
जयराम अनंत रेडकर
बालपणी शालेय शिक्षण घेताना ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर वादविवाद स्पर्धा व्हायची! या स्पर्धेत दोन गट परस्पर विरोधी दाखले देऊन आपलाच मुद्दा कसा बरोबर हे दाखवून देण्याची अहमहमिका लागायची. या वादविवादाचा समारोप करताना विज्ञान शिक्षक ‘विज्ञान हे दुधारी शस्त्र असून त्याचा गैरवापर केला तर ते शाप ठरते आणि योग्य वापर केला तर ते वरदान ठरते’ असे सांगून आम्हा मुलांची समजूत काढीत असत.
आज अशा प्रकारच्या वादविवाद स्पर्धा होतात की नाही हे माहीत नाही. कारण संगणक क्रांती झाल्यापासून विज्ञान शाप की वरदान हा प्रश्नच कुणाच्या मनात येत नाही. संगणकाचे छोटे रूप म्हणजे भ्रमणध्वनी म्हणजेच तुमच्या आमच्या हातात सतत राहणारा मोबाइल! अगदी पाळण्यात खेळणारे छोटे बाळदेखील या आधुनिक खेळण्याच्या नादात तहान भूक विसरते आणि रडायचे थांबते. असा हा मोबाइल आज सर्वव्यापी झाला.आहे.
भारतात ऐशी नव्वदच्या दशकात पहिला मोबाइल आला तो मोटोरोला या कंपनीचा. तो लांबीला बराच मोठा आणि जड असायचा. अगदी मोजक्याच आणि धनिक लोकांपाशी असा हँडसेट दिसायचा आणि तो प्रतिष्ठेचा विषय असायचा. कारण, त्यावेळी मोबाइलवर बोलण्याचा दर हा प्रत्येक मिनिटाला सोळा रुपये होता आणि हा दर दुहेरी होता. म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनाही बोलण्याचे आणि ऐकण्याचे पैसे भरावे लागत असत. तंत्रज्ञान विकसित झाले तसतसा मोबाइलचा आकार आणि वजन घटत गेले.
सहजपणे हातात आणि खिशात मावणारे हलकेफुलके मोबाइल बाजारात आले. या मोबाइलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. या सुविधांनी इतर अनेक उत्पादने मार खाऊन गेली. उदा. फोटो काढण्याची सुविधा मोबाइलमध्ये आली आणि कॅमेरा वापरणे कमी झाले, कोडॅकसारखी आघाडीची आणि नामांकित कॅमेरा कंपनी बंद पडली. जगभरातील त्यांचे हजारो कामगार आणि फोटो व्यवसाय करणारे फोटोग्राफर बेरोजगार झाले.
आकडेमोड करण्यासाठी वेगळा कॅल्क्युलेटर घ्यायची आता गरज उरली नाही. मनगटी घड्याळ हे आता केवळ शोभेची वस्तू झाली. वार, तारीख आणि काटेकोर वेळ याची माहिती मोबाइलमध्ये मिळू लागली. रात्रीच्या अंधारात विजेरीचे काम मोबाइल करू लागला. ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, युट्युब या गोष्टी एकाच उपकरणात उपलब्ध झाल्या आणि तेही अगदी स्वस्तात! पुराणकथांमधून नारद हे पात्र त्रिकालज्ञानी होते हे दाखवले आहे. आता आधुनिक युगातील मोबाइल हा त्रिकालज्ञानी नारद झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गुगलचे एक बटन दाबले की हवी ती माहिती त्वरित पडद्यावर प्रकट होते.
मोबाइल ही आता केवळ श्रीमंत लोकांची मिरासदारी उरलेली नाही. अगदी सामान्यांतील सामान्य माणूस मोबाइल विकत घेऊ शकतो. मोबाइल हातात नाही असा माणूस मिळणार नाही. कोविड काळात शालेय शिक्षणात मोबाइलचा वापर करणे अपरिहार्य झाले होते. ही साथ येण्यापूर्वी शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी मोबाइल वापरण्यावर बंदी होती कारण मोबाइल वापरल्याने त्यांचे अभ्यासातील लक्ष विचलित होते, त्यांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर त्याचा विपरीत परिणाम होतो असे मानले जायचे. मात्र कोविडची लाट आली आणि जग जणू स्तब्ध झाले.
संपर्काचे एकमेव साधन उरले ते म्हणजे मोबाइल! शाळा बंद पडल्या आणि शिक्षक मुलाम्ना घरबसल्या ऑनलाइन शिकवू लागले ते या मोबाइलच्या माध्यमातून! आज कोविडची साथ मागे पडली, जीवनगती सामान्य झाली. पूर्ववत शाळा सुरू झाल्या पण मुलांना मोबाइलची सवय इतकी अंगवळणी पडली की मोबाइलशिवाय त्यांचे पान हलेनासे झाले. शिक्षकही मुलाना गृहपाठ मोबाइलवर पाठवू लागले.
पालकांनी किंवा शिक्षकांनी मोबाइल वापरावर आडकाठी आणली तर मुलं रुसून बसायला लागली, प्रसंगी मोबाइलच्या हट्टासाठी आत्महत्या करू लागली. आपल्या मुलांचा हट्ट पुरवायचा की त्यांचा जीव वाचवायचा असा संभ्रम सामान्य पालकांपुढे उभा राहिला. व्यक्ती व्यक्तीमधील प्रत्यक्ष संवाद मोबाइलमुळे संपुष्टात आला. आणखी एक परिणाम झाला तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक! फेसबुक, व्हॉट्सअॅप यावर गलिच्छ आणि शिवराळ भाषेतील प्रतिक्रिया येऊ लागल्या.
संदेशवहनाचे उत्कृष्ट साधन असणारे हे संयंत्र अडाणी, असंस्कृत आणि लबाड लोकांच्या हातात गेले आणि या उपकरणाची उपयुक्तता डोकेदुखी ठरली. सतत मोबाइल कानाला लावून बसल्याने कर्णबधिरता आणि नेत्र विकार वाढले. मोबाइल नावाचा हा ब्रह्मराक्षस आता आपली पाठ सोडून देईल असे काही वाटत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.