
मिलिंद म्हाडगुत
परवा महालक्ष्मी देवस्थान बांदोडे येथे झालेल्या स्वातंत्र्यसैनिक रघुपती भांडारी यांच्या आत्मचरित्राच्या विमोचनाला वीजमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना एका वक्त्याने गेली पंचवीस वर्षे सुदिन एकाच पक्षात असल्याचा उल्लेख करून त्यांच्यामुळेच मगो पक्ष आपले अस्तित्व राखून आहे असे म्हटले. आता या त्याच्या विधानात अतिशयोक्ती आहे, असे कोणीच म्हणणार नाही. त्याकरता अर्थातच १९९९ सालात जावे लागेल.
त्यावर्षी झालेल्या निवडणुकीत मगोचे फक्त चार आमदार निवडून आले होते. प्रथमच मगो एवढ्या बॅकफुटवर गेला होता. दुसऱ्या बाजूला भाजपचे १० आमदार निवडून आल्यामुळे मगोला एक सक्षम पर्याय तयार होऊ लागला होता. त्यामुळे मगोचे भवितव्य धूसर वाटायला लागले होते.
त्यात परत २०००साली मगोचे तेव्हाचे सर्वेसर्वा असलेले रमाकांत खलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मगोची स्थिती, ‘असुनी नाथ मी अनाथ’सारखी झाली होती. मगोचे दुसरे नेते प्रकाश वेळीप यांनीही खलपांची री ओढल्यामुळे पक्षाची अवस्था किनारा सुटलेल्या तारूसारखी व्हायला लागली होती.
मगोच्या दुसऱ्या नेत्या शशिकलाताई काकोडकर या त्यावेळी पराभूत झाल्या होत्या, तर मगोचे झुंझार संसदपटू डॉक्टर काशिनाथ जल्मी यांनाही प्रियोळात भाजपच्या विश्वास सतरकरांकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. अशा विपरीत परिस्थितीत मगो दिशाहीन होणे साहजिकच होते. तसे पाहायला गेल्यास त्यावेळी सुदिन कोणाच्याच खिजगणतीत नव्हते.
एकतर ते त्यावेळी प्रथमच निवडून आले होते आणि दुसरे म्हणजे त्यांचे निवडून येण्याचे मताधिक्य फक्त सहाशे मतांचे असल्यामुळे त्यांच्या भवितव्याचाही प्रश्न होता. पुढील निवडणुकीत ते निवडून येतील की काय, याबद्दल अनेक जण संशय व्यक्त करत होते. असे सगळे असताना त्यांनी किल्ला लढविला हे विशेष. त्यांनीही त्यावेळी खलप वा वेळीप यांचा कित्ता गिरवला असता तर मगोने त्यावेळीच दम तोडला असता.
लक्षात घ्या, त्यावेळी मगोकडे कोणीही प्रस्थापित नेता नव्हता. सुदिन यांनी राजकारणात आपले पहिलेच पाऊल टाकल्यामुळे त्यांना मोठा नेता मानण्यास कोणच तयार नव्हता. अशावेळी सुदिन यांनी दोन कामे केली. एक म्हणजे मगोचे अस्तित्व राखले आणि दुसरे म्हणजे स्वतःला मडकईत प्रस्थापित केले. त्यामुळे त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते वाढत्या मताधिक्याने निवडून येऊ शकले.
सध्या मडकईत सुदिनांशी लढत देऊ शकेल असा कोण नेताच दिसत नाही. भाजपही या मतदारसंघात विशेष रस घेताना दिसत नाही. कदाचित या मतदारसंघात लक्ष घालणे म्हणजे दगडावर डोके फोडून घेणे असे त्यांना वाटत असावे.
नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्षपदी आरूढ झालेले दामू नाईक यांनीही अजूनपर्यंत तरी या मतदारसंघात लक्ष घातलेले बघायला मिळत नाही. असे असले तरी गेल्या पंचवीस वर्षांत मगो आपले गत वैभव प्राप्त करू शकलेला नाही, हेही तेवढेच खरे आहे. पण एक स्थानिक पक्ष म्हणून म्हणा किंवा या मातीतला पक्ष म्हणून म्हणा, आजही गोव्याला मगोसारख्या पक्षाची नितांत गरज आहे हे मात्र कोणीही नाकारू शकणार नाही.
आता सुदिन यांच्यावर हा पक्ष आपल्यापुरता वा आपल्या घरापुरता मर्यादित ठेवला, असे जे आरोप होतात त्याचाही विचार व्हायला हवा. ते कधी काँग्रेसशी तर कधी भाजपशी सोयरीक जुळवितात असे जे म्हटले जाते त्यावरही नजर मारली पाहिजे.
मगो पक्षाचे १९९९पासूनचे जे आमदार निवडून आले त्यातला एकही आमदार मगो पक्षात राहिलेला नाही. बाबू आजगावकर, दीपक पावसकर, पांडुरंग मडकईकर, कै. लवू मामलेदार ही याची ज्वलंत उदाहरणे. त्यामुळे सुदिन यांना हा पक्ष स्वतःच्या व भाऊ दीपक यांच्या बळावर चालवावा लागत आहे. काही जण याला सुदिन यांची एकाधिकारशाही जबाबदार असल्याचे सांगतात. पण त्याचबरोबर सुदिन यांना वजा केल्यास मगो पक्ष टिकेल का, याचे उत्तरही कोणी देताना दिसत नाही.
खरे तर नेत्यांच्या फुटीर वृत्तीमुळेच मगो पक्षाची ही अवस्था झाली आहे. रमाकांत खलप हे याचे मोठे उदाहरण. शशिकलाताई जेव्हा हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू पाहत होत्या तेव्हा याच खलपांनी तत्कालीन आमदार बाबूसो गावकर यांच्या मदतीने मगो पक्षाला वाचवले.
त्यामुळे तेच खलप प्रथम भाजप व नंतर काँग्रेस असे पक्षांतर करीत मगोला संपवायला निघतात हे अजूनही मनाला पटत नाही. परत त्यात खलपांना काही फायदा झाला असेही नाही. काँग्रेसमध्ये राहून ते परत कधीही आमदार व खासदार होऊ शकलेले नाहीत. हे सर्व पाहता सुदिनांचे महत्त्व अधोरेखित व्हायला लागते.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जेव्हा आजारी होते तेव्हा सुदिन यांना मगो भाजपमध्ये विलीन केल्यास मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती. पण सुदिन यांनी ती ऑफर नाकारली. त्यांनी ती ऑफर स्वीकारली असती तर मगो तर नामशेष झाला असताच, त्याशिवाय गोव्याचे राजकारणही बदलून गेले असते.
अर्थात या जर तरच्या गोष्टी असल्या तरी, सहा वेळा निवडून येऊनही सुदिन मगोमध्ये असल्यामुळे अजूनपर्यंत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आता २०२७साली काय होईल हे सांगणे कठीण असले तरी ‘अभी नही तो कभी नही’ ही धारणा बाळगून व आपल्या अनुभवाची कास पकडून सुदिन यांनी मगोचा कायापालट करण्याचे बघितले पाहिजे असे अनेकांना वाटते. ही शेवटची संधी समजून पुऱ्या तयारीनिशी त्यांनी रणांगणात उतरण्याची तयारी करायला हवी, असे मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसतात. आता ते असे खरेच करतात की काय, आगामी निवडणुकीत मगो पक्ष भरारी घेऊ शकतो की काय, याची उत्तरे येणारा काळच देऊ शकेल एवढे मात्र निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.