
संगीता नाईक
किती विचित्र विरोधाभास आहे पाहा! सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमांचा उदय जगभरच्या सामान्यातील सामान्य माणसाला कल्पनातीत अभिव्यक्तीस्वातंत्र्य देण्याचा वायदा करत झाला. खरं पाहता सुरुवातीच्या दिवसात हा वायदा पुराही केला गेला. बहुतेक वर्तमानपत्र, टीव्हीसारखी प्रसार माध्यमे काही मोजक्या, जास्त करून सामर्थ्यवान, संसाधनयुक्त लोकांचाच आवाज बुलंद करण्यापर्यंत सीमित होती.
अशा वेळी प्रत्येक नागरिकाला त्याचा आवाज, त्याच्या समस्या, त्याचे कौशल्य, त्याची अस्वस्थता, त्याचे विचार जगापर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी साधन सोशल मीडियामुळं मिळालं. स्थळ-काळ, उच्च -नीच, गरीब-श्रीमंत या पलीकडचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नवे आयाम या अभिनव माध्यमाने प्रस्थापित केले. पण विरोधाभास पाहा! आजघडीस सगळ्यात जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कशामुळे होते आहे? तर याच सोशल मीडियामुळे! भोवतालच्या परिस्थितीविषयी मनातील अस्वस्थता मुक्त मनानं समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याचे दिवस आज संपल्यात जमा आहेत.
चुकून जर का तुम्ही व्यक्त केलेली भावना एखाद्या एकांगी विचारप्रवाहाच्या फौजेच्या विचारांशी जुळणारी नसेल तर मग तुमचं काही खरं नाही! सर्व बाजूंनी, बहुतेकवेळा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन, अगदी तुमच्या कुटुंबालाही, गरज नसताना, या सगळ्यात गोवून तुमचे मानसिक खच्चीकरण केलं जातं. सत्ताधारी आणि सामर्थ्यवान समुदायांनी जोपासलेले विचारप्रवाह तुमच्या व्यक्त होण्याने डळमळीत होत असतील तर मग विचारूच नका. तुमच्या एखाद्या पोस्ट किंवा व्हिडिओचा परिणाम तुमचं सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक आयुष्यही ढवळून काढू शकत. पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा करण्याची जबाबदारी देण्यात आलेले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे या फौजेचे अगदी अलीकडचे बळी.
असं ज्या कुणाशी होते ती व्यक्तीच नव्हे तर तिच्यावर झालेल्या या व्हरच्यूअल बनवायला वेळ नसतो. पण मूळचा सामाजिक प्राणी असलेल्या त्याला जगात घडणाऱ्या घडामोडीसंबंधीच्या मूळ प्रवाहाकडे सदैव जोडून राहायचं असतं. आपलं मत ठामपणे मांडून आपलं अस्तित्वही सिद्ध करायचे असते. पण त्यासाठी पायाभूत वैचारिक भूमिका बनवण्यासाठी पाहिजे तो वेळ नसतो, कधी कधी तशी साधनेही सहज उपलब्ध नसतात, तर कधी जिवाला अधिकचा त्रास देण्याकडे कलही नसतो.
बहुतेक सारासार विचार करणाऱ्या गटांचा एखाद्या गोष्टीला बुद्धीच्या सहाणीवर घासून पारखून घेण्याकडे, प्रस्थापित व्यवस्थांना प्रश्न विचारण्याकडे, गरज पडल्यास प्रवाहाविरुद्ध जाण्याकडे आणि यासारख्या इतर अनेक डोक्याला ताप देणाऱ्या गोष्टींकडे कल असल्याने सहसा अशा गटात जाणे सर्वसामान्यांसाठी सोईस्कर नसते. म्हणून एखाद्या वैश्विक धरून ते गल्लीबोळातील नाक्यावरील घटनेपर्यंत साऱ्यांचे झटपट, कमीत कमी वेळात, सोप्यात सोपे विश्लेषण करून त्या घटनेवर वैचारिक असल्याचा आव आणत भाष्य करण्यासाठी कुणी रेडिमेड ’विचार’ वाटत असतील तर ते पसा भरभरून घेण्याकडे सहसा सामान्यांचा कल असतो.
मग त्या जुजबी, इंग्रजीत म्हणतात तशा ’स्पून फेड’ म्हणजे कुणीतरी स्वतःच्या सोईनुसार आणि स्वार्थानुसार चमच्याने भरवलेल्या माहितीच्या आधारे हा उधार विचारांचा ’विचारवंत’ समाजमाध्यमांवर स्वतःच्या अकलेचे तारे तोडतो. मग ती विचारसरणी बरोबर आहे की चूक, तिचा समाजाच्या, गावाच्या, शहराच्या, राज्याच्या, देशाच्या, विश्वाच्या, एकूण मानवाच्या भविष्यावर काय बरावाईट परिणाम होऊ शकतो या दृष्टीनं विचार करण्यासारख्या ’फालतू’ गोष्टींवर घालण्यासाठी वेळ कुणाकडे असतो? अनामिक असलेल्या सायबरस्पेसमध्ये, या ’भरवलेल्या’ विचारांचे चौकार आणि षटकार ठोकून घरातल्या सोफावर किंवा ऑफिसातल्या खुर्चीवर बसून काहीतरी मोठं केल्याच्या समाधानात तृप्त व्हायला हे ’विचारवंत’ मोकळे! या हलक्या कानाच्या ’कुंपणावरच्या कोहळ्यांना’ आपल्यात ओढून घेण्यासाठी डाव्या, उजव्या, वरच्या, खालच्या, मधल्या अगदी साऱ्याच समूहांमध्ये, सायबरस्पेसमध्ये अहमहमिका लागलेली असते.
जेवढे जास्त लोक, आपल्या विचारप्रवाहात ओढायला हे गट यशस्वी होतात तेवढे त्या गटाचे उपद्रवमूल्य जास्त! अशा फौजा निर्माण करण्यासाठी साऱ्याच मतलबी गटांची अहमहमिका लागते कारण या फौजांद्वारे जगाला आपल्या तालावर विचार करायला आणि पर्यायाने वागायला लावण्याची ताकद मिळते. माणसामाणसांत फरक करणाऱ्या कर्मठ विचार प्रवाहांपासून फारकत घेऊन ’मिले सूर मेरा तुम्हारा’पर्यंतची उत्क्रांती साधण्याच्या वाटेवर असलेल्या जगभरच्या जनसमुदायांना द्वेषाची विषवल्ली चारून पथभ्रष्ट करण्याचं काम याच फौजांच्या जोरावर आजघडीस जोरदारपणे चालू आहे. अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना आणि सारासार विचारांना कुचकट ट्रोलच्या घाणीखाली दाबून टाकण्याचे कामही अतिशय कल्पकतेनं याच फौजेद्वारे करून घेतलं जातंय. जगभरच्या धूर्त राज्य आणि इतर मतलबी संस्थांना या सारासार विचार करायचा आळस करणाऱ्या फौजेचे अपरिमित उपद्रवमूल्य उमगलं आहे.
त्यामुळं हजारो क्लृप्त्या आणि कोट्यवधी रुपये त्यांना भ्रमात गुंतवून, उपद्रवी ठेवण्यासाठी वापरणे सुरू आहे. साऱ्या विश्वाचं ग्लोबल व्हिलेज करणाऱ्या तंत्रज्ञानाची ही ताकद खरे तर मानवजातीला उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी वापरली गेली पाहिजे होती. जगाला भेडसावणाऱ्या आरोग्य, ऊर्जा, अन्न, जागतिक तापमानवाढ, पाणी दुर्भिक्ष, वाढत जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट यांसारख्या अनंत प्रश्नांवर तोडगे काढण्यासाठी साऱ्या मानवजातीने तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं एकत्र येऊन काम करून मानव म्हणून उत्क्रांत होणं अपेक्षित होतं. पण सद्य:स्थितीत तंत्रज्ञानाचा वापर जागतिक एकीकरणासाठी नाही तर माणसामाणसांत फूट घालण्यासाठी केला जात आहे. हा निव्वळ कपाळकरंटेपणा नाही तर आणखीन काय आहे?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.