
शिरगाव येथे घडलेल्या घटनेतून गोमंतकीय अजून पुरते सावरलेही नव्हते तोच बागा, शिरवई आणि आगोंद येथे चिमुकलींचा बुडून मृत्यू झाला. एप्रिल महिन्याच्या वीस तारखेनंतर सुरू झालेले हे मृत्यूसत्र काही थांबायचे नाव घेत नाही. या सर्व घटनांमगे एक समान सूत्र आढळते ते म्हणजे निष्काळजीपणा आणि बेफिकीर वृत्ती. मग ती माणसांची असो, सरकारची असो किंवा प्रशासनाची बळी निष्पापांचाच जातो.
‘पर्यटकांसाठी गोवा धोकादायक’ ठरत असल्याच्या नकारात्मक प्रसिद्धीने मध्यंतरी जोर पकडला होता. सूचनांचे पालन न केल्यामुळे, मद्यपान केल्याने व अनाठायी धाडसापायी कमालीचा बेफिकीर साहस अंगाशी ओढवल्याने पर्यटकांचा मृत्यू होणे, यासाठी प्रशासकीय यंत्रणेला जबाबदार धरता येणार नाही.
पण, जिथे अशा घटना सातत्याने घडतात तिथे विशेष, अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमणे, सूचना फलक लावणे असे उपाय केले गेले होते का, याचा विचार होणेही तितकेच गरजेचे आहे. त्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
त्यातूनच पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सरकार जागरूक आहे, असा सकारात्मक संदेश पर्यटन क्षेत्रात जगभर पसरेल. पण, तसे छातीठोकपणे सांगण्याएवढी सज्जता आहे का? धबधबे, नदी, तलाव, कालवे, स्विमिंगपूल, समुद्र अशा ठिकाणी, खास करून जिथे पर्यटकांची ये-जा असते, तिथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक, जीवरक्षक असणे गरजेचे आहे. आगोंद येथे बुडून मृत झालेल्या तीन वर्षीय बालिकेचा जीव स्विमिंगपुलाजवळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे व पालकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे झाला.
उन्हाच्या झळा बसत असताना पाण्याचे आकर्षण असणे साहजिक आहे. त्याच्या परिणामांची कल्पना तीन वर्षीय व सहा वर्षीय बालिकांना असणे अपेक्षित नाही. पण, म्हणूनच पालकांनी व व्यवस्थेने जास्त काळजी घेणे आवश्यक होते, जे घडले नाही. मागील ११ दिवसांत बुडून मृत्यू झालेल्या ७ दुर्घटनांनी सर्वत्र खळबळ माजली आहे.
काही ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती असूनही अशा घटना घडत असल्याने यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले, तर काही घटनांमध्ये सुरक्षाव्यवस्था पुरेशी कार्यरत नव्हती. समुद्र किनाऱ्यांवर, हॉटेलच्या जलतरणतलावांच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य आहे. किती हॉटेल्समध्ये जीवरक्षक नेमलेले आहेत? अंमलबजावणीच्या बाबतीत झोपलेल्या प्रशासनाची आणि हॉटेल चालकांचा बेजबाबदारपणाच समोर येतो.
‘येथे काहीही केले तरी चालते’, अशी गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची प्रतिमा सरकारनेच करून ठेवल्यामुळे दर्जेदार पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतात. ज्यांना कुठलेच नियम पाळायचे नसतात, अशा बेफिकीर पर्यटकांची भरमार गोव्यात प्रचंड प्रमाणात आहे. असे पर्यटक केवळ सूचना फलक पाहून स्वत:ला आवरते घेत नाहीत.
उलट असे नियम न पाळण्यातच त्यांना मोठ्ठे काहीतरी केल्यासारखे वाटते. केवळ धोक्याच्या सूचना लिहून त्याचे पालन होईल, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरते. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यात दूधसागर आणि म्हादई नदीपात्रात बुडून तिघा युवकांचे झालेल्या मृत्यूंनी हीच बाब अधोरेखित केली होती.
काल घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये चिमुरडींचा जीव गेला होता, तर माशे-काणकोण, धारबांदोडा व उस्ते-सत्तरी येथे तीन दुर्घटनांमध्ये जिवाला मुकलेले युवक २० ते २५ वयोगटातील होते. या दोन बालिका अजाण होत्या तर ते युवक अतिजाणते होते. कारणे काहीही असली तरी त्याचा परिणाम राज्याच्या प्रतिमेवर होतो. अशाच दुर्घटना घडू नयेत म्हणून गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात राज्यातील धबधबे पर्यटक, स्थानिकांना बंद ठेवण्यात येत आहेत.
उन्हाळ्यात पाणी कमी असतानाही बुडण्याच्या घटना सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक पंचायतीला सक्रिय करणे गरजेचे आहे. तसेच समुद्रकिनारे व जलतरणतलाव या ठिकाणीही संबंधितांना जबाबदार धरून कारवाई झाल्यास, अशा दुर्घटना कमीत कमी घडतील. कुठल्याही चिमुकल्या सेहरचा वा फातिमाचा पुन्हा बुडून मृत्यू होणार नाही. घडलेल्या दुर्घटनेतून जेव्हा ती भविष्यात टाळण्याचे उपाय कठोरपण राबवले जात नाहीत, तेव्हा तशीच दुर्घटना पुन्हा घडते. त्याच कारणासाठी पुन्हा तशाच दुर्घटना वारंवार घडणे हे सरकारचे, प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. हे निष्काळजीपणाचे बळी आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.