
जयराम अनंत रेडकर
अगदी कालपर्यंत ३१ डिसेंबरची मध्यरात्र ते नवीन वर्षाचा नवीन दिवस उजाडेपर्यंत अपघातांची मालिका गोव्यातील अनेक रस्त्यांवर सुरू व्हायची. जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशविदेशातील अनेक पर्यटक येथील समुद्र किनाऱ्यावर गर्दी करायचे. रात्रभर संगीताच्या तालावर तरुणाईची पावले थिरकायची, मदिरेचे चषक रिते व्हायचे.
बेहोष, मदमस्त होऊन पर्यटक ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ होऊन जात असत आणि दुसऱ्या दिवशी त्याच कैफात परतीच्या वाटेवर निघत असत. रात्रभर झालेले जागरण, नशापानाची झिंग याचा परिणाम व्हायचा तोच व्हायचा आणि त्यांचा वाहनावरील त्यांचा ताबा सुटायचा. अशावेळी अनेकांचे मृत्यू व्हायचे, काहीजण जबर जखमी व्हायचे आणि जवळच्या इस्पितळात त्यांना दाखल करावे लागायचे. हा जणू वार्षिक कार्यक्रम होऊन बसला होता. डिसेंबर महिना आला की मनात अपघातांची भीती घर करून राहायची. आता मात्र अपघात ही नित्याची बाब झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांत १४३ रस्ता अपघात गोवा राज्यात घडले अशी नोंद मिळते. या अपघातांत ४५ टक्के तरुणांचा मृत्यू झाला आणि ५५ टक्के लोक जबर जखमी झाले त्यातील काहीजण कायमस्वरूपी अपंग झाले. वर्ष संपता संपता ही संख्या दुप्पट होईल, अशी भीती वाटते. अपघात झाला की त्या वेळेपुरती त्याची कारणमीमांसा होते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या! कुठेही रस्ता अपघात झाला की त्याचा आरोप प्रामुख्याने होतो तो सरकारवर आणि रस्ता बांधणी करणाऱ्या खात्यावर.
परंतु खरोखरच निकृष्ट रस्ते बांधणी हेच सर्वस्वी खरे कारण आहे का? तर याचे उत्तर, ‘नाही!’ असेच येईल. रस्ता अपघात होण्याची अनेक कारणे आहेत त्यांपैकी निकृष्ट रस्ता बांधणी आणि वेळोवेळी रस्त्याची न केलेली डागडुजी हे एक कारण आहे. परंतु मानवी चुका, अक्षम्य हलगर्जीपणा, वाहतूक नियमांची पायमल्ली आणि भ्रष्टाचार ही रस्ता अपघाताची प्रमुख कारणे आहेत. गेल्या आठ दहा वर्षांत ज्या गतीने रस्ता आणि त्यावरील पूल बांधणीचा वेग आला तो पाहता आपण विकासाच्या दिशेने जात आहोत, असा आभास नक्की होतो परंतु हा वेग जीवघेणा ठरतो याकडे डोळेझाक केली जाते.
वेग वाढला तरी त्याची गुणवत्ता वाढली का? हा मूलभूत प्रश्न आहे आणि याचे उत्तर नकारात्मक आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तर अभिमानाने सांगतात की आपल्या कारकिर्दीत २०१४पूर्वी असलेल्या सरकारच्या तुलनेत सर्वांत जास्त, सर्वांत वेगाने सर्वांत जास्त लांबीचे चौपदरी आणि सहा पदरी रस्ते बांधून तयार झाले आहेत. ही त्यांची मर्दुमकी खरी असली तरी हे नवीन सिमेंटचे रस्ते भारतीय हवामानाला कितपत पोषक आहेत याचा विचार केला आहे का? आज बांधण्यात आलेले चौपदरी आणि सहा पदरी महामार्ग म्हणजे ‘चट मंगनी, पट ब्याह’ अशा प्रकारचे झालेले आहेत.
पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय नसलेले हे सपाट रस्ते आहेत. यातील काही रस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच, तर काही उद्घाटन झाल्याझाल्याच बिघडलेले आढळतात. भ्रष्टाचार हे कारण तर आहेच, परंतु हवामानाची वास्तविकता आणि वापरण्यात आलेल्या सामग्रीची उपयुक्तता लक्षात न घेता हे रस्ते बांधले गेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हे रस्ते एकमेकांना दुभागतात किंवा छेदतात तिथे आणि जिथे सर्व्हिस रोड जोडला जातो तिथे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्नल असणे किंवा वाहतूक नियंत्रक पोलीस असणे आवश्यक असते.
याची उणीव अनेक ठिकाणी आढळते. काही ठिकाणी सिग्नल बसवलेले असतात परंतु वेळोवेळी त्यांची देखभाल केली जात नाही आणि बऱ्याच वेळा ही व्यवस्था कोलमडलेली असते. यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळते. काल परवाच सचिवालयातील एक ज्येष्ठ अधिकारी नारायण अभ्यंकर यांचा मृत्यू याच कारणाने झाला. या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था असती किंवा वाहतूक पोलीस असता तर कदाचित हा अपघात टळला असता.
तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वयंशिस्त! मुळातच भारतीय माणूस वागण्यात बेशिस्त आहे. वाहतुकीचे नियम माहीत नसणे आणि माहीत असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करणे व ‘नियम तोडले तर माझे कोण काय बिघडवणार?’, ही गुर्मी अपघाताला कारण ठरते. भारतातील मिझोराम हे एकमेव असे राज्य आहे की तिथले नागरिक वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करतात.
शालेय अभ्यासक्रमात वाहतुकीचे नियम अंतर्भूत केले तर कदाचित लहानपणापासूनच मुलांना नियम पाळण्याचे वळण लागू शकेल आणि मोठेपणी वाहन चालवताना त्यांच्याकडून योग्य ती काळजी घेतली जाऊ शकेल अशी, अपेक्षा करायला हरकत नसावी. पालकांनीही आपल्या पाल्ल्यांना ती अल्पवयीन असताना दुचाकी किंवा चारचाकी चालवण्यासाठी प्रवृत्त करू नये. यातून अनेक गोष्टी साध्य होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.