
‘नावात काय आहे?’ असं कुणीतरी म्हटलंय. कुणीतरी काय? अहो, शेक्सपिअरनेच म्हटलंय !.. आणि तुम्हांला हे सांगण्याकरता मला शेक्सपिअरचे नाव सांगावेच लागले. आता शेक्सपिअर म्हणजे कोण? हे नाव घेताच ‘ओथेल्लो’, ‘हेम्लेट’, ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ , ‘ज्युलियस सीझर’सारखी अजरामर नाटके लिहिणारा नाटककार किंवा ‘व्हीनस अँड अॅडॉनिस’, ‘अ लव्हर्स कम्प्लेंट’ अशी रचनात्मक काव्ये लिहिणारा कवी अशी त्याची छबी डोळ्यांसमोर येते. अर्थात त्याने केलेल्या कार्याची ती पोचपावती आहे.
जन्माला आल्यावर आपल्याला बाराव्या दिवशी आपल्याला आपले नाव मिळते. जे आपल्या आईवडिलांनी कुटुंबीयांसोबत विचार करून निवडलेले असते. पाळण्यात घालताना आत्या किंवा ज्येष्ठ व्यक्ती ‘कुर्रऽऽऽ’ करून पाळण्यातील बाळाला कानात नाव सांगायची पद्धत होती. एकदा मिळालेले हे नाव आपल्याला पुढे आवडो किंवा ना आवडो, बदलता मात्र येत नाही.
याबाबतीत मुलींना मात्र आपल्या लग्नाच्या दिवशी एक संधी मिळते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाच्या विधीमध्ये नववधूला आपले नाव बदलायची संधी मिळते. लग्न झाले, की नववधूचे आडनाव तर बदलतेच पण लग्नाच्या विधीत वर तांदळामध्ये आपल्या पत्नीचे नाव लिहून आधीचे नाव बदलू शकतो. त्यामुळे काही मुलींना जर आपले नाव बदलावेसे वाटत असेल तर त्यांना आपल्या लग्नाच्या वेळेस ही नामी संधी मिळते.
आधीच्या काळी मुलांची नावे बहुतेक देवांच्या नावावरून ठेवली जात जसं की शंकर, विष्णू, रमाकांत, चंद्रकांत, उमाकांत, शशिकांत, महादेव, श्रीधर, नीळकंठ, सहदेव, राम, लक्ष्मण, महादेव, महेश. काही मुलांना गोंद्या, बाळू, दगडू, धोंड्या अशीही प्रेमाने नावे ठेवली जात असत. तर मुलींची नावे ही देवींच्या आणि नद्यांच्या, फुलांच्या नावावरून ठेवली जात असत.
जसं की पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, कालिका, नीरा, सिंधू , कालिंदी, गंगा, चंद्रभागा, जमुना, कुसुम, गुलाब, चंपा, निशिगंधा, पंकजा इत्यादी. त्यापुढील काळात साध्या सरळ दोन तीन शब्दांच्या अक्षरांची चलती सुरू झाली. जसे की नितीन, शिवम, सुहास, उमेश, गिरीश, नीता, गीता, मिता, सीता, नेत्रा, संगीता, चंदा, मनीषा, वर्षा, जाई, जुई, सायली, स्नेहा, इत्यादी इत्यादी.
आताच्या काळात तर काही मुलांमुलींची काही नावे ऐकली, की त्या नावाचा संदर्भ आपल्याला काही केल्या लागत नाही. परंतु त्यांच्या आईवडिलांना जर त्या नावाचा अर्थ विचारला, तर हे विष्णूचे नाव आहे किंवा हे शंकराचे नाव आहे असे सांगितले जाते. अर्थात बहुतेक करून गुगलवरून ही माहिती मिळवली जाते ही नावे आणि त्या नावाच्या अर्थाचा संदर्भ हा खरा असेल की गुगलने यांना फसवलं असेल, असे नकळत आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. कारण ही नव्या जमान्यातील नवी नावे आपण यापूर्वी कधीच ऐकली नव्हती किंवा आपल्या वाचनातही कधी आलेली नव्हती.
आईवडिलांच्या नावाच्या आद्याक्षरे किंवा दोघांच्या नावातील एकेक अक्षर घेऊन तयार होणारे नाव ठेवण्याची संकल्पना मध्येच अनेकांना आवडली होती. आताची जी नव्या जमान्यातील कियारा, समायरा, किहान, आहन, आदी जी मुलांमुलींची नावे आहेत, त्यांना त्यांची नातवंडे ‘कियारा आजी’, ‘किहान आजोबा’ असे संबोधतील हा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा नकळत चेहर्यावर हास्य फुलते.
आजच्या जमान्यातील कियारा, आहन, किहान हे जेव्हा आजी आजोबा होतील, तेव्हा त्यांच्या नातवंडांची नावे काय असतील, याचा उगाचच मनाला प्रश्न पडतो. कदाचित त्या काळी परत पुन्हा एकदा शंकर, राम, लक्ष्मण, सीता, लक्ष्मी, राधा अशा आधीच्या नावांची संकल्पना निर्माण होईल का? असेही मनाला सहज वाटून जाते.
व्यक्तीचे नाव कोणतेही असो, त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची नोंद समाज घेत असतो. आणि त्याच्या कार्यानेच त्याच्या नावाची ओळख ही समाजात होत असते. जसे की शिवाजी, संभाजी ही नावे घेताच पुढे महाराज ही पदवी येतेच. आणि मग शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा पराक्रम डोळ्यांसमोर उभा राहतो. सचिन म्हणताच सचिन तेंडुलकर, विराट म्हणताच विराट कोहली डोळ्यांसमोर उभे राहतात आणि त्यांनी क्रिकेट विश्वात केलेली चमकदार कामगिरी दिसते.
काही व्यक्तींना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात चमकदार आणि उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे किंवा समाजासाठी, देशासाठी उल्लेखनीय काम केल्यामुळे उपाधीने त्यांची ओळख करून देण्यात येते आणि मग त्याच उपाधीने समाजात त्यांची खास ओळख निर्माण होते.
जसे की ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणताच साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर नजरेसमोर उभे राहतात व आदराने त्यांच्यापुढे आपली मानही झुकते.
‘लोकमान्य’ म्हणताच बाळ गंगाधर टिळक, ‘छत्रपती’ म्हणताच शिवाजी आणि संभाजी राजे, ‘गानकोकिळा’ म्हणताच लतादीदी, ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणताच वासुदेव बळवंत फडके, ‘नेताजी’ म्हणताच सुभाषचंद्र बोस, ‘पुण्यश्लोक’ म्हणताच अहल्याबाई होळकर, ‘महाराणा’ म्हणताच महाराणा प्रताप, भारताचे ‘पितामह’ म्हणताच दादाभाई नौरोजी, ‘शिवशाहीर’ म्हणताच बाबासाहेब पुरंदरे, ‘समर्थ’ म्हणताच रामदास स्वामी, ‘घटनाकार’ म्हणताच डॉ. बाबसाहेब आंबेडकर, ‘सुरश्री’ म्हणताच केसरबाई केरकर, ‘स्वरभास्कर’ म्हणताच भीमसेन जोशी, ‘देशबंधू’ म्हणताच चित्तरंजन दास, ‘जनकवी’ म्हणताच पी. सावळाराम , ‘गानसरस्वती’ म्हणताच किशोरीताई आमोणकर, ‘गानतपस्विनी’ म्हणताच मोगूबाई कुर्डीकर, ‘गानहिरा’ म्हणताच हिराबाई बडोदेकर, ‘चित्रतपस्वी’ म्हणताच भालजी पेंढारकर, ‘चित्रपती’ म्हणताच व्ही. शांताराम, ‘कर्मवीर’ म्हणताच भाऊराव पाटील यांची छबी डोळ्यांसमोर येते आणि त्या त्या दिग्गजांनी आपल्या क्षेत्रात केलेल्या चमकदार कामगिरीची झलक दिसते.
आयुष्यात सर्व काही गोष्टी पैशाने खरेदी करता आल्या तरी समाजात चांगले नाव हे आपल्या स्वत:च्या कर्तृत्वाने किंवा कामगिरीमुळेच कमावता येते. त्यामुळे आपल्या समाजात चांगले नाव कमावणे ही सर्वांत मोठी गोष्ट आहे!
- कविता आमोणकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.