Goa Accidents: 'गोव्यातील अपघातांचे प्रमाण 5.47 टक्क्यांनी घटले असले तरी..'; वाहनांच्या संख्येच्या मानाने खुंटलेला रस्ते विकास

Goa Accident Cases: खड्डेमय रस्ते, जिवघेणी वळणे, तीव्र चढ-उतार, मानवी आणि यांत्रिक चुका, भूपृष्ठ वाहतुकीचे नियम न पाळणे ही रस्ता अपघातांची प्रमुख कारणे आहेत.
Goa Accident Cases
Accidents In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

जयराम अनंत रेडकर

दरवर्षी डिसेंबर महिना उजाडला की अपघातांची धाकधूक वाढत जाते. जुन्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा जणू सोहळा या महिन्यापासून सुरू होत असतो. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पर्यटनक्षेत्र प्रचंड वेगाने विकसित झाले. लोकांच्या हातात सहजपणे पैसा खुळखुळू लागला.

हा पैसा मौजमस्तीसाठी वापरण्याकडे तरुण पिढीचा कल राहिला. सिनेसृष्टी, आंतरजाल विकास यातून नवीन पर्यटन दृश्ये समोर येऊ लागली आणि यातून पर्यटनाला मोठी चालना मिळाली, त्यासाठी लागणारी वाहतूक साधने वाढली. आज प्रत्येकाच्या दारात किमान एक तरी स्वयंचलित वाहन दिसते, मग ते दुचाकी असो अथवा चार चाकी!

१९६०च्या दशकात आपल्या कुटुंबात एखादी सायकल असणे म्हणजेसुद्धा आपल्यापाशी खूप काही असल्यासारखे वाटत असायचे. शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतःची सायकल असणे म्हणजे चंगळ वाटायची. त्याकाळी सार्वजनिक वाहतुकीची साधने तर खूपच मर्यादित होती. खाजगी बसचे मालक किंवा काळी-पिवळी टॅक्सी चालक / मालक यांना सामान्य जनता ’पात्रांव’ समजत असे! काय तो त्यांचा रुबाब! व्वा!!

आज चित्र साफ बदलले आहे. कारण प्रत्येकाच्या दारात आज स्वतःचे वाहन उभे असते. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनीदेखील आता कात टाकली असून सामान्य बसमधून प्रवास करण्यापेक्षा आरामदायी, वातानुकूलित बस किंवा ट्रेनमधून प्रवास करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. म्हणूनच राज्यशासनाच्या जुन्या बसगाड्या अनेकदा रिकाम्या धावताना दिसतात. लोकांच्या मागणीनुसार राज्यशासनानेही आरामदायी आणि वातानुकूलित बस वाहतूक सुरू केली आहे.

ऑनलाइन बुकिंग करून टॅक्सी मागवण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता स्वतःचे वाहन बाळगायची तशी गरज नाही. ना वाहन देखभालीचा खर्च, ना पार्किंगची कटकट, ना वाहनविमा उतरवण्याची आवश्यकता ना इतर आनुषंगिक गोष्टीसाठी खर्च! असे असले तरी आपल्याकडे वाहन असणे हा मध्यमवर्गीय लोकांचा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. बँक किंवा वित्त संस्थांकडून आता सुलभतेने वाहन कर्ज उपलब्ध होते त्यामुळे स्वतःचे वाहन घेणे हे आता केवळ स्वप्न राहिलेले नाही.

अनेक देशी पर्यटक स्वतःच्या वाहनाने किंवा ‘रेंट अ कार’ने प्रवास करणे पसंत करतात. या वाहनामुळे रस्त्यावरील ताण वाढतो. या पर्यटकांना स्थानिक रस्त्यांची आणि पर्यटन स्थळाची पूर्ण माहिती असत नाही. त्यामुळे रस्त्यावरची धोकादायक वळणे, एकेरी मार्ग, दीर्घ उतार आणि चढाव, अपघात-प्रवण क्षेत्रे यांची त्यांना कल्पना येत नाही आणि ते अपघातग्रस्त होतात.

रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना आणि अन्य वाहनांना याचा अकारण त्रास सहन करावा लागतो. काल परवाच अटल सेतूवर एकाच दिवशी दोन अपघात घडले. या सेतूवर वाहनवेग मर्यादा ताशी ५० किमीची आहे पण कितीजण हा नियम अमलात आणतात? या सेतूवर छुपे कॅमेरे बसविण्यात आल्याचा फलक आहे परंतु खरेच छुपे कॅमेरे बसविण्यात आले आहेत का? आणि असतील तर ते चालू आहेत का? असे प्रश्न उपस्थित होतात.

राज्यातील वाहनांची संख्या वाढली परंतु त्या मानाने रस्ते विकास झाला नाही. नाही म्हटले तरी २०१४पासून रस्ते विकासाचा श्रीगणेशा झाला. द्रुतगती मार्ग बनवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली. जिथे दोन पदरी मार्ग होते त्या ठिकाणी चौपदरी आणि काही ठिकाणी सहा पदरी मार्ग निर्माण झाले. मात्र हे राष्ट्रीय महामार्गापुरतेच मर्यादित राहिले. निम्नस्तरीय शहरे, आणि गाव पातळीवरील रस्त्यांची स्थिती तेवढीशी सुधारलेली नाही.

अरुंद रस्ते, चिंचोळ्या गल्ल्या, एकेरी मार्गाची असुविधा, दीर्घ उतार किंवा चढाव, जिवघेणी वळणे आणि वळणाच्या आधी आवश्यक त्या सूचनाफलकांचा अभाव, स्वयंचलित इलेक्ट्रिक सिग्नल्स नसणे, वेगमर्यादा-उंचवटे यांची वेळीच रंगसफेती न करणे, तीव्र वळणावर बहिर्गोल आरसे नसणे, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती यातून अपघात घडतात.

या बरोबरच वाहनातील आकस्मिक उद्भवणारा यांत्रिक बिघाड व वाहन चालकाकडून होणारे अक्षम्य नियमबाह्य वर्तन हे अपघातांचे प्रमुख कारण म्हणावे लागेल. वाहन चालवायचा परवाना देण्यापूर्वी उमेदवाराचे वाहतूक नियमांच्या संबंधीचे प्रशिक्षण बंधनकारक असायला हवे. वाहन कुठे आणि का थांबवू नये, वाहन वेगमर्यादा कुठे आणि किती असावी, पुढच्या वाहनाला ओलांडताना किंवा वाहन चालवताना कोणती काळजी घ्यायची, वाहन कुठे कसे थांबवावे अशा सारख्या गोष्टींचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करून त्याचा वाहन परवाना रद्द करायला हवा. वाहन चालकाने आणि मालकाने वाहनाची वेळोवेळी देखभाल आणि नियमित तपासणी केली पाहिजे. या गोष्टी कसोशीने पाळल्या तर मला वाटते या रस्ता अपघातांचे प्रमाण खूप म्हणजे खूपच खाली येऊ शकेल आणि अनेकांचे मृत्यू वाचतील, अनेक कुटुंबे आपल्या जिवलगांना अकाली मुकणार नाहीत व अनेक कुटुंबे उघड्यावर पडणार नाहीत. आपल्या घरी आपले प्रियजन वाट पाहत आहेत याची जाणीव वाहन चालकांनी ठेवली तर किती छान होईल!

Goa Accident Cases
Goa Road Accident: गोव्यात मागील 5 वर्षात रस्ते अपघातात 1,022 जणांनी गमावला जीव

आपल्या देशात वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजे आपला अपमान वाटतो की काय कोण जाणे? अगदी बिनदिक्कत नियम मोडले जातात. वाहतूक पोलिसांनी पकडले की दादागिरी केली जाते. मंत्र्यासंत्र्याच्या ओळखीचा रुबाब दाखवला जातो. आपल्या देशात मला वाटते एकच राज्य असे आहे की ते वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करते आणि ते म्हणजे मेघालय! अन्य ठिकाणी वाहतूक नियम मोडणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे वर्तन!

२०२४ या वर्षात पोलिसांच्या नोंदणीनुसार गोवा राज्यात एकूण २,६६० रस्ता अपघात घडले. २०२३वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ५.४७ टक्क्यांनी घटले असले तरी यात अजूनही घट होणे आवश्यक आहे.

Goa Accident Cases
Goa Accident: आठ वर्षांपूर्वी अपघातात अपंगत्व आलेल्या तरुणाला 1.30 कोटींची भरपाई द्या, मोटार लवादाचा विमा कंपनीला आदेश

यासाठी उत्तम दर्जाची रस्ते-बांधणी आणि त्यांची वेळच्यावेळी डागडुजी करणे, आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावणे आणि स्वयंचलित इलेक्ट्रिक सिग्नल्स लावणे, पादचाऱ्यांना फुटपाथ, दुचाकी वाहन चालकांसाठी वेगळी लेन व्यवस्था असणे ज्यामुळे ते बहुचाकी वाहनांच्या अधेमधे कडमडणार नाहीत आणि अपघातांना निमंत्रण देणार नाहीत. याचबरोबर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई कोणताही मुलाहिजा न ठेवता करणे असे उपाय योजले तरच अपघातांचे प्रमाण आटोक्यात येईल आणि अनेक जीव अपघातापासून वाचतील.

थोडक्यात म्हणजे खड्डेमय रस्ते, जिवघेणी वळणे, तीव्र चढ-उतार, मानवी आणि यांत्रिक चुका, भूपृष्ठ वाहतुकीचे नियम न पाळणे ही रस्ता अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com