अग्रलेख: दरोडेखोरांना गोव्‍यात साह्य कुणी केले?

Mapusa Theft: गणेशपुरीत दरोडा पडल्यानंतर दरोडेखोर काही तास डॉ. घाणेकरांच्या घरात होते. त्यांनी घर सोडल्यानंतर जबाबदार व्यक्तीने बांधलेल्या अवस्थेतून स्वत:ची सोडवणूक करून घेतली.
Crime News
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा दरोडा प्रकरणी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे लोक संतापले आहेत. अनेक ज्येष्ठांची कुटुंबे बंगल्यांमध्ये राहतात. डॉ. घाणेकर यांच्यावर ओढवलेली परिस्थिती आपल्यावर येऊ शकते, अशा भीतीने पणजी, म्हापशातील नागरिक अक्षरश: हवालदिल झाले आहेत.

दरोडेखोर चार राज्यांच्या सीमा ओलांडून बांगलादेशात परागंदा झाले, असा कयास आहे, तो खरा झाल्यास धोका मोठा आहे. चोहोबाजूंनी जोरदार टीका होऊ लागल्याने पोलिसांनी दोन संशयित पकडल्याचे जाहीर केले;

परंतु मुख्य संशयितांनी हातावर तुरीच दिलीय. गणेशपुरीत दरोडा पडल्यानंतर दरोडेखोर काही तास डॉ. घाणेकरांच्या घरात होते. त्यांनी घर सोडल्यानंतर जबाबदार व्यक्तीने बांधलेल्या अवस्थेतून स्वत:ची सोडवणूक करून घेतली.

पोलिसांना घटनेची कल्पना दिली. कुटुंबीयांची कार घेऊन दरोडेखोर पळाले. आरोग्य क्षेत्राच्या डिक्शनरीतील ‘गोल्डन अवर’ पोलिसांच्या तपासकार्यातही असायला हवा. वेळीच राज्य सीमांवर नाकाबंदी केली असती तर आज कदाचित चित्र निराळे असते.

म्हापशातील प्रकाराने जशी सामाजिक भीती वाढवली, त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणेतील त्रुटी उद्धृत केल्या. त्यावर कधी विचार होणार? दरोड्याला नऊ दिवस उलटले. त्या रात्री ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का?

असल्यास काय झाली, हे अद्याप कळलेले नाही. कळणार कसे? पोलिस दलाचे राजकीयीकरण झाल्याने तशी भूमिका घेण्याची कुणाला गरजही वाटत नसावी.

सहा महिन्यांपूर्वी दोनापावला येथे धेंपे कुटुंबीयांच्या बंगल्यावर दरोडा पडल्यानंतर तपास कुठवर आला, या संदर्भात पोलिस मुखी मिठाची गुळणी घेऊन बसले आहेत. अपयश आले तर हरकत नाही, परंतु त्यामधून बोध काय घेतला? दृश्य स्वरूपात बदल दिसलेला नाही.

तपासाविषयी मौन धारण केल्यावर सर्व प्रश्‍न मिटतात ही पळवाट अपयशावर पांघरूण घालेल; पण सत्य लपवू शकत नाही. दरोडेखोर खरेच बांगलादेशात पोहोचले असतील तर ते केंद्रीय यंत्रणांचेही अपयश आहे.

शेख हसिना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर बांगलादेश भारताचा मित्र राहिलेला नाही. भारत- बांगलादेश सीमेवरून कोणीही सहजतेने येत जात असल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता बळावत राहील. सीमाभागांत सक्षम गस्त नसल्यास ती शरमेची बाब आहे.

दोनापावला-म्हापशातील घटना गोमंतकीयांच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना करण्यास पुरेशा आहेत. गोव्यात परप्रांतीयांचे जत्थे येत आहेत. ‘स्वीगी’, झोमॅटो’, इन्स्टामार्ट’साठी काम करणारे; ‘एसी’ दुरुस्त करणारे कित्येक परप्रांतीय आहेत.

त्यांची कठोरपणे माहिती ठेवली जाते का? त्यांच्यात चोरटेही असू शकतात. अमली पदार्थ ने-आण करण्यात त्यांचा सहभाग आढळून आला आहेच. गोव्यातील कोणत्याही रेल्वे स्टेशनवर उभे राहिल्यावर परप्रांतीय कसे झुंडीने येतात ते कळेल.

म्हापसा दरोड्यात सापडलेले संशयित हे कर्नाटकात राहत होते, अशी माहिती पोलिस देतात. त्यांनी मुख्य संशयितांना महत्त्वाची मदत केल्याचे पोलिस म्हणतात. मग प्रश्‍न असा आहे, गोव्यात रेकी कुणी केली? दरोडेखोरांना गोव्यातील माहिती देणारे कोण आहेत?

दोनापावला येथील दरोडा पचला, म्हापशातही तेच झाले. परप्रांतातून येऊन येथे वास्तव्य करणाऱ्यांना कुणीतरी साह्य केल्याशिवाय हे दरोडे यशस्वी होणे शक्य नाही. सरकार ‘माझे घर’ योजना जाहीर करते; पण नागरिकांचे घर खरेच सुरक्षित आहे का? भरीस भर पर्वरीत पोलिस बनून वाहनचालकाला लुटणारी इराणी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Crime News
Mapusa Theft: म्हापसा दरोडा प्रकरणी दोघा बांगलादेशींना अटक! कर्नाटकात आवळल्या मुसक्या; मुख्य सूत्रधार अजून मोकाट

ही वेळ कठोर आत्मपरीक्षणाची आहे. पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्या करताना निकष बाळगायलाच हवे. अन्यथा गुन्हेगार आणखी बोकाळतील. दरोडा घरांवरच नव्हे तर समाजाच्या विश्वासावर झाला आहे. तो पुनर्स्थापित करण्याचे काम प्रशासनाचे आहे.

आज लोकांच्या मालमत्तेवर पडलेला दरोडा, उद्या देशावरही पडू शकतो. इथली यंत्रणा किती कमजोर आहे, याची ‘लिटमस टेस्ट’ करण्यासाठी हे दरोडे आहेत. शिक्षणाचा व्हिजा कालावधी संपल्यानंतरही अनेक बांगलादेशी मुंबईत वावरत आहेत.

Crime News
Mapusa Theft: म्हापसा दरोडा! दरोडेखोरांची टोळी 4 राज्ये ओलांडून बांगलादेशात? पोलिसांचे प्रयत्न तोडके

त्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. सुरक्षा यंत्रणा, सामाजिक स्थिती, पोलिस प्रशासन, सरकार हे सर्व विशिष्ट परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देतात, कशा पद्धतीने वागतात, याचा अभ्यास अशा दरोड्यांच्या माध्यमातून केला जात असेल तर ते राज्यहितासाठी व देशहितासाठीही घातकच आहे.

दिलीप पांढरपट्टे म्हणतात, त्याप्रमाणे ‘जी झुळूक वाटली छोटी, ते मोठे वादळ होते’, अशी परिस्थिती ओढवण्यापूर्वी सावध होणे गरजेचे आहे. सरकार, प्रशासकीय यंत्रणा खरोखरच याबाबत गंभीर आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com