
साधारण तीन महिन्यांपूर्वीची, बेळगाव जिल्ह्यातील बीडी गावामधील घटना. महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी, ८३ वर्षांचे डेयांगो नाझरेत आणि त्यांच्या पत्नी प्लेवियाना नाझारेत या दांपत्याने ‘डिजिटल अरेस्ट’ करणाऱ्या अधिकाऱ्यांना ५० लाख रुपये देऊनही वाढत जाणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली. सायबर गुन्हेगारीची पाळेमुळे ज्या वेगाने समाजाच्या सर्व थरांत, अगदी तळागळापर्यंत फोफावत आहेत ते पाहता ज्येष्ठांच्या संबंधातील अशा घटना पुढे जाऊन नेहमीच्या तर होऊन बसणार नाहीत ना, असा विचार येऊन मन खूप अस्वस्थ झाले.
आपल्या गोव्यात गेल्या नऊ महिन्यांतच (सप्टेंबर २०२४ - मे २०२५) सुमारे ३६-३७ ज्येष्ठ नागरिक कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीला बळी पडले आहेत. त्यातील १५ जणांची जन्मभराची पुंजी तर डिजिटल अरेस्टचाच धाक दाखवून लुटली गेली. त्यातही लक्षात घ्या की ह्या नोंद झालेल्या, दखल घेतल्या गेलेल्या तक्रारी हे नुसते हिमनगाचे टोक आहे.
सायबर गुन्हेगारांकडून वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य केले जाण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये असणारा पैसा. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांत आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या कमाईतून जमा झालेली लक्षणीय बचत रक्कम असते. आयुष्यात खूप उशिरा तंत्रज्ञानाशी ओळख झाल्याने ते वापरताना बहुतेक ज्येष्ठ नागरिक गोंधळतात. हेही सायबर चोरांच्या पथ्यावर पडते.
त्यातही खेदाची गोष्ट ही की ज्या पिढीला हे तंत्रज्ञान समजते, उमजते त्यांना ते ज्येष्ठांना समजावण्याची गरज भासत नाही. किंबहुना आजच्या धकाधकीच्या एक प्रकारच्या आत्मकेंद्रित जीवनशैलीत हे करण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो आणि ते करण्यात रसही नसते. मग हे वयोवृद्ध लोक आपल्याला परीने या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. खरे तर जीवनाचा प्रगल्भ अनुभव त्यांच्या गाठीशी असतो, कोणी गंडवायला लागले तर ते अनेकदा सतर्कही होतात. पण या विषयी माहिती असलेल्या पिढीकडे सल्ला मागायला गेले तर तो देण्यासाठी कुणाकडे वेळ नसतो. मग ते परत कुणा सायबर चोरांकडेच सल्ल्यासाठी वळतात-आणि त्यांच्या जाळ्यात आणखीनच गुरफटत जातात.
म्हणूनच माझा तर सरळ सरळ असा आरोप आहे की ज्येष्ठ नागरिकांशी होणाऱ्या या फसवणुकीसाठी साइबर गुन्हेगारांइतकेच तुम्ही - आम्ही त्यांचे सगेसोयरेही जबाबदार आहोत.
थोडेसे अंतरंगात झाकून पाहूया, स्वतःची चूक ओळखून आमच्या घरातल्या मोबाइल, टॅब, लॅपटॉप वापरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळात वेळ काढून जरा बसूया. सायबर जगाच्या ह्या भूलभुलैयाच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या, कायदेकानून आणि संभाव्य धोके त्यांना समजावूया. कसलीही मदत लागली तर आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांना देवूया.
सायबर सुरक्षेविषयी बोलताना खालील मुद्द्यांवर स्पष्टपणे आणि थोडक्यात भर द्यायला हवा : प्रत्येक गोष्टीसाठी (सोशल मीडिया, ईमेल, बँक खाते इत्यादी ) मजबूत पासवर्ड वापरणे आणि तो वेळोवेळी बदलणे. फोन वेळेच्यावेळी अपडेट करणे, WhatsApp, सोशल मीडिया, ईमेल इत्यादी ठिकाणी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणे. अनोळखी लोकांचे WhatsApp, Facebook, Messenger, Telegramवरील कॉल्स किंवा मेसेजेसना काहीही झालं तरी प्रतिसाद न देणे. कोणालाही ATM नंबर, PIN, पासवर्ड, आधार नंबर किंवा OTP कधीच न सांगणे, कुणीही पाठवलेली लिंक, विशेषतः .apk असलेली, पूर्ण खात्रीशिवाय न उघडणे कारण याद्वारे सायबर गुन्हेगार माहिती चोरणारे ॲप कुणाच्याही मोबाईलवर टाकू शकतात.
शक्यतो दोन बँक खाती आणि दोन सिम कार्ड ठेवणे उत्तम. रोजच्या व्यवहारासाठी कमी पैसे ठेवलेले एक खाते जे Google Pay वगैरेसाठी वापरले जाऊ शकते. दुसऱ्या खात्यात बाकीची पुंजी ठेवणे आणि त्याच्याशी सलग्न सिम कार्ड साध्या- नॉन स्मार्ट फोनमध्ये घालणे व ते खाते सहसा ऑनलाइन व्यवहारासाठी न वापरणे. या दुसऱ्या खात्यासंबंधीचे व्यवहार शक्यतो बँकेत जाऊन प्रत्यक्ष करणे.
दोन ईमेल ठेवणे - एक सर्वासाठी आणि दुसरा फक्त बँकिंग व महत्त्वाच्या कामांसाठी. बँकेच्या नावाने फेक SMS येतात, पैसे चुकून पाठवलेत, परत पाठवा असे सांगितले जाते, तेव्हा खरच खात्यात पैसे आलेत का याची खात्री करणे. पैसे द्यायचे असतील तरच QR कोड स्कॅन करायचा, पैसे घ्यायचे असताना QR स्कॅन करायची गरज नसते. कोणी तसे सांगितले तर तो फसवणूक करणारा आहे हे लक्षात ठेवणे, हे सारे त्यांना माहीत असणे गरजेचे आहे.
कोणताही अधिकारी - सीबीआय , इडी किंवा पोलीस - WhatsApp किंवा Skype वरून कोणालाही २४ तास ऑनलाइन राहा असं सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ करू शकत नाही, कारण अशी संकल्पनाच पोलिस यंत्रणेत नाही. अटक करण्यासाठी अधिकृत कागदपत्रांसह प्रत्यक्ष येणं पोलिसांना कायद्याने बंधनकारक आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ हा सायबर गुन्हेगारांनी तयार केलेला बनाव आहे, हे त्यांना समजावून सांगा.
तसंच, AI द्वारे आवाज, फोटो, व्हिडिओ क्लोन करून फसवणूक कशी केली जाते याचीही माहिती द्या. उठसूट येणारे अनावश्यक कॉल किंवा मेसेज याविषयी चक्षू पोर्टल वर तक्रार कशी करायची हे त्यांना शिकवा. नवनवीन सायबर गुन्हे आणि गुन्हेगार वापरत असलेल्या क्लृप्त्यांविषयी माहिती मिळवण्यासाठी CyberDost (I4C) WhatsApp चॅनेल, गोवा पोलिसांचे WhatsApp चॅनेल आणि इतर सोशल मीडिया हँडल्स सबस्क्राइब करायला सांगा.
कोठेही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी डएइख च्या वेबसाइटवर जाऊन खात्री करून घ्यावी, हे त्यांना समजावा. संशयास्पद वेबसाइट किंवा लिंक दिसल्यास गोवा पोलिस आणि BITS Goa यांनी तयार केलेल्या AI टूल spotthescam.inवर ती लिंक टाकण्यास सांगा. जर स्कोअर ५०च्या खाली आला, तर ती लिंक स्कॅम असण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर कधी आर्थिक फसवणूक झाली तर १९३० किंवा cybercrime.gov.inवर जाऊन तक्रार कशी करावी या संबंधीही त्यांना माहिती द्या. ३ तासाच्या गोल्डन पीरियडच्या आत जर इथे तक्रार दाखल केली तर पैसे परत मिळायची शक्यता जास्तीत जास्त असते हेही त्यांच्या मनावर बिंबवा.
तंत्रज्ञानाची मर्यादित जाण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे हे प्रकार प्रमाणाबाहेर वाढायच्या आधी कायदा-सुव्यवस्था यंत्रणा, समाज, बँका आणि इतर वित्तीय यंत्रणा आणि मुख्य म्हणजे जवळच्या माणसांनी अधिक सतर्क होणे गरजेचं आहे. व्यापक जनजागृती, फूल-प्रूफ सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्था, अष्टौप्रहर सुरू असलेली हेल्पलाइन आदी व्यवस्था निर्माण करणे ही ज्येष्ठ नागरिकांप्रतिची आमची सामूहिक नैतिक जबाबदारी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे अभिप्रेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.