Wild Vegetables: अळंबी खुडल्यानंतर, कळ्या राखून फांदीने झाकून टाकायची पद्धत; गोव्यातील रानभाज्यांच्या संवर्धनाची आवश्यकता

Wild Vegetables Goa: पावसाळा सुरू होताच गोव्यात रानभाज्यांचे वेध सुरू होतात.‌ तायखिळा, तेरे, अळू, फागला, अळंबी, आकुर, कोंब (किल्ल) या भाज्या, मोसम पुढे सरकतो तसतशा बाजारात दाखल व्हायला सुरू होतात.‌
Wild Vegetables Goa Monsoon
Monsoon Wild VegetablesDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. प्रदीप सरमोकादम

पावसाळा सुरू होताच गोव्यात रानभाज्यांचे वेध सुरू होतात.‌ तायखिळा, तेरे, अळू, फागला, अळंबी, आकुर, कोंब (किल्ल) या भाज्या, मोसम पुढे सरकतो तसतशा बाजारात दाखल व्हायला सुरू होतात.‌ आपण हे लक्षात घ्यायला हवे की या भाज्यांपैकी अळंबी, आकुर आणि किल्ल यांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने त्यांना जैवविविधता अधिनियमाचे पाठबळ दिले गेले आहे. 

संवर्धन आणि संरक्षण या दोन्ही शब्दात फरक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, संरक्षण या शब्दात, विशिष्ट जागी कुंपण घालून त्या जागेत जाण्यापासून रोखण्याचा संदर्भ येतो तर संवर्धन या शब्दात 'वर्धन करणे' म्हणजे वाढवणे, विस्तार करणे अशा अर्थाची झाक असते. संवर्धन होण्यासाठी पाळावी लागणारी एक पूरक जबाबदारी म्हणजे त्यांचा संयमी किंवा शाश्वत वापर.

पावसाळ्यात विशिष्ट जागी, मातीत उगवणाऱ्या ज्या अळंबी आपण स्वादपूर्वक खातो त्या कुठल्याच प्रयोगशाळेत आपण निर्माण करू शकणार नाही किंवा इतरत्र रुजवू शकत नाही.‌ ही अळंबी मातीवरून खुडून घेताना  त्यांच्या काही कळ्या तिथेच राखून ठेवण्याची एकेकाळी पद्धत होती.

आधुनिक काळात शाश्वतता (sustainability) हा विषय जरी अहमहमिकेने चर्चिला जात असला तरी 'शाश्वत वापरा'ची परंपरा आपल्या संस्कृतीतच आहे. आदिवासी किंवा निसर्गावर अवलंबून असलेला समाज निसर्गाला हानी पोहोचवून उत्पादन मिळवत नसे. पण आता ही परंपरा हळूहळू कमी होत गेली आहे आणि आर्थिक लाभाच्या हव्यासाने सारे काही ओरबाडून काढले जात आहे. 

मात्र जेव्हा जैवविविधता अधिनियम मुळातच अस्तित्वात नव्हते तेव्हा रानातील वनस्पतींची समृद्धता टिकून कशी रहात होती? ती टिकून अशामुळे रहात होती की त्यांचे शाश्वत संवर्धन करण्याचे त्याकाळी जे अलिखित पारंपारिक नियम होते त्याचे पालन केले जात असे. त्यापैकी काही नियमांना काहीजण 'अंधश्रद्धा' हे नाव देऊ शकतात परंतु अशा अंधश्रद्धांनीच हे संवर्धन घडले आहे.

'देवचारा'च्या अस्तित्वाच्या मान्यतेतून अनेक वड-पिंपळ राखले गेले आहेत हे आपण विसरता कामा नये. भौतिकवादी जीवनपद्धती 'भौतिकतेसाठी भौतिकता' ही एकांगी जीवनदृष्टी तयार करते. म्हणूनच उत्पादनाचा शाश्वत वापर हा आज कायद्याने सुरक्षा बहाल करण्याचा विषय बनला आहे. 

जंगलात किंवा इतर जमिनीवर उगवणाऱ्या अनेक वनस्पती साफ करून व त्यावर शिजवण्याची प्रक्रिया करून  लोक खात असत.‌

आजही आदिवासींची भाजी शिजवण्याची पद्धती लक्षात घेतल्यास हे लक्षात येईल की तेल किंवा कांद्याचा वापर न करता ती केवळ वाफेवर शिजवून बनवण्यात येते. ही अत्यंत आरोग्यदायी पद्धत आहे. जैवविविधता संवर्धन म्हणजे नुसते नियमानुसार दिले गेलेले संरक्षण नव्हे तर जैवविविधतेबरोबर येणारे पारंपारिक ज्ञान समजून घेणे हे देखील आहे.

उदाहरणार्थ, काही ठिकाणी फणसाचे कच्चे गरे त्यावर वजन टाकून मिठात घालून ठेवले जातात व नंतर येणाऱ्या पावसाळ्यात त्याची भाजी करून खाल्ली जाते. या पारंपारिक पद्धती निसर्गाबरोबरच्या आपल्या सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित करतात. 

Wild Vegetables Goa Monsoon
Monsoon Wild Vegetables Benefits: त्वचाविकारांसह अनेक रोगांवर गुणकारी आहेत 'या' पावसाळी रानभाज्या; जाणून घ्या यांचे बहुगुणी फायदे

पावसाळ्यात जंगलात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या अळंबींचे संवर्धन होणे आज अत्यंत गरजेचे आहे.‌ दरवर्षी त्यासंबंधाने जैवविविधता मंडळ उद्बोधन करत असते. अळंबी अवश्य खावीत मात्र त्याची 'बी-मोड' होता कामा नये.‌

खोतीगावसारख्या भागात अशी पद्धत आहे की त्या गावातील एखाद्या व्यक्तीने रानातील विशिष्ट जागेतील अळंबी खुडल्यानंतर अळंबीच्या तिथल्या छोट्या कळ्या राखून ती जागा झाडाच्या फांदीने त्या व्यक्तीने झाकून टाकायची.

Wild Vegetables Goa Monsoon
Goa Vegetable Rates: महागाईचा भडका! गोव्यात भाजी, फळांचे दर दुप्पट; काय आहे बाजारभाव? वाचा..

म्हणजे तिथे नंतर येणाऱ्यांना हे कळते की त्या जागेवरील अळंबी कुणीतरी अगोदरच खुडली आहेत. ही एक प्रकारची पारंपारिक 'कोड लँग्वेज'च होती. एकेकाळी जेव्हा राने-वने अळंबी सारख्या भाज्यांनी समृद्ध होती तेव्हा देखील स्थानिक लोक अशाप्रकारच्या शाश्वततेला पाळा देणाऱ्या पद्धतींचा अवलंब करत होते. आज हे शक्य आहे का? 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com