदराची मूर्ती केपे तालुक्यातील जांबावली ठिकाणी नेऊन पुजण्यात आली.

दामोदर देव घोड्यावर स्वार होऊन मडगाव शहराची राखण करतात, असे तिथले भाविक मानतात. मडगाव शहराचा परिसर म्हणजे जुना बाजार, घोगळ, बोर्डा, आके, मालभाट, पाजीफोंड, शिरवडे, सारवडे, कालकोंड, दवर्ली, नवा बाजार आणि कोंब. त्यात मध्यवर्ती असलेला मोती डोंगर हा शहराचा राजमुकूट आहे.

पूर्वी मोती डोंगराच्या सभोवार मैदानी भाग होता. तिथे कष्टकरी पूर्वज शेती करून आपणास लागणारे धान्य आणि भाजीपाला पिकवीत होते. मोती डोंगराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या आनाफोंत झरीचे पाणी लोक पिण्यास वापरत होते.

शिवाय धोबी लोक खालच्या भागात कपडे धूत होते. त्या झरीचा उगम मोती डोंगराच्या पायथ्याशी होऊन ती साळ नदीच्या बाजूने वाहण्यास सुरुवात करते. कोंब भागातून जमिनीखालून म्हशीच्या तलावाकडे जाते. तलावाचे पाणी सोबत घेऊन ओहोळाच्या रूपाने पुढे जाते. मार्गात लागणाऱ्या भल्या मोठ्या परिसरातील शेतीला पाणी पुरवत साळ नदीत आपल्या गोड पाण्याचे मीलन घडवून खारे पाण्यात जैवविविधता जन्मास घालण्यास मदत करते.

खरं म्हणजे खारेबांधपर्यंतच तिला साळ नदी म्हणणे योग्य ठरेल. त्या वरच्या भागात ती ओहोळाच्या आकाराने शेतातून नुवे गावच्या परिसराला खारे, गोड पाणी देते. वरच्या भागात दोन ओहळ बनून एक फाटा कासावली गावातून प्रवास करीत वेर्णा पठाराच्या उंचावर जात झरीचे रूप घेतो, दुसरा फाटा नुव्याकडून वेर्णा पठाराच्या पायथ्याशी उंचावरील भागात दुसऱ्या झरीचे रूप घेतो. मोती डोंगराच्या पायथ्याशी आके भागातून तळसा झर नावाने वाहत मडगाव शहरातून प्रवास करीत तो ओहळ खारे बांध परिसरात साळ नदीस मिळतो.

शहरात दुकाने उभारण्यासाठी दवर्ली परिसरात चिरे काढून ते दगड शहरात आणून बांधकाम करण्यास आले होते, हे दवर्लीच्या भागातील चिरेखाणीवरून कळते. आज मडगाव शहराने आपला पसारा वाढवल्याने काही खाणी पुरून त्या जागी बांधकामे उभी ठाकली आहेत. त्यामुळे दवर्लीचे पर्यावरणीय सौंदर्य आज लोप पावलेले दिसते.

माझ्या बालपणी मडगावला गेल्यावर रस्त्याच्या बाजूला अगर नजीकच्या भाटात आंबा, फणस, माड पाहावयास मिळत होते. रस्त्याने जाताना नेमके कुठे जायचे हे समजत होते. आज शहरात फिरताना सारेच बदललेले पाहावयास मिळते. नवख्या माणसाला एखाद्या ठिकाणी जाण्यास विचारपूस करावी लागते. काही का असेना, प्राचीन काळापासून या शहराने अनेक राजवटी पाहिल्या. साहित्य, कला, शिक्षण, राजकारण, विद्यामंदिरे, देवालये, एकीकरण, हे सर्व घेऊन दुसऱ्यांना पुरवले आहे. तिथला एखादा माणूस जगाचा निरोप घेऊन जाताना चिरशांती मिळावी, म्हणून एखाद्या देवालयाप्रमाणे दिसणारी शांतीभूमी त्या शहरात पाहावयास मिळते.

गेल्या शतकात पोर्तुगीज राजवटीत दोन व्यक्तींनी मडगाव शहरास भेट दिली होती. एकाने संस्कृतीचे महत्त्व पटवले तर दुसऱ्याने स्वातंत्र्याचे. त्यांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झाले. संपूर्ण गोवा ही ऊर्जा घेऊन पुढे गेला. स्वामी विवेकानंदांनी मडगावातून राशोल सेमिनरीत प्रवचन दिले. हिंदू आणि ख्रिश्चनांचे सांस्कृतिक संलयन घडवले.

Margao City History Old Photo
Old Goa History: सफर गोव्याची! खिलजीच्या आक्रमणानंतर मांडवी किनाऱ्यावरच्या 'हेळे'ला राजधानीचा दर्जा लाभला

याच एकोप्याचा लाभ; डॉ. राम मनोहर लोहियांनी क्रांतीची ज्योत पेटवली तेव्हा झाला. गोव्यात पोर्तुगीज गुलामगिरीविराधात लढा उभा राहिला व क्रांती घडली. देव दामोदर या दोघांच्या रूपाने मडगावात अवतरला असावा, असे मी मानतो. इतिहासाची ही सुवर्णपाने मडगाव शहरात लिहिली गेली.

आनाफोंत झर, तळसा झर, म्हशीचे तळे आणि फातोर्ड्याचे दामोदर तलावातील पिण्याचे पाणी या नैसर्गिक जलसाठ्यांनी मडगाव शहर साळ नदीच्या काठावर जन्मास घातले.

Margao City History Old Photo
Vasco: नाला, तळ्यातील पाणी झाले ‘काळेकुट्ट’! मेस्तवाडा- मायमोळेतील प्रकार; लपून सांडपाणी सोडले असल्याची उलटसुलट चर्चा

शहरास विहिरीच्या पाण्याने मोठे केले आणि त्याला कृत्रिमपणे सजवण्याचे काम कुशावती आणि साळावलीच्या पाण्याने केले. नागर वस्ती ज्या झरींनी, तलावामुळे जन्मली, वाढली त्याच नागरिकांचे आपण वंशज त्यांचे ऋण त्यात प्लास्टिक कचरा व प्रदूषके टाकून फेडत आहोत. या झरी बकाल वस्तीने सोडलेल्या सांडपाण्याने, फेकलेल्या प्लास्टिकने भरून गेल्या आहेत. नैसर्गिक झरे साळ नदीकडे ओहळ रूपात खालच्या भागात जाताना प्रदूषित पाणी, प्लास्टिक आणि घनकचऱ्याने भरून गेलेले पाहावयास मिळतात. हे प्रदूषण थांबवलेच पाहिजे. या झरींना, तलावांना त्यांच्या नैसर्गिक, मूळ व शुद्ध रूपात जपले पाहिजे. निदान एवढे तरी आपण त्यांचे देणे लागतो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com