
डॉ. संगीता साेनक
लहानपणी वडिलांबरोबर पणजीच्या मासळी बाजारात कधी गेले तर अनेक नुस्तेकान्नी ‘यो रे बाबा, घे रे बाबा’ करून बोलवायच्या. अगदी काही वर्षांपूर्वीसुद्धा मासळी बाजारात ‘बाय, बरी मानशेची सुंगटा आयल्यात मगो’ ऐकू यायचे. ‘ताजी गातन व्हर गो, बाय’ असे म्हणून ताज्या ताज्या मुड्डश्यांची गातन हातात टेकवायच्या. ‘बेस बरे मानशेचे नुस्ते मगो बाय’ ‘तोरा घालून बरेंऽऽऽ सुंगटाचे हुमण कर गे आज’ असे मोठमोठ्याने काढलेले उद्गार कानावर यायचे.
मासळी मार्केटात जाणे हा तेव्हा एक छान अनुभव असायचा. कितीतरी ओळखीचे चेहरे तिथे दिसायचे. कधी रोजच्या तर कधी खूप दिवसांनी भेटीगाठी व्हायच्या. गोंयकारांना अत्यंत प्रिय असलेले ‘मानशेचे नुस्ते’ म्हणजे काय हे मी आधी तिथे ऐकले. आज मात्र किती खाजन आणि मानशी गोंयकारांच्या हातात आहेत हा प्रश्न आहे.
खाजन (खाजण) ही प्रामुख्याने भात आणि माशांचे पीक घेणारी शेते आहेत. या शेतांत मीठ, भाज्या आणि नारळ पण लावले जातात. मुहाना (estuarine) क्षेत्रात असलेली ही हिरवीगार शेते आदिम अभियांत्रिकीपासून निर्माण झालेल्या अद्भुत कलाकृती आहेत. जवळ जवळ साडेतीन हजार वर्षांपासून ही कार्यरत असावीत असे मानले जाते.
गोव्यातील खाजन जमिनी म्हणजे नुसती शेते नाहीत तर भवतालच्या अनेक सजीव आणि निर्जीव घटक सामावून घेणाऱ्या परिसंस्था आहेत. शेतांभोवती बांध घालून भरती-ओहोटीचा प्रभाव नियंत्रित केला जातो. हे मोठे बांध खाऱ्या पाण्यापासून शेतांना आणि गावांना संरक्षण देतात.
नदीचे पाणी आत घ्यायला ‘मानस’ नावाचे एक लाकडी फाटक दोन्ही बाजूंनी जांभ्या दगडांनी बांधलेले असते. भरतीच्या वेळी आलेल्या पाण्याच्या जोराने मानशीची फाटके आपोआप उघडली जातात. पाणी शेतात येते. पाण्याचा समतोल साधला की फाटक बंद होते.
भरतीच्या वेळी शेतात आलेले पाणी ओहोटीच्या वेळी परत नदीच्या पाण्याला मिळते. शेतात येणारे पाणी साठवायला ‘पोंय’ हा विहीरीवजा खड्डा खणलेला असतो. यात साठणारे पाणी शेतात वाहून न्यायला एक कालवा असतो. अत्यंत सुलभ अशी ही वास्तुशिल्परचना स्थानिक नैसर्गिक संसाधनापासून बनलेली आहे.
शेकडो वर्षे कार्यरत असलेली ही परिसंस्था हल्लीच्या काळात मात्र जीर्णावस्थेत दिसत होती. मी खाजनवर संशोधन सुरू केले तेव्हा गोव्यातील एकूण खाजन अठरा हजार हेक्टर असल्याची १९६०च्या दशकात गोळा करण्यात आलेली माहिती उपलब्ध होती. अगदी काही दिवसापर्यंत हेच मोजमाप खाजन जमिनीच्या बाबतीत वापरले जात असे.
खाजन जमिनीचे रूपांतर अन्य वापरासाठी होत असलेले आपण बघत असलो तरी अठरा हजार हेक्टरपैकी किती खाजन गोव्यात शिल्लक आहे याचे काहीच मोजमाप उपलब्ध नव्हते; निदान सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे ‘पब्लिक डोमेन’मध्ये तरी नव्हते.
सरकारी खात्यांकडूनही कालपरवापर्यंत अठरा हजार हेक्टर हेच मोजमाप वापरले जायचे. आता अचानक ते माप दहा हजारवर येत आहे. लवकरच आठ हजार हेक्टर खाजन जमीन कुठे गेली हे आपल्याला कळेल अशी आशा आहे. एवढी मोठी जमीन हवामानबदलाच्या नावाखाली नष्ट होऊ शकत नाही.
कुठल्या जमिनी कुठल्या कारणांनी नष्ट झाल्या आहेत ते जाणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. आता तर पर्यावरण दिनी सरकारने घोषित केल्याप्रमाणे सरकारी पोर्टल सुरू होणार आहे म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत गोव्यात आता थोडी तरी पारदर्शकता येईल असे मानायला हरकत नाही.
खाजन परिसंस्थेसाठी दीड-दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सध्या एवढा निधी राखून ठेवलेला आहे. अजून जास्त निधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे आपली खाजन शेती लवकरच सुजलाम-सुफलाम होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी नष्ट झालेली शेते येत्या दोन-तीन वर्षांत हिरवीगार दिसतील अशी आशा आहे. खाजन परिसंस्थेच्या पुनर्संचयनासाठी देशातील काही नावाजलेल्या संस्था आणि तज्ज्ञ सहभागी होतील. या तज्ज्ञांना खाजन परिसंस्थेबद्दल संपूर्ण माहिती असेल, अनुभव असेल अशी आशा आहे.
खाजन ही एक परिसंस्था आहे. अनेक सजीव आणि निर्जीव घटकांना सामावून घेणारी. आदिम अभियांत्रिकीचा एक सुंदर आविष्कार. अनेक वर्षे चालत आलेली रचना. अनेक शतके चालत आलेल्या या पारंपरिक तंत्रज्ञानात काही बदल करताना या बदलांचे पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (Environmental Impact Assessment) झाले पाहिजे.
शेताभवतीचे बांध सिमेंट घालून पक्के करणे सोपे काम आहे, ते सिमेंटने बांधून घेण्याचा मोह आवरणे कठीण आहे. पण आदिम तंत्रज्ञानात बदल करताना त्याचा परिणाम या परिसंस्थेशी निगडीत असलेल्या अनेक सजीवांवर होणार नाही, याची खबरदारी घेणे जरुरीचे आहे. खाजन बांध शेतातील चिकणमाती आणि भाताच्या पेंढ्यांनी बनवले जात असल्यामुळे अनेक जीवांना प्रजननासाठी या बांधांत निवारा मिळतो.
अंडी घालायला जागा मिळते. याची दखल घेतली पाहिजे. खाजनात आढळणारी मगर ही आदिम खाजन संस्कृतीचा भाग आहे. गोव्यातील खाजनात दिसणारी ऊदमांजरे (पाणमांजरे) पाण्यातील, शेतातील रोगी आणि मेलेले मासे खाऊन टाकतात आणि शेते, पाणी स्वच्छ ठेवतात.
ही ऊदमांजरे आय यु. सी. एन.च्या असुरक्षित श्रेणीत गणली गेली आहेत. यांना संरक्षण देणे जरुरीचे आहे. त्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासांना म्हणजे खाजन परिसंस्थांना, संरक्षण देणे ही पहिली पायरी आहे. इतका मोठा खर्च आता खाजनांवर केला जाणार आहे. म्हणजे खाजनांचे पुनर्संचयन लवकरच होईल ही आशा आहे.
अजून एक मोह आवरणे आवश्यक आहे. तो म्हणजे खाजन शेतात मत्स्यपालन करण्यासाठी बाह्य खाद्याचा वापर. अलीकडील किनारी भारतातील मत्स्यपालन आणि त्याचे झालेले दुष्परिणाम आपण विसरता कामा नये. या दुष्परिणामांची पुनरावृत्ती होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. खाजनातील मासळीला, उदा चोणोकाला, एक आगळा वेगळा स्वाद आहे.
तो राखून ठेवणे गरजेचे आहे. खाजन ही परिसंस्था गोव्याच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. केवळ गोंयकारांचा मुख्य आहार, मासे आणि भात, खाजनांकडून पुरवला जातो असे नाही तर गोंयकाराच्या जीवनातील अनेक गोष्टी खाजनांशी जोडलेल्या आहेत. हे ‘आगराचे निस्ते’ आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास असलेली ‘खाजन’ परिसंस्था आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी संवर्धन केली पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.