Sakshi Kale: दृष्टी कमकुवत असून बाळगली जिद्द, गोव्याची पॅरा ॲथलीट 'साक्षी' जाणार जर्मनीला

Sakshi Kale Para Athlete Goa: सकाळी महाविद्यालय आणि संध्याकाळी सराव असे माझे रुटीन सुरू झाले. मध्यंतरीच्या काळात मला दुखापत झाली आणि एक वर्षभर मला सरावापासून दूर राहावे लागले.‌
Sakshi Kale Para Athlete
Sakshi Kale, Para AthleteDainik Gomantak
Published on
Updated on

साक्षी काळे, पॅरा ॲथलीट

माझ्या डोळ्यांची दृष्टी जन्मापासूनच कमकुवत असली तरी इयत्ता तिसरीत असताना मी मुलांबरोबर फुटबॉल खेळायला सुरुवात केली. नववी इयत्तेत असेपर्यंत मी अत्यंत आवडीने फुटबॉल खेळत होते आणि माझ्या कल्पनेप्रमाणे त्या खेळातील मी एक चांगली खेळाडू होते. मी फुटबॉल खेळाडू बनेन असेच स्वप्न मी पाहत होते. मात्र कोविडचे आगमन झाले आणि माझे खेळणे बंद झाले.

त्या काळात दिव्यांगांसाठी 'पॅरा' खेळ होतात याची मला कल्पनाच नव्हती कारण आतापर्यंत मी नेहमी सामान्य मुलांबरोबरच खेळत आले होते. दरम्यान माझी भेट समाज कल्याण खात्याचे संचालक सुदेश गावडे यांच्याशी झाली.‌ माझ्यासाठी फुटबॉल किती महत्त्वाचा आहे हेच मी त्यांना सांगितले. मला अभ्यासात रस नव्हता मात्र फुटबॉल हे ध्येय मी बाळगले होते.

संचालकांनी मला त्यावेळी पॅरा विभागात ॲथलेटिक्स स्पर्धा होतात अशी माहिती जेव्हा दिली तेव्हा मी ॲथलेटिक्समध्ये स्वतःला आजमावून पाहण्याचे ठरवले. गोवा पॅरा असोसिएशनचे सुरेश ठाकूर यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना मी माझी खेळाबद्दलची आवड सांगितली.‌ मला त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व माझी कुवत ओळखून मला राष्ट्रीय स्पर्धेत पाठवले. तयारीसाठी मला फार कमी वेळ मिळाला होता तरी देखील तिथे मी धावण्याच्या शर्यतीत माझे पहिले पदक जिंकले. त्यानंतर मला जाणवले की मी ॲथलेटिक्समध्ये पुढे जाऊ शकते.

त्यानंतर सकाळी महाविद्यालय आणि संध्याकाळी सराव असे माझे रुटीन सुरू झाले. मध्यंतरीच्या काळात मला दुखापत झाली आणि एक वर्षभर मला सरावापासून दूर राहावे लागले.‌ पण त्या काळातही माझे काही व्यायाम सुरूच होते.

आता पॅरिसमध्ये होणार्‍या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेत आहे. खेळाडू म्हणून आतापर्यंत माझा प्रवास चढउतारांचाच राहिला आहे.‌ मात्र माझ्या अनुभवातून मी हे सांगू शकते की एखाद्या व्यक्तीच्या काहीही मर्यादा असल्या तरी जर त्याच्या आवडीची गोष्ट ती उत्कटतेने करत असेल तर ती नक्कीच पुढे जाऊ शकते.

मी खेळात हुशार आहे पण माझ्यासारखे इतर अभ्यासात हुशार असू शकतील, त्यांना डॉक्टर, इंजिनिअर बनायचे असेल. आपली आवड असलेल्या क्षेत्रात त्यांनी उत्कटतेने काम केले तर ते नक्कीच त्यांचे ध्येय गाठू शकतात.

मात्र आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनाची गरज त्यांना असते हे आपण लक्षात ठेवायला हवे. प्रोत्साहनाच्या बाबतीत मी खूप सुदैवी होते. माझ्या आई-वडिलांचे, माझ्या प्रशिक्षकांचे, माझ्या प्रायोजकांचे प्रोत्साहन मला नेहमी मिळत आले आहे. दिव्यांग व्यक्तीही प्रतिभाशाली असते. त्यांना सामान्यांसारखे काम करता येणार नाही हा गैरसमज आपण आपल्या मनातून काढून टाकायला हवा.‌ अनेक दिव्यांग व्यक्तींची सक्षमता मी स्वतः अनुभवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com