मये गाव 'सुजलाम्' करणारा तळेश्वर ओहळ; पाण्याच्या प्रत्येक थेंबाने पोसली गोमंतकीय संस्कृती

Traditional agriculture in Goa: ओहळ, खाडीतील मत्स्यधनावर जगत अनेक देवदेवतांच्या पूजनाने मये गाव घडवला होता.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

ओहळ, खाडीतील मत्स्यधनावर जगत अनेक देवदेवतांच्या पूजनाने मये गाव घडवला होता. आज त्या गावाला मँगनीज खाणी आणि प्रदूषणाने घेरून पूर्वजांची कृषी आणि संस्कृती धोक्यात आली आहे.

माणसाला जन्मानंतर मिळालेले आयुष्य अमूल्य आहे. नियती आणि प्रारब्ध यात काहीही असले तरी मिळालेल्या आयुष्यात चांगले काम करणे, ही भावना दुसऱ्याचा विचार करणारी असते. ती त्यागाची भूमिका होय! सुखसमाधान, आनंद, हास्य हे समजून घेतले पाहिजे. चंचल वारा पावसाला ढकलून खाली आणतो. त्या पावसाने मृदा भिजून तिच्यातील मृद्गंध बाहेर पडतो. ओल्या मातीवर कुदळ चालल्यावर त्यातून बाहेर पडणारा बियाण्याचा कोंब ऊन वाऱ्याच्या संगतीने हिरवे रूप धारण करतो.

हिवाळ्यात रात्री पडणाऱ्या ओल्या दवबिंदूचे कण झाडांच्या पानावर पडून एकत्र होत पहाटेच्यावेळी पाण्याच्या रूपात टपटप करीत झाडाखालच्या सुकलेल्या पाला-पाचोळ्यावर पडून, तो ओला झाल्याने त्यांच्याच मुळांना ओलावा देतो. त्याने झुडपे, वेली टवटवीत होतात. भूमिका वसुंधरेचे हिरवे दंडकारण्य आणि वर निळ्या मंडपात लखलखणाऱ्या गोलाकार सुवर्ण छत्राने पाठवलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने जुनाट वृक्ष कोसळून पडतात.

Goa
Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

संध्याकाळच्यावेळी पश्चिम दिशेला दिसणारा लाल-गोळा शिकारी बनून दिवसरूपी हत्तीचा वध करून आपल्या अंगावर रक्त लेपून रंगल्यागत भासतो. उन्हाळ्यात मंजूळ आवाजाने वाहणारे झरे, ओहळ सुकून त्यांच्या पात्रातील खडबडीत भूमी दाखवतात. पावसाळा सुरू झाला म्हणजे डोंगरमाथ्यावरून फोफावत स्वाली येणारे रुपेरी प्रवाह ओहोळात एकत्र होऊन दोन्ही काठ भरून जातात. डोळ्यातील तीक्ष्ण नजरेप्रमाणे त्यातील पाणी दूरवरचा नदी किनारा गाठतात.

सागरातून आलेले खारे पाणी नदीच्या गोड पाण्यात भरती लाटांच्या तडाख्याने मिसळून ते पाणी-जोरदार प्रवाहाने खाडीतून मिठागराच्या शेतात भरून सूर्याच्या उष्णतेने वाफून लोण्याप्रमाणे दिसणाऱ्या मिठाला जन्म देते. ते मोती मीठ जैवविविधतेचे पोषण होण्यास उपयोगी पडते. मीठ पदार्थ वासना नष्ट करीत निर्मळ प्रतिमा निर्माण करते. अशा चक्राने सागराचे पाणी उष्णतेच्या बाष्पाने वर जाऊन परत त्याचे पावसात रूपांतर होऊन तापलेल्या वसुंधरेला थंड करते.

उन्हाळ्यात तापून पानगळ झालेला पारिजातक पहिल्या पावसाचे थेंब गिळतो. आपल्या अंतरंगातून हिरव्या पालवीस जन्म देतो. आषाढाची चाहूल लागताच सफेद फुलातून रात्री दरवळ पसरवत मन मोहून टाकतो. त्यावर फुललेली सुमने गळून पृथ्वीच्या दिशेने झेप घेत खाली सभोवार सडा घालून उष:कालाची वाट पाहतात.

प्रथम पावसाच्या सरीची वाट पाहणारा चातक आणि राजहंस अंगावर पावसाचे थेंब पडल्याने नवरीप्रमाणे चंचल होतात. निर्झर झरे वाहू लागताच, वेली, कदंबवृक्ष, अशोक, केशर, देवदार, हत्ती, वनराज, हरीण, बगळे, टिटवी, कावळा, पर्वत, पगरे, अशा घटकांना भेट देत वर्षाऋतूचा प्रवास चाललेला असतो. श्रावणातील निळ्या घनात मोर आपला पिसारा फुलवून नाचतो. त्याच्या प्रत्येक पिसावर डोळ्याप्रमाणे आकृत्या दिसतात.

अशा अमृतरूपी पाण्याला ऋषिमुनींनी आणि संतांनी संजीवनी मानून ओहळ, नदी, सागरांचे किनारे तीर्थक्षेत्रे बनवली. आपल्या पूर्वजांनी इच्छा शक्तीच्या जोरावर मनाचा निर्धार करून ओहळ नदीत बंधारे घातले. ओहोळाच्या पात्रातून वाहणारे पाणी अडवून उपशाने ते पाटातून दूरवर नेऊन दिवस आणि रात्रीच्या चांदण्यात सिंचन करून कृषी-शेती, बागायती वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. स्वकष्टांने पिकवलेल्या धान्यावर ते.

जगले देवाच्या भक्तीप्रमाणे पाणी शुद्ध राखीत निर्मळ ठेवले ते फक्त आपल्या भविष्यासाठी. गोव्यातील अनेक ठिकाणी डोंगराळ भागात पूर्वजांनी बांधलेले तलाव मी पाहिले आहेत. बेतकी, सावई, केरी, खांडेपार, सावईवेरे, बांदोडा, शिरोडा, पिळर्ण, लामगाव, मुळगाव, व्हाळशी, चिंबल, करमळी, सांताक्रूज, साकवाळ, कुडतरी, कुडचडे, पिलार या गावांतील तलावांच्या पाण्यावर पूर्वजांनी गोव्यात अन्नधान्याची क्रांती घडवली होती. अशाच प्रकारचा मयेचा तळेश्वर तलाव आहे.

तिथल्या डोंगराच्या कुशीत पूर्वजांनी तयार केलेल्या त्या तलावाच्या पाण्याने मये गावचे कृषी क्षेत्र, जैवविविधता पोसली होती. या ओहोळाचा उगम तलावाच्या पूर्व दिशेला उंच डोंगरातील घळीत दोन्ही बाजूतील ‘मोग्याचो ओहळ’ आणि ‘गुडग्याचा ओहळ’ झऱ्याच्या रूपाने वाहत प्रवासाने खाली येऊन काही अंतरावर एकत्र होतात. त्या ठिकाणी तिथल्या पूर्वजांनी ओहोळाच्या पात्रात नैसर्गिक बांध उभारून पट्टोळे तलाव निर्माण करून वाहणारे पाणी साठवले.

त्या तळ्याच्या खालच्या भागात आणखी दोन ओहळ त्या डोंगरावरून वाहत खाली येतात ते ‘होण्यांचा ओहळ’ आणि ‘वज्राचा ओहळ’ नावाने ओळखतात. त्या ओहोळाच्या पाण्याने खालच्या भागात पाण्याचा प्रवाह आणखी मोठा होतो. ते हेरून पूर्वजांनी घळीतील खालच्या भागात बराच लांब आणि उंच नैसर्गिक बांध उभारून बराच मोठा तळेश्वर तलाव निर्माण केला. त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवले. बांध उभारण्यास झाडांचा पालापाचोळा, ओंडके, भिल्लमाडाच्या कांबी आणि मातीचा उपयोग केला होता.

Goa
Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

मोठ्या तलावाचे पाणी बांधाखालून मानशीप्रमाणे वाट ठेवून बाहेर पडत असे. पाणी ओहोळाच्या दोन्ही काठावरील ‘चिचभटवाडी’ आणि ‘देऊस भटवाडी’ कुळागर बागायतीना देण्यास लांब पाटाने टप्याटप्याने खाली नेऊन सिंचन करण्यास वापरले. बागायतींच्या सखल मध्य भागात सरदवायंगण भातशेती आहे, त्या भातशेतीलाही पाणी पुरवण्याची व्यवस्था केली. सरदवायगण भातपीक घेत, वरच्या भागातील कृषी फुलवीत ओहळ पुढच्या प्रवासात कुंभारवाडा परिसरातील शेती बागायतीला पाणी देतो. तिथून पुढे ‘फोवाची कोंड’ बांधाकडे जातो.

तिथला परिसर पाण्याने ओला करून, फोवाची कोड बांधाकडे अडवलेल्या पाण्याने खालच्या भागातील साष्टवाडा शेतीबागायतीला पाण्याचा पुरवठा करतो. त्या पुढच्या प्रवासात ओहोळाचे पाणी सावना भागातील शेतीला पुरवठा करून पुढे जात प्रवाह पोयखळीत खार पाण्यात मीलन घडवीत लांब प्रवासाने नदीच्या बांधामधील मानशीतून खाडीच्या रूपाने नदीस मिळतो.

पूर्वजांनी तयार केलेली मानस नैसर्गिकपणे दोन काम करते. भरतीला थोपवून धरत ओहोटीच्या पाण्याला मानशीची कवाड उघडून वाट देते. भरती येताना नदीतील मासळी पोयखळीत प्रवेश करते आणि ओहोटीवेळी पाण्याच्या प्रवाहाने मानशी वाटे नदीत जाते. अशाने मत्स्यधनाची वाढ होते.

मयेच्या तळेश्वर ओहोळाच्या पाण्यावर आंबा, फणस, सुपारी, काजू, मिरी, मिर्ची, कांदा, भाजी, कोकम, ओटम, कडधान्ये, ओहोळातील गोड्या पाण्यातील मासळी, खळीच्या खार-गोड पाण्यातील मासळी, अनेक प्रकारची गोमंतकीय पिकांचे भातबियाणे आणि जैवविविधता सांभाळण्यास पूर्वजांनी या ओहोळाच्या काठावर सोवळेपणाची स्वच्छता राखली. कष्टांच्या ताकदीवर शेती बागायतीतील धान्य पिकवले. ओहळ, खाडीतील मत्स्यधनावर जगत अनेक देवदेवतांच्या पूजनाने मये गाव घडवला होता. आज त्या गावाला मँगनीज खाणी आणि प्रदूषणाने घेरून पूर्वजांची कृषी आणि संस्कृती धोक्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com