
गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरती महाराष्ट्रातील मांगेली, विर्डी गावांपासून काही अंतरावर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील सुर्ल गाव सह्याद्री पर्वताच्या माथ्यावरती आहे. दख्खनचे महाकाय पठार जेथे निरोप घेण्याच्या पावित्र्यात आहे, तेथे हिरव्यागार वृक्षवेलींच्या कधीकाळी शांत पहुडलेला गाव म्हणजे गोमंतसह्याद्रीचा मुकुटमणी ठरला होता. समुद्रसपाटीपासून ७११ मीटर उंचीवर विराजमान झालेला हा गाव कर्नाटक राज्यातील चोर्ला, कणकुंबी, पारवड तर सत्तरीतल्या हिवरे खुर्द, कोदाळ यांनी वेढलेला आहे.
१९४७साली सुर्ल ब्रिटिश इंडिया आणि पोर्तुगीज इंडिया या दोन राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती वसल्या कारणाने त्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व लाभले होते. १९९९साली म्हादई अभयारण्याच्या कक्षेत हा गाव आल्याने तेथील पाताळाचा सडा, दवलेमाणीचा सडा, बाराजणाचा वझर, जळवण्याचा वझर, घुंगरड्याचा वझर, वाघाड्याच्या कडा... याबरोबर तिथल्या जैविक संपदेचा खजिना असणाऱ्या आणि इथल्या लोकमानसाने पूर्वी श्रद्धा, भक्तीने जतन केलेल्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन झाले होते.
युरोपियन सत्ताधीशांच्या ताब्यात जेव्हा गोव्याला घाटमाथ्यावरच्या प्रदेशांशी जोडणारा चोर्लाघाट आला तेव्हा तत्कालीन ब्रिटिश सरकारने इथल्या जांबोटकर त्याचप्रमाणे सडेकराच्या संस्थानावरती वर्चस्व प्रस्थापित केले. प्राचीन काळात कोकण- गोव्यातल्या बंदरात उतरणारे व्यापारी पावसाळ्यानंतर चोर्ला घाटाचा जेव्हा वापर करायचे तेव्हा या घाटमार्गाच्या परिसरात असणाऱ्या गावांना विशेष महत्त्व लाभले. त्यामुळे कोदाळच्या जंगलात वास्तव्यात असणारी कष्टकरी मंडळी सुर्लात स्थायिक झाली ती चोर्लाघाटाच्या आकर्षणापायी. खेमू सावंत भोसले देशमुखाच्या १६८९सालच्या पत्रात या चोर्लाघाटाचा उल्लेख आढळतो, त्यामुळे या घाटमार्गाचे आर्थिक दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट होते.
मराठ्याच्या प्रदेशाच्या सीमेवरच्या मांगेली घाटाच्या एकंदर माथ्यावरती वसलेला सड्याचा किल्ला म्हैसूरच्या टिपू सुलतानाने १७८५ साली ताब्यात घेतल्याकारणाने चोर्ला घाट पुन्हा चर्चेत आला. सड्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली मांगेली सावंतवाडकर संस्थानात यायची आणि त्यामुळे चोर्ला घाटाशी संबंधित असणाऱ्या सड्याच्या किल्ल्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तत्कालीन सत्ताधीशांची धडपड चालायची. सदाहरित वृक्षवेलींचे आच्छादन व डोंगरमाथ्यावरून उगम पावणारे, बारमाही वाहणारे असंख्य झरे आणि आल्हाददायक हवामानामुळे चोर्ला घाटातल्या परिसरात गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध भागांतून लोकसमूह स्थिरावले होते. चोर्ला घाटातल्या थोरला सडा, आंबोली सडा, तळवाचा सडा, चनन सडा, याद्वारे इथल्या विस्तीर्ण जांभ्या दगडांनी समृद्ध पठाराची कल्पना येते.
दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका मिळून गोंडवन अस्तित्वात आले होते. परंतु भूगर्भातील हालचालीमुळे या गोंडवनाशी एकरूप असणारा आफ्रिकेजवळील मादागास्कर बेटाला जोडलेला भारताचा भाग आठ ते दहा कोटी वर्षांपूर्वी सुटून निगाला व दूर उत्तरेकडे सरकल्यावर भारताची पश्चिम किनारपट्टी निर्माण झाली. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातील प्रचंड उद्रेकामुळे लाव्हारस उसळला व त्याचे थरावर थर भारतीय उपखंडाच्या मध्यावर पसरून कालांतराने थंड होऊन पाषाणात परिवर्तित झाले त्याचे दर्शन दख्खन पठारावरती घडते. सह्याद्री पर्वतरांगा लाव्हारसापासून निर्माण होऊन, त्यात डोंगरमाथे, पठारे, घळ्या तसेच नद्यांची खोरी ही भूरूपे आढळतात.
सुर्ल गावाच्या पायथ्याशी कधीकाळी खाऱ्या पाण्याचा समुद्र होता याची प्रचिती या गावाशी संलग्न असणाऱ्या साटरे, कोदाळ, हिवरे, खुर्द या गावांतल्या चुनखडीच्या गुंफांद्वारे येते. या सुर्लात असणारा पायकाचा सडा लाखो वर्षांच्या भूविज्ञानाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. महाकाय शिलाखंडाच्या आच्छादनाने समृद्ध असणारा पायकाचा सडा बारमाही भूगर्भात पाझरणाऱ्या जलस्रोत आणि सभोवताली एकेकाळी असलेल्या सदाहरित वृक्षवेलींच्या जंगलामुळे आल्हाददायक हवामानाचे वैभव मिरवत होता.
देवरायांत असणाऱ्या वृक्षवेलींची विविधता पाहिली तर या परिसराची श्रीमंती लक्षात येते. पालापाचोळा, कंदमुळे, तृणपाती यांची उपलब्धता, बारमाही नदीनाल्यातले पिण्यायोग्य पाणी यामुळे वाघ, बिबटे, अस्वल, शेकरू यांसारखी जंगली श्वापदे निर्धास्तपणे पायकाच्या सड्यावरती वावरत आलेली आहेत. नाग, मण्यार या सापांबरोबर इथे हिरवा चापडा, मलाबारी चापडा, घोणस यासारख्या सापांसाठी हा पठाराचा भाग पूर्वापार नैसर्गिक अधिवास ठरलेला आहे. जहरी सापांना इथल्या पठारांनी सतत आश्रय दिलेला आहे.
पायकाच्या सड्याशी संलग्न असणाऱ्या दरीला जेथून प्रारंभ होतो तेथे उभे राहिल्यास लाडकेच्या वझराबरोबर कळसा नाल्याचे खोरे निसर्गप्रेमींना आपल्या सौंदर्याची भुरळ घालत आलेले आहे. मान्सूनचा पाऊस जेव्हा इथे सुरू होतो तेव्हा रेशमी धुक्यांच्या दुलईत विसावलेले कळसाचे खोरे खूपच सुंदर दिसते. अंजनी, कुंजण, करवंद, कुसर, कार्वी, दुडंग अशा वृक्षांच्या कुशीत वसलेला हा सडा श्रावण-भाद्रपदात नानारंगी, नानाढंगी आमरी, आणि अन्य रानफुलांमुळे शेकडो फुलपाखरे, पतंग, चतुर आणि कृमीकीटकांना आकर्षित करायचा.
सर्पगरूड, गिधाड, धनेश आदी पक्ष्यांचे वैभव इथे पाहायला मिळायचे. १७८१च्या सुमारास सत्तरी तालुका पोर्तुगीज राष्ट्राचा भाग बनला तेव्हा आंतरराष्ट्रीय सीमेवरती वसलेल्या सुर्लातल्या पायकाच्या पठारावरती पोर्तुगीज सरकारने आपली पोलिस चौकी उभारली. १५ ऑगस्ट १९५४ रोजी नारायण आठवले, श्रीकांत फाटक, महादेव तांबे, नारायण रिसबूड, मधू भावे, शांता काळे आदी निर्भयी युवांच्या सत्याग्रहामुळे भारतमातेच्या जयघोषाने हे पठार निनादले होते.
गोवा मुक्तीनंतर सुमारे पाव शतक सुर्ल गाव मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहिला. परंतु चोर्लाघाट बेळगावच्या नव्या रस्त्यामुळे मौसमी धबधब्यांमुळे मद्यपींची पावले इथे वळू लागली आणि हां हां म्हणता इथल्या नैसर्गिक सौंदर्याला गालबोट लागत गेले. पट्टेरी वाघ, अस्वलांसाठी सुर्लाचे जंगल आणि पायकाचे हे पठार पूर्वापार आकर्षणबिंदू ठरलेले होते. परंतु आज जंगली श्वापदांचा अधिवास मानवी समाजाच्या आततायी कृत्यांमुळे संकटग्रस्त झालेला आहे. कधीकाळी निसर्ग आणि पर्यावरणाशी अनुबंध राखत जीवन जगणाऱ्या लोकसमूहाच्या नव्या विचारसरणीमुळे इथल्या नैसर्गिक वैभवाला वक्रदृष्टी लागत आहे. म्हादई अभयारण्यात येणारा हा पायकाचा सडा वैविध्यपूर्ण जैविक संपत्तीसाठी ख्यात असल्याने, त्याला आततायी आणि स्वार्थी हेतूसाठी वापरू देणे म्हणजे मानव आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाला शिखरावर नेण्यासारखेच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.