
विकास कांदोळकर
नाटक, साहित्य, चित्रकला, संगीत आणि लोककला यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी ‘प्रबोधन कला’ समाजातील अंधश्रद्धा, विषमता आणि अन्याय यांना आव्हान देत, जनजागृती करत, माणसाच्या बुद्धीला आव्हान देत, समाजाला प्रगतीच्या दिशेने नेऊन, सामाजिक परिवर्तन घडवून आणते. प्रबोधन म्हणजे जागृती किंवा पुनरुज्जीवन, ज्याचा वापर जागतिक स्तरावर युरोपात ‘रेनेसॉन्स’मध्ये, तर भारतात १९व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळींत झाल्याचे दिसून येते. आज सरकार आणि राजकारण्यांच्या निष्काळजीपणामुळे ह्या कलेची दुर्दशा झाली आहे.
जागतिक इतिहासात मध्ययुगीन धार्मिक अंधकारानंतर, युरोपमध्ये १४व्या ते १७व्या शतकातील प्रबोधन कालखंडात (रेनेसॉन्स), इटलीत ग्रीक-रोमन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करत, प्रबोधन कलेचा जन्म झाला. मानवतावादी दृष्टिकोनातून, धर्माच्या कट्टरतेला विरोध करून, वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देत, प्रबोधन कलेने युरोपला आधुनिकतेच्या दिशेने नेले. लिओनार्दो दा विंची, मायकल अँजेलो आणि शेक्सपियर यांसारख्या कलाकारांनी कला, साहित्य आणि विज्ञानात क्रांती घडवली.
राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना आव्हान देत समाज परिवर्तनाचे साधन बनलेल्या प्रबोधन कलेचा प्रभाव अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीमध्येही दिसून येतो. भारतात तिचा उगम संत साहित्यात झालेला दिसून येतो.
संत नामदेव-तुकाराम सारख्यांच्या अभंगांमधून जनजागृती जाणवते. ब्रिटिश राजवटीत राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, इत्यादींनी सतीप्रथा, बालविवाह, जातिव्यवस्था, महिला-अन्याय, यांसारख्या सामाजिक दुष्ट प्रथांना विरोध करण्यास प्रबोधन कलेचा यशस्वी वापर केला.
ब्रिटिशांच्या शिक्षण आणि पाश्चात्त्य विचारांच्या प्रभावाने, कला माध्यमातून स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणेचा प्रचार झाला, यात बंगाली नाटक आणि मराठी साहित्याचा सिंहाचा वाटा दिसून येतो. पुढील काळात गांधीजींच्या अहिंसक चळवळींनाही प्रेरणा देत प्रबोधन कला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनली.
प्रबोधन कलेची आज अतिशय दुर्दशा झालेली दिसून येते. व्यवसायीकरण, डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे ही कला, सामाजिक जागृतीऐवजी फक्त मनोरंजन करत ‘विशेष’ हितसंबंधांना प्राधान्य देत आहे. यामध्ये माणसाचा स्वभाव, कुटुंब व्यवस्था, समाज, सरकार आणि राजकारण्यांची भूमिका अतिशय निष्क्रिय आणि स्वार्थी बनली आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये बजबजपुरी माजल्याने मध्ययुगीन ‘रेनेसॉन्स’ काळासारखे प्रबोधन पुन्हा एकदा आवश्यक असल्याचे ठामपणे वाटत आहे.
कलाकारांना पुरेसे मानधन नसल्यामुळे प्रबोधनात्मक कार्यक्रम दुर्मीळ झाले. राजकारणी प्रबोधन-कलेचा उपयोग पर्यावरण, शिक्षण आणि महिला सुरक्षा यांसारख्या सामाजिक मुद्द्यांसाठी न करता निवडणुकीसाठी करतात. राजकारण्यांच्या भ्रष्टाचारामुळे ते कलाकारांना प्रोत्साहन देण्याऐवजी, स्वतःच्या प्रचारासाठी वापरतात. सरकार प्रबोधन कलेची हत्या करत असल्यामुळे समाजातील विषमता वाढत आहे. राजकारणी कलेचे दुश्मन बनल्यामुळे फुले-टिळकांच्या वारशाला कलंक लागला आहे.
१५१० ते १९६१ पर्यंत पोर्तुगीज वसाहतीखाली असल्यामुळे, गोव्यात युरोपियन प्रभाव आणि स्थानिक संस्कृतीचे मिश्रण झाले. इन्क्विझिशन काळात धार्मिक दडपशाही झाली, पण पुढे प्रबोधनाची सुरुवात झाली.
गोमंतकीय मराठी वाङ्मयात जनसेवेचे प्रबोधन दिसते. गोवा मुक्तीनंतर, कोकणी-मराठी-इंग्रजी साहित्य आणि इतर कलांमधून, पर्यावरण, शिक्षण आणि महिला हक्क या सारख्या विषयांवर सामाजिक जागृती झाली. गोमंतकीय इतिहासात, प्रबोधन कलेने वसाहतवाद विरोधी चळवळीचा भाग बनून, गोवा भारतीय संघात समाविष्ट होण्यास मदत केली.
कौटुंबिक-सामाजिक बांधीलकी सांभाळत आपला वारसा जपण्याची ‘गोंयकारांना’ फारच हौस. जुनी घरे, वस्तू, जमीन-जुमला व इतर भावनिक वस्तूंकडे पूर्वजांच्या नजरेने ‘नोस्टेलजिक’पणे पाहत आयुष्य जगण्यात त्यांना आयुष्याची ‘परिपूर्णता’ वाटते.
उच्च शिक्षित आणि सधन असूनही ‘निराश’ असलेल्या ‘गोवेकरांना’ सुखाचा शोध या ‘नोस्टेलजिक’पणात खचितच सापडेल. पूर्वी नवीन सून घरी आल्यावर तिला घराण्याचा पारंपरिक वारसा जपण्याची सक्ती केली जायची.
आज चार भावांच्या चार गावातून आलेल्या बायका, चतुर्थीसारख्या सणांत आपल्या आईकडचे संस्कार-कायदे श्रेष्ठ असल्याचे, सासरच्या आणि शेजारच्या लोकांना दाखविण्याच्या नादात, ‘वारशाचे’ तीन-तेरा वाजवताना, एकाच बॉलने, एकाचवेळी फुटबॉल-हॉलीबॉल-बास्केटबॉल खेळण्याचा अनुभव देतात.
गावकरी मागासलेले असल्याचे वाटून, शहरी आप्तेष्टांकडून त्यांना ‘अपलिफ्ट’ करायचा प्रयत्न होतो. फ्लॅट-मॉल संस्कृतीत जगूनही अंध-श्रद्धांच्या गर्तेत सापडलेल्यांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे. दिल्लीकर-राजकारणी-दलालांनी गोव्यातील गावांचे शहरीकरण करून ‘सत्यानाश’ केलाच आहे.
हनुमानापूर्वी नारदही अंतराळवीर होते. रामाकडचे ‘पुष्पक’ विमान अंतिमसमयी वापरता आले नाही, पण तुकाराम ‘सदेह विमानाने’ वैकुंठास गेले. देव आणि धर्माच्या नावाखाली चमत्कार, ज्योतिष, कर्मकांड सारख्या अंधश्रद्धा पसरल्यामुळे माणसाने बुद्धी गमावली. भारतात अंधश्रद्धेने जहाल रूप धारण करून धार्मिक उन्मादातून हिंसा, दंगली आणि विभाजन घडविले. ‘प्रबोधन कला’ मानवतेच्या प्रगतीचे शस्त्र असून समाज, सरकार आणि राजकारण्यांनी जबाबदारीने ती पुनरुज्जीवित केली पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.