Panaji: 'स्मार्ट सिटी'चे काम सध्या अशेच आसूं! कोट्यवधी खर्च केलेली पणजी, रस्त्यांचा गोंधळ, विजेचा लपंडाव आणि कला अकादमीचे ग्रहण

Panaji Smart City: पणजीची परिस्थिती वर्णन करायला एक हिंदी म्हण अतिशय योग्य आहे. ‘अंधेर नगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा’. तर्कहीन, निरंकुश व्यवस्था. नष्ट होत चाललेली राजधानी. अंधःकारात चालली आहे.
Urban Development Panaji
Panaji Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

नीना नाईक

पणजीची आजची परिस्थिती वर्णन करायला एक हिंदी म्हण अतिशय योग्य आहे. ‘अंधेर नगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा’. तर्कहीन आणि निरंकुश व्यवस्था. नष्ट होत चाललेली राजधानी. अंधःकारात चालली आहे. अंध ज्याला दिसत नाही की दृष्टी असून दृष्टिहीन असण्याचा गंभीर आजार.

अंध ही अपंगत्वाची भाषा खरे तर आक्षेपार्ह आहे, विशेषण म्हणून नाइलाजास्तव वापरावी लागते. ह्याला लाक्षणिक पद्धत म्हणतात. जेव्हा अकार्यक्षमता दिसते तेथे चुका दाखवण्यासाठी हा प्रयोग करावा लागतो.

योग दिवस पार पडला; योग करण्यासाठी विशिष्ट जागा पणजीत उभारली. कोट्यवधी रुपये खर्च झाले. त्या दगडी मूर्ती एकमेकांकडे पाहू देखील शकत नव्हत्या. अंधाराचे जाळे स्पॉर्ट्स अथॉरिटी पर्यंत विणले गेलं होतं. त्यापुढे माझी हिंमत झाली नाही.

आधीच चष्मा, मोतीबिंदू. मी आंधळी कोशिंबीर कुणाबरोबर खेळणार? त्यात धोधो पाऊस. अंधाराचं साम्राज्य. त्यात लाटा किनाऱ्यावर आपटत होत्या. प्रेमाला उधाण आलेले. सरासरी योग करून फिट राहायचा प्रयत्न सकाळी मिळाला नाही तो मीलन आसनांत कार्य चालू होते. त्यात चूक त्यांची नाही. अंधाराची ते पाहून मला अंधारी यायची पाळी आली. असो. ही व्यवस्था की अवस्था?

मनात आले देवा, पन्नास कोटीच्या पणजीला माशांसाठी शेड बनवली त्यातील उरलेले पत्रे तरी या अडलेल्या प्रेमी युगुलांसाठी द्या. पन्नास लाख थोडेथोडके नाहीत त्यात पीडब्ल्यूडीने नवी कोरी शेड उभारली असती. असू, डौलदार शेड आता कामाची नाही. पत्रे कंत्राटदार घेऊन गेला असेल. पण पैसे दिले तर उघड्यावर बसणाऱ्या प्रेमवीरांची काळजी घ्या.

कारण पोलिस यंत्रणा तिथे नाही. दृष्टिदोष असणारे भाकीत करतील तिथे बलात्कार, खून, मद्य पिणे, सिगरेट सर्रास चालते. पण ड्रग अंधारात चालत नाही. गंभीर व्हा, योगायोग असेल. आपल्या दारीही होऊ शकते.

चालत म्हणू की पळत? ‘फॅब इंडिया’पर्यंत पोहोचले. गाडीत बसले. आंधळी मी. रस्त्याला डावीकडे ‘टाइम्स’ ऑफिससमोर किंचित गाडी पार्किंगसाठी लावणार, तेवढ्यात खांब दिसताच श्‍वानाने एक पाय वर करावा तद्वत गाडी एका पायावर उभी राहिली. माझाच आंधळेपणा असावा कदाचित; त्या गटारावर झाकण होते पण गाडीचे वजन ते बिचारे पेलू शकले नाही.

गाडीची ती ‘अ-लौकिक’ अवस्था आतूनच पाहण्यापलीकडे काहीही करणे हाती नव्हते. मग, कुणीतरी माझ्यासकट गाडी उचलली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केल्याच्या आनंदात तो म्हणला, ‘ये तिसरी गाडी हमने उठाई’. धन्यवाद त्या वॉचमन दादांचे. बिचारा पणजीचा मतदार आहे तो.

माझा दिवस अजून संपला नाही, घरी आले तर बत्तीगूल. ती रात्र वैऱ्याची परत अंधार. आज अंधेर राजा मला शिक्षा देत होता. डास आक्रमण करत होते. हेल्थ विभाग सकाळी खरे तर ‘डबा, बाटली, कुंडीतील पाणी काढा’ हे बोंबलून गेले होते. विहिरीत गेले सात आठ वर्ष मासे घालू ह्याचं आश्वासन देऊन जात होते.

आम्ही अंधपणे विश्वास ठेवत होतो. कदाचित देवमासा टाकणार असतील म्हणून प्रतीक्षा करतो. ते आले तेव्हा मीपण तोंडसुख घेतले. आत्ता ‘मी’चा जमाना. त्यांना महानगरपालिका घरासमोर वृक्ष का पाडत नाही, त्या वटवृक्षाच्या छायेत अनेक बाटल्या, वाळवी लागलेले झाड दाखवले. ‘ते आमका लागना’ म्हणत त्याने पळ काढला. कुणाला सांगणार? ‘उंच झाड आहे, मशीन पुरत नाही, वायरी लोंबकळतात म्हणून झाड कापता येत नाही’, हे आमचा हसरा काउन्सिलर सांगतो. मेयर त्यावर आंधळा विश्वास ठेवतो. विसंगत तर्क पण डास सुखावले.

तीन दिवसांच्या विजेच्या लपंडावानंतर कुठून तरी काळ्या वायरी ओढून ताणून उसनी वायर मीटरला जोडली. मनांत आले आपले वर जाण्याचे तिकीट खात्याने न मागता दिलं. मी धारिष्ट दाखवून विचारणा केली, ‘भाई, ही वायर जमिनीतल्यान वचूंक जाय. डेंजरस हें’. भाई, सोज्वळ होता. म्हणाला, ‘मॅडम, स्मार्ट सिटीचे काम सध्या अशेच आसूं. पाऊस वयतकीर पळेतां. खूप फीडर ट्राय केले आता यश आयले’. असलेली वीज जाईल या भीतीने मी निर्धारपूर्व अंध झाले.

Urban Development Panaji
Panaji: पणजी पालिकेने मासळी विक्रेत्यांसाठी उभारला मांडव, मंडपवाला झाला मालामाल; भरले 50 लाख भाडे

स्मार्ट सिटी, ती नशा, त्यात जाणिवा शून्य. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते ही अवस्था. वाली कोण नाही, हात झटकणारे अनेक. तरतूद ते बदली विचारणार कुणाला? किती असलं तरी पोटासाठी बाजार पालथा घालावा लागतो. कुठे नजर माराल तिथे पिचकाऱ्या, चित्रकार चुकेल पण पान, गुटखा खाणारे अचूक नेम मारतात. पाणी, त्यात ते मिश्रण. जिना त्यांच्या नावावरच केलाय. एखादा आंधळा कोपरा दाखवावा जिथे थुंकी नाही. पार्किंगची भयानक व्यवस्था. ती अघोषित, गुप्त, अनामिक पण प्रायोजित. कोण डोळस नाहीच. व्यवहार तो वेगळा अंदाधुंदीचा.

कला अकादमी पत्त्यातील जोकरसारखी उभी आहे, असे वाटते. काळ्या पडद्याआडून प्रतीक्षेत आहे. तपास, चाचपणी, बांधणी कणा नसल्यागत वावरते. कधी काळी ती तेजस्वी होती. पण कुणीतरी इतका प्रकाश तिच्यावर टाकला की तिला दृष्टिहीन केले. अस्पष्ट, अविवेकी निर्णयक्षमता. दूर गेलेली दृष्टी.

Urban Development Panaji
Panaji: धक्कादायक! स्मार्ट सिटी योजनेत 'पणजी'चा अनुल्लेख; केंद्राच्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजात राजधानीचे नाव नाही

कलाकारांचे ग्रहण केव्हा सुटणार? पारदर्शकपणा यावा ह्यासाठी नुसते डोळे मिचकावले असे होत नाही. नका काचेचे डोळे वापरू, रचनेत रुता. कॅसिनो त्याची कृती आणि उद्देश लपण्यासारखा नाही. त्याबरोबर येणारा सर्वेसर्वा काल्पनिक आंधळेपणा. अंध व्यक्तीला दृष्टीची जाणीव नसते पण ऐकण्याची तीव्रता असते. त्याची चेतना हिरावत नाही. आमदाराला स्पष्टपणे पाहण्याची क्षमताच खुंटली आहे. गरज आहे मार्गदर्शन, पूर्वसूचना, कृतीचे. हा दगडी आंधळेपणा आता पुरे.

पूर्व आंधळा, भौतिक आंधळेपणा, डोळेझाक पणा ह्यांची कार्यशाळा, शिकवणी नाही तर थिरपी शिकवा पणजीकरांना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com