डोंगरातून उगम पावलेला ओहोळ; पणसे, अडवई, वांते गावांसाठी निसर्गाची संजीवनी!

निसर्गदेवता असलेल्या या ओहोळाने पणसे, अडवई आणि वांते गावांना आपल्या पात्रातून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याने संजीवनी दिली आहे.
Stream
Stream Dainik Gomantak
Published on
Updated on

निसर्गदेवता असलेल्या या ओहोळाने पणसे, अडवई आणि वांते गावांना आपल्या पात्रातून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याने संजीवनी दिली आहे. तिथल्या भूमिपुत्राला जगण्याची शक्ती दिली आहे.

ऋतू, मास, अमावास्या, पौर्णिमा, नक्षत्र, रात्र-दिवस, काळ, वेळ आणि वर्ष यांना सरकण्याचा संदेश पृथ्वी देते. तो संदेश असतो सूर्याचा, पण तो काळ परत पुनर्जन्माने पृथ्वीकडे येतो. या पृथ्वीच्या ऋतु्चक्रात यंदाचा पाऊस रखरखणाऱ्या मे महिन्यात सुरू झाला. माणसास वाटले वळवाचा पाऊस आला. पण त्याचे भविष्य निसर्गाने फोल ठरवले. निसर्ग म्हणतो, ‘तुझ्या करणीने मी बदलत आहे.’ दरवर्षी जूनमध्ये सुरू होणारा मान्सून हल्लीच्या वर्षांनी मागेपुढे कोसळून पृथ्वीच्या पर्यावरणात बदल घडवीत मानवाला इशारा देत आहे.

हिंद महासागरात मान्सून तयार होऊन तो भारताच्या दक्षिण दिशेने चाल करीत अंदमान निकोबार बेटांना भिजवीत एक-दोन जूनला तामिळनाडू केरळ राज्यांना धडक देत होता. बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून भारताच्या पूर्वेकडील राज्यांना आणि पश्चिम राज्यांना भिजवत होता. उत्तर भारतात हिमालयाच्या उंच शिखरांवर धडक देत होता. या पावसाच्या पाण्याने संपूर्ण भारतातील नद्या, नाले भरभरून वाहतात.

Stream
Goa Assembly Monsoon Session: विधानसभेत घुमला खाणपट्ट्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा आवाज, 'सांडूर-बेल्‍लारी'चे दाखले, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

हेच पाणी कृषिधान्य पिकवण्यास मदत करते. मात्र बदलणाऱ्या हवामानाने त्याच्या ठरलेल्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने आपल्या कृषी संस्कृतीवर परिणाम होत आहे, हे साऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. यंदा रखरखत्या उन्हाने तापलेल्या धरणीवरील वनस्पतींना, बियाण्याला लवकर ओलावा मिळाला. सुकलेली, तापेलेली, करपलेली, तहानलेली धरणीमाता कोबांच्या रूपात काळ्या धरणीच्या पोटातून हिरव्या रंगाने जन्म घेऊन अवघ्या पंधरा दिवसात पाचूच्या झालरीने नटून-थटून माणसाच्या नेत्रांना भुरळ घालीत वाऱ्याच्या साथीने ढगांच्या सावलीत डोलू लागली.

रस्त्याने जाताना झुडपावर, शिरमंडोळीची वेल, खडकांच्या खाचांत कांद्याच्या वंशकुळातील सुळी, वडाच्या अगर सातीवणीच्या वृक्षाखाली उगवणारे रान सुरणाचे कोंब (लूत) एखाद्या सपाट माळावरील तायखिळा, कुर्डुकु, वाहत्या खळी-ओहोळाच्या काठावर अगर बांधावरील तेरे, नारळाच्या बागयतीतील अळू, मुडल्या, परसातील अकुमाडी, शेतातील खळीच्या काठावरील आकुर, जंगलातील कणकीचे कोंब, हरकुलीची वेल अशा पावसाळ्यात उगवणाऱ्या नैसर्गिक पौष्टिक वनस्पती, भाज्या पाहून माणसाचे मन त्यांच्याकडे आपसूक ओढले जाते. सृष्टीला ओरबाडणारा मानव त्यांना खुडून स्वत: जगण्याचा प्रयत्न करतो.

मुळा, वाल, वांगी, कोबी, फ्लॉवर, नॅवलकोबी, भेंडी, दोडगी अशा भाज्या संपूर्ण वर्षभर मिळतात. पण रानभाज्या या प्रथम पावसाच्या आगमनाने उगवतात. ज्येष्ठ संपून आषाढ सुरू झाला म्हणजे रानभाज्यांचे आगमन होते. त्याच प्रकारे कृष्णास आवडणारा पारिजातक, तुळशी, महादेवास आवडणारा बेल, मंदार, सफेद-चाफा, दत्तास आवडणारा सोनचाफा, केवडा, जाई, आषाढात फुलण्यास सुरुवात करून सोवळ्या श्रावणात आपला दरवळ पसरून देवाच्या रूपातील सृष्टीला प्रसन्न करतो.

आषाढ संपण्यास आल्यावर त्यात भर घालते ती एकवीस प्रकारची पत्री. ती रविवारच्या आदित्य पूजनाने ब्रह्मांड चालवणाऱ्या सूर्य देवाला प्रसन्न करून घेते. नागपंचमीला हळद बोलावते. अष्टमीला तुळशी आणि चतुर्थीला दूर्वा, जास्वंद, हर्ने, कुर्डुक, चिडा, बेल आणी भाताची कणसे हे सारे भाद्रपदातील चतुर्थीला गणरायाचे आगमन होऊन पूजन करताना त्याला अर्पण केले जाते.

कृषी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ किती अमृतधार आहे, हे तुकारामांनी आपल्या अभंगात दाखवून दिले आहे. ज्ञानेश्वरांनी योगबलाने पाण्याचा प्रवाह आपल्याकडे आणला. नामदेवांनी भक्तिबळाचा उपयोग करून पाण्याला निर्मळ मानून त्यात देव पाहिला. भक्तिमार्गाचा योगरस्ता म्हणजे पाण्याने भरलेली विहीर आहे, असे संताजी म्हणाले. शेतकरी पंढरीची वारी करून भय-व्याधीतून मुक्त होतो. हे विचार मनाचा ताबा घेतात, तेव्हा त्यांपाठोपाठ, ‘पाण्यावर आपले जीवन, सृष्टी इतकी अवलंबून असतानाही, माणूस खरोखर पाण्याचे स्रोत जपतो? त्याविषयी तो गंभीर आहे?’ दुर्दैवाने बऱ्याचदा उत्तर नकारार्थीच येते!

या विचारात गढून गेलो होतो आणि माझी पावले मला वांते-पणसे गावातील डोंगरावर उगम पावलेल्या ओहोळाच्या काठावर घेऊन आली. माझ्या बरोबर त्या गावचे फुलपाखरू अभ्यासक अ‍ॅड. सूरज मळीक होते. त्यांच्या मदतीने पावसाच्या रपेटीत आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही ओहोळाच्या प्रवाहाला पाहत प्रवास करताना वरून पडणारे पावसाचे थेंब झेलीत ओल्या शरीराला पावसाची थंड ताकद जाणवत होती.

Stream
Goa Public University Bill: 'सार्वजनिक विद्यापीठे' स्थापनेचा मार्ग सुकर, ऐतिहासिक बदलांसाठी विधेयक सादर

मी एखादे चहाचे दुकान दिसेल का, याचा शोध घेत होतो. पणशाच्या डोंगरात उगम पावलेल्या मुख्य ओहळ परिसराला भिजवून वनराई आणि कुळागराला थंडावा देत खालच्या जिवनळ भागात पोहोचतो. डोंगरवाडा परिसरातील बागायती आणि वनराईला पाणी देऊन पुढे जात वरचे वायंगण शेताकडे पोहोचतो. त्या परिसरात त्याला वांत्याच्या वरचावाडा परिसरात उगम पावलेला ओहळ येऊन मिळतो. पुढील प्रवासात तो खालच्या तळीकडील कुळागराला पाणी पुरवत शेतातून वरच्या वायंगण शेती भागात मुख्य ओहोळास मिळतो.

तिथून पुढच्या प्रवासात सकले वायंगण शेताला पाणी देऊन त्या परिसरात त्याला तिसरा ओहळ मिळतो. याचा उगम कण्णे डोंगर परिसरात होतो. तो तिथून खाली येत तिथल्या जैवसंपदेला पाणी देत पुढे सायल्यांनी भागाला पाणी पुरवत मुख्य ओहोळाचा प्रवाह मोठा करतो. त्या मोठ्या प्रवाहाचे पाणी गावकरवाडा परिसराला देत तो बिबट्याची कोण परिसरात पोहोचतो. तिथे त्याला देवसान परिसरात उगम पावलेला चौथा ओहळ येऊन मिळतो.

देवसान परिसरातून कोसळत खालच्या भागातील वायंगण शेती आणि बागायतीला पाणी पुरवीत ओवळीकडील भागाला तो पाणी देतो. पुढे खालच्या भागातील झरीचे पाणी घेऊन तो मुख्य ओहोळात सामील होतो. तिथून बिबट्याच्या कोणीकडून मुख्य ओहळ पुढच्या भागातील पेडीकडे पोहोचतो. त्या परिसरात त्याला कोंडीच्या सखल भागात उगम पावलेला पाचवा ओहळ पिळ्येकरवाड्या कडील वनराईला पाणी देत येऊन मिळतो.

मग, मुख्य ओहळ त्याला घेऊन पुढची वाटचाल करीत साकडान भागात पोहोचतो. त्या परिसरात त्याला अडवई गावातून येणाऱ्या ओहोळाचे पाणी सामील करून घेत पुढील प्रवासात तिथल्या कुळागर, वनराईला पाणी देतो. नंतर बरेच अंतर पार करून सत्तरी आणी धारबांदोडा तालुक्यांना गोडे पाणी पुरवणाऱ्या विशाल म्हादईच्या पात्रात विसावतो.

Stream
Goa Assembly Monsoon Session: विधानसभेत घुमला खाणपट्ट्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा आवाज, 'सांडूर-बेल्‍लारी'चे दाखले, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

निसर्गदेवता असलेल्या या ओहोळाने पणसे, अडवई आणि वांते गावांना आपल्या पात्रातून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याने संजीवनी दिली आहे. तिथल्या भूमिपुत्राला जगण्याची शक्ती दिली आहे. या शक्तीचा वापर करून त्याने नारळ, आंबा, भात, कोकम, काजू, सुपारी, मिरी, केळी, अननस आणि मधुर, गोड दरवळ पसरविणारे फणस आपल्या बागायतीत पिकवले. त्या फळफळावळीवर इथले पूर्वज जगले आणि त्यांनी इतरांनाही जगवले.

शेतातील कोंगे, ओहळातील गोड मासळी, कणकीचे कोंब, सुरण, अळू, कणगी अशा विविध रानभाज्या व नाचणी, वरी, सावा, पाकड, कुळीथ, उडीद, कांग अशा पिकांच्या अन्नधान्यावर आपला गाव ‘सुजलाम्’ बनवला होता. पण गोवा स्वतंत्र झाला आणि गोमंतकीय अधिकच स्वैर झाले. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकच आम्ही पुसून टाकला. स्वैराचारालाच ‘स्वातंत्र्य’ म्हणू लगल्याने आम्ही आचारभ्रष्ट झालो. समाधानापेक्षा सुख, समृद्धीपेक्षा संपत्ती महत्त्वाची झाली. धरतीमातेचे चरणवंदन करण्याऐवजी ‘सलाम’ ठोकू लागलो. स्वच्छ, निर्मळ असलेले ओहोळांचे पाणी मलीन झाले, ‘लाल’ झाले!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com