Paresh Joshi: धड पडेपर्यंत इतरांसाठी धडपडणारे, परक्यांसाठीही ईश्वर ठरलेले 'परेश जोशी'

Paresh Joshi Passes Away: व्यावसायिक म्हणून नावाजलेले असतानाही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जाणिवा तरल आणि आग्रही असलेली व्यक्ती जाते, तेव्हा प्रत्येक क्षेत्राचे बहुरंगी नुकसान होते.
Paresh Joshi
Paresh Joshi Dainik Gomantak
Published on
Updated on

व्यावसायिक म्हणून नावाजलेले असतानाही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जाणिवा तरल आणि आग्रही असलेली व्यक्ती जाते, तेव्हा प्रत्येक क्षेत्राचे बहुरंगी नुकसान होते. धड पडेपर्यंत इतरांसाठी धडपडणारे, केवळ स्वकीयांसाठीच नव्हे तर परक्यांसाठीही ईश्वर ठरलेले व ‘परांचा ईश्वर म्हणून परेश’ हे नाव सार्थ करणारे परेश जोशी वास्कोची ओळख ठरले. अंत्ययात्रेला येणाऱ्या माणसांच्या संख्येवरून गेलेल्या व्यक्तीची महती लक्षात येते, तर समाजमाध्यमांवर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अस्तित्वाची खरी पोचपावती देतात.

परेश यांच्या निधनाचे वृत्त पसरताच माध्यमांवर व्यक्त झालेल्या भावना सकारात्मक व बोलक्या होत्या. कुणासाठी परेश प्रथितयश रंगकर्मी, शिक्षणधुरीण; तर तर कुणासाठी ख्यातनाम उद्योजक, कानसेन, गुणग्राहकता ओळखणारे कलासक्त परिस. त्यांच्यातील देवभोळेपण अन् तितक्याच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनासह विविध आयाम आणि नानाविध पैलू दुर्मीळ व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे. कृष्णकमळीच्या एका देठावर शेकडो पाकळ्या अनंताचा निळा रंग घेऊन परिसर सुगंधित करत असतात, तशी परेश ही एक व्यक्ती कितीतरी क्षेत्रांत वावरत होती.

त्या क्षेत्रांना सावरीत होती. व्यवसाय हा जगण्यासाठी आवडीचा नसला तरी करावा लागतो ही व्यवहाराची गरज असते. पण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र हे विधायक व्यसनच असते, श्वास असतो, रक्तगट असतो. परेश हे त्याचे प्राधान्यक्रमाने घ्यावे असे उदाहरण.

Paresh Joshi
Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोव्यातील शेकडो श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये श्री दामोदराचे अधिष्ठान लाभलेले परेश जोशी व त्यांच्या कुटुंबाचे वेगळेपण नेहमीच दिसले. त्यांनी आपली संपत्ती केवळ श्रीमंतीत गुंतवली नाही, तिच्यात संस्कृतीची उदार मिसळ केली. संपत्ती आणि संस्कृतीचा सुंदर मेळ परेश यांनी साधला, जो इतरांना भावला.

कला अकादमीचे संचालक या नात्याने त्यांनी दिग्गज कलावंतांना गोमंतभूमीत आणले. गोव्यातील हौशी रंगभूमीला वळण देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. ‘पायाला धरून स्टेजवर कसे उभे राहावे; हाताला धरून कायिक अभिनय कसा करावा हे परेश यांनी शिकवले’, असे सांगणारे अनेक दिग्गज आज कार्यरत आहेत.

१९७४च्या सुमारास त्यांनी ‘अ‍ॅमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक’ असोसिएशन या हौशी नाट्यसंस्थेची स्थापन करून ‘पती गेले गं काठेवाडी’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘एवंम पराजित’, ‘बिकटवाट वहिवाट’, ‘येरू’ अशी नाटके कला अकादमीच्या स्पर्धेद्वारे रंगमंचावर आणली. गुलझार, मोहन आगाशे, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या नामवंत कलाकारांचे व साहित्यिकांचे पाय परेश यांच्या पुढाकारामुळे वास्कोनगरीत लागले, हे विसरता येणारे नाही.

संस्कृती आणि इतिहासासंदर्भात परेश यांच्याकडे जिज्ञासा होती. वास्को शहराने बदललेली रूपे, देदीप्यमान कालपट जोशी गप्पांमधून सहज उभा करीत. पुण्यात उच्च शिक्षण घेतलेले परेश यशस्वी ऑटो डीलर व ऑटो सर्व्हिस व्यावसायिक बनले. कौटुंबिक व्यवसायात त्यांनी प्रगती साधत सांकवाळ व खोर्ली औद्योगिक क्षेत्रात संघटना उभारण्यात मोठा वाटा उचलला. वाहन विक्री व्यवसायातील बदलते आयाम व बारकावे सांगताना जोशी रंगून जायचे.

पूर्वीच्या काळी वाहन खरेदीनंतर ग्राहकाच्या चेहऱ्यावरील विलक्षण आनंदाचे भाव शब्दबद्ध करताना ते हरखून जात. ‘गोवा पेट्रोल पंप मालक संघटने’चे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. उद्योगविश्वातही त्यांची घारीसारखी नजर व सखोल अभ्यास इतरांसाठी मार्गदर्शक ठरायचा. १९८७ ते १९९० या कालावधीत त्यांनी मुरगावचे नगराध्यक्षपद भूषविले. परंतु राजकारणातील डावपेचांचे गणित त्यांना रुचले नाही, त्यात ते रमलेही नाहीत.

अधिकार आणि सत्तेपासून दूर राहण्याची वृत्ती परमार्थाकडे नेणारी होती. शिक्षणामुळे अंधश्रद्धा, अज्ञान, गरिबीवर मात करता येते, अशी ठाम धारणा बरेच बदल घडवू शकली. ‘मुरगाव एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था त्यांचे वडील दिवंगत अण्णा जोशी यांनी स्थापन केली होती. त्यांनीच ही संस्था दीर्घकाळ एकहाती सांभाळली आणि वाढवली.

Paresh Joshi
Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

त्यांच्या मृत्यूनंतर परेश यांनी सहजतेने अध्यक्षपद स्वीकारणे अपेक्षित होते. पण त्यांनी ती भूमिका नाकारली आणि ती जबाबदारी इतरांना दिली. नि:स्वार्थतेची ती विलक्षण साक्ष होती. संस्थेचा विकास झाला, अर्थात त्यात परेश यांचे सावलीसारखे पाठबळ राहिले. बऱ्याच संस्थांसाठीही त्यांनी योगदान दिले. तल्लख स्मरणशक्ती, भवतालाविषयीची सजगता, मनी सहानुभाव ही गुणवैशिष्ट्ये श्री दामोदराच्या सहवासात प्रासादिक अनुभूती बनून राहिली.

सर्वार्थाने अखेरपर्यंत वास्को जगलेले परेश यांच्या निधनाने इतिहास व वर्तमानातील सांधा निखळला आहे. आलेल्या प्रत्येकाचे जाणे निश्चित असते. आलेले अर्भक रडले नाही, तर त्याला रडवतात. जाताना किती डोळ्यांच्या पापण्या सहज, निर्भेळ ओलावल्या यावर मृत्यूचा सर्वांगसोहळा ठरतो, आयुष्यपुष्पाचे निर्माल्य होते. श्री दामोदराने धाडलेले हे प्रसादपुष्प पुन्हा आपल्या हृदयाशी घेताना, त्या कमलनयनाचे डोळेही कृतार्थतेने पाणावतील!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com