
गोव्यात पोर्तुगिजांचे आगमन होण्याच्या पाच शतकांपूर्वी कदंब राज्यकर्त्यांची सत्ता होती. दहाव्या ते चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोवा-कोकणाच्या प्रदेशांवर कदंबांनी राज्यकारभार पाहिला. महामंडलेश्वर म्हणून कदंबराजा चतुर्भुजा यांनी आपणाला प्रस्थापित करून या प्रदेशावर आपल्या घराण्याचा राज्यकारभार आरंभ केला.
जयकेशी प्रथम या गोव्यातील कदंब राजाच्या काळापासून या प्रदेशावर कदंब राजघराण्याच्या शौर्याच्या, कर्तृत्वाच्या आलेखात अभिवृद्धी झाली. चोला राजसत्तेला नियंत्रित करण्यात जयकेशी पहिला याने महत्त्वाचे योगदान करून चालुक्य राजघराण्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कन्येचा विवाह चालुक्याच्या विक्रमादित्याशी लावून दिला. जयकेशी प्रथम व नंतर गुहल्ल देव तृतीय याने कदंब घराण्याचा लौकिक अबाधित राखला.
गोव्यात चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत गोवा कदंबची सत्ता असली तरी इथल्या लोकमानसात आजही देवता स्वरूपात वंदनीय ठरलेल्या पेरमाडी देवासारखा अन्य राज्यकर्ता नाही. प्राचीन ते मध्ययुगीन काळात गोवा कोकणावर राज्य करणार्या असंख्य राज्यकर्त्यांचे नामोनिशाण कायमचे मिटले असले तरी गोव्यातल्या मंदिर संस्कृतीत देवाच्या रूपात पूजेचा सन्मान पेरमाडी देवाला लाभल्याकारणाने त्यांच्या शौर्याविषयी लोकमानसाला माहिती नसली, तरी त्याचे पूजन गोव्यात आणि कोकणात बर्याच ठिकाणी प्रतीकात्मक रूपात होत असले पाहिजे.
गोव्यात, कोकणात त्याचप्रमाणे घाटावरच्या एकेकाळी कदंब राजघराण्याची सत्ता असलेल्या बर्याच गावांत प्रचलित असलेल्या देवता परिवारात डोक्यावर छत्र धरलेल्या शौर्यवंतांची जी प्रतिमा मूर्तीरूपात दाखवलेली आहे ती बहुधा शिवचित्त राजाची असली पाहिजे. धर्मपरायण, लोकहितवादी अशा राजाला देवतास्वरूपात पुजण्याची परंपरा जगाच्या वेगवेगळ्या भागात असून, भारतातही अशा राजाचे स्थान वंदनीय मानलेले आहे.
११०४ ते ११४८ पर्यंत सत्तास्थानी असलेल्या जयकेशी (द्वितीय) यांच्या शिवचित आणि विष्णुचित या दोन कर्तबगार सुपुत्रांनी कदंब राज्याची धुरा त्यांच्या पश्चात समर्थपणे सांभाळली. गोव्याचा राज्यकारभार शिवचित्त पेरमाडीदेवाने तर घाटमाथ्यावरच्या प्रदेशांवर विष्णुचितांनी सुशासन दिले. या कालखंडात गोवा-कोकणाचा कारभार गोपकपट्टण, तर घाटमाथ्यावरील प्रदेशाचा कारभार खानापूर जवळच्या हळशी या राजधानीच्या शहरातून पाहिला जात होता.
गोव्याचा राज्यकारभार पाहणार्या शिवचित्ताने आपण शैवपंथाचा पुरस्कर्ता असतानाही अन्य पंथीयांना आणि धर्मीयांनाही राजाश्रय दिला होता. ११४७ ते ११८१ या कालखंडात राज्य करणार्या शिवचित्ताच्या कारकिर्दीत गोवा व कोकणाच्या धार्मिक, सांस्कृतिक उन्नतीला प्राधान्य लाभले. शिक्षण, उद्योग, व्यवसायाच्या भरभराटीला राजाश्रय लाभला.
जयकेशी (द्वितीय) यांच्यानंतर वारसदार म्हणून शिवचित्त सिंहासनारूढ झाला. तर युवराज म्हणून विक्रमादित्य तथा विष्णुचित्ताची निवड झाली असल्याचा उल्लेख सिद्धापूरच्या ११५८ सालच्या दानपत्रात आढळतो. त्यामुळे दोन्ही बंधू पलासिगे १२००० आणि कोकण ९०० वर राज्यकारभार पाहत होते. घाटमाथ्यावरच्या कारभाराची जबाबदारी असलेला विष्णुचित विष्णूचा भक्त असल्याने त्याच्या प्रदेशात श्रीविष्णूच्या मंदिरांचे तर शिवचिताच्या राज्यात शिवशंभोच्या मंदिरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
गोपकपट्टणला राजधानीचा दर्जा देऊन राज्यकारभार पाहणार्या शिवचिताची पट्टराणी कमलादेवी धर्मपरायण होती. कला, संस्कृती यांची भोक्ती होती. चंद्राला जशी सगळ्यात रोहिणी परमप्रिय होती, त्याचप्रमाणे आपल्या राण्यांच्या मांदियाळीत शिवचिताचे कमलादेवीवर विशेष प्रेम असल्याचा उल्लेख ऐतिहासिक शिलालेखांत आढळतो. तिच्या आग्रहाखातर शिवचिताने आपल्या राज्यात वेदाभ्यास, न्याय, मीमांसा, सांख्य, योग, स्मृती, वेदान्त आदी बाबींच्या अभ्यासाला राजाश्रय प्रदान करून ठिकठिकाणी अग्रहारांची स्थापना केली होती.
अग्रहाराच्या मालमत्तेतून मिळणारा धनांश वेगवेगळ्या कार्यासाठी वापरला जायचा. कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातले बिडीजवळच्या देगावातले श्रीकमलनारायण आणि महालक्ष्मीच्या मंदिराची उभारणी कमला देवींसाठीच करण्यात आली होती.
गोव्यात धारबांदोडा तालुक्यातल्या रगाडो नदीच्या डाव्या किनार्यावर उभे असलेले श्रीमहादेवाचे काळ्या पाषाणातले मंदिर तांबडीसुर्लचे भूषण आहे. हे मंदिर गोवा कदंब शैलीतले आहे. त्याची उभारणी शिवचित पेरमाडी देवामार्फत झाली असावी.
यासंदर्भात अधिकृत शिलालेख, तांबडीसुर्लात आढळले नसले तरी हळशी येथील लक्ष्मीनृसिंहाच्या मंदिरातल्या शिलालेखावरून आणि तांबडीसुर्लाच्या महादेव मंदिराच्या शैलीतल्या मंदिराचे प्रस्थ तेथे असल्याने इतिहासकारांनी गोव्यातले तांबडीसुर्लचे मंदिर शिवचिताने बांधले असल्याचे मत मांडलेले आहे. शिवचितासंदर्भात हळशी शिलालेखात पेरमाडीदेव राजा म्हणून सक्षम, सर्वोत्कृष्ट, कला, संस्कृती, विद्या यांचा भोक्ता, शौर्यवंत, खिलाडू वृत्तीचा असल्याचा संदर्भ आहे.
त्रिलोचन कदंबापासूनच्या राजांपैकी पेरमाडीदेवाचा उल्लेख मेरू पर्वतासारखा असल्याचा केलेला आहे. ११५६पर्यंत पेरमाडीदेव चालुक्यांचा मांडलिक होता. परंतु त्यानंतर वेळुग्रामवर त्यांनी सत्ता स्थापन केली. सह्याद्रीच्या परिसरातल्या मालव नामक आदिवासी जमातीचे उच्चाटन केल्यावर मालवहारी हे बिरुद धारण केलेले, चालुक्यांच्या पराभवानंतर पेरमाडीदेवाने कोकण चक्रवर्ती असा आपला उल्लेख केलेला आहे.
सत्तरी, सांगे, धारबांदोडा आणि परिसरात आज जे मराठ्यांचे प्राबल्य आहे, ते बहुधा गोवा कदंब राजवटीपासून असले पाहिजे आणि मराठा बहुसंख्याक असलेल्या या बर्याच गावांत छत्रपतींची पूजा केली जाते. सातेरी गजलक्ष्मीच्या देवता परिवारात मस्तकी छत्र, गुढ्या, चवरधारीसह चित्रित केलेली राजासारखी व्यक्ती पेरमाडीदेव असल्याचे मत व्यक्त करण्यात आलेले आहे. सांगे तालुक्यातल्या उगे गावात हेमाडदेवाचे मंदिर असून त्याची परिवारदैवते म्हणून सिद्धेश्वर आदी दैवतांचा समावेश होतो. उगे गाव दिघी घाटाच्या पायथ्याशी आहे. तेथून कर्नाटकात जाण्याचा मार्ग सुरू होतो. उगे येथे पुजल्या जाणार्या हेमाडदेवाच्या पाषाणी मूर्तीचे निरीक्षण बारकाईने केल्यावर त्यात चित्रित केलेला राजा शिवचित पेरमाडीदेव असावा, असे वाटते.
तिसवाडीतल्या एका गावातल्या उत्खननात काही सोन्याची नाणी मिळाली होती. वेगवेगळ्या आकाराच्या आणि वजनाच्या या नाण्यांवर नृसिंहावतार, सिंहाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. सूर्य, चंद्र यांच्या चित्रांसह या नाण्यांवर, ‘हजारो पापांचे क्षालन करणारा शिवप्रभो आणि बावन्न बंदरांचा स्वामी हेमाडदेव यांची मी पूजा करतो’, असा उल्लेख आहे.
त्या नाण्यावरचा हेमाडदेव आणि लोकमानसाने पूर्वाश्रमीच्या हेमाड बार्से महालात समाविष्ट होणार्या उगेत पूजास्थानी मानलेल्या हेमाडदेवात साम्य असले पाहिजे. पिलार सेमिनरीत, त्या परिसरात हाती घेतलेल्या उत्खननात जी भग्न पाषाणी मूर्ती सापडली होती, ती प्रदर्शन कक्षात मांडलेली आहे. ही मूर्ती फादर कॉस्मे कॉस्ता या इतिहासतज्ज्ञाच्या मते पेरमाडी देव आणि कमलादेवीची आहे.
डिचोलीतल्या नार्वेत ज्याठिकाणी गोवा कदंबाचे मुख्य दैवत सप्तकोटेश्वराचे मंदिर आहे, त्या परिसरात काळभैरवाचे मंदिर आहे. तेथे छत्रपती राजा, राणी यांचे युवराजसदृश्य व्यक्तींच्या चित्रांसह असलेल्या मूर्तीचे पूजन केले जाते. शिवचित पेरमाडी देवाला अपत्य नसल्याने त्याने युवराज म्हणून विष्णुचिताला गादीवर बसवले होते.
काळभैरव मंदिराबाहेरची ही मूर्ती कदंब राज्यकर्त्यांची स्मृती जागवणारी आहे. गोवा कदंब राजघराण्याला कोकण आणि घाटमाथ्यावर प्रतिष्ठा मिळवून देणार्या पेरमाडीदेवाला त्याच्या धर्मपरायण आणि लोक कल्याणकारी भूमिकांमुळे इथल्या लोकमानसाने आपल्या धर्मसंस्कृतीत वंदनीय स्थान प्रदान केले होते. गोवा, कोकण आणि घाटावरच्या लोकपरंपरा, धर्मसंचिते यांच्या सखोल संशोधनाद्वारे पेरमाडीदेवाचा वेध घेणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.