Goan Youth: गोव्यातील तरुणांनी राज्याबाहेर, देशाबाहेर जाऊन स्वतःला सिद्ध केले आहे; मग ते आपल्याच मातीत 'अपात्र' कसे काय?

Goan Youth Contribution: गोवा प्रदेश मुक्त नव्हता तेव्हादेखील इथला युवक भारतात स्वतःला चांगल्या तऱ्हेने प्रस्थापित करत होता. मुक्तीनंतर तर अधिक चांगल्या संधी त्याच्यासमोर आल्या.
Goa Youth Skills
Goan YouthDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वसामान्य इतर कोणत्याही भारतीय युवकांच्या तुलनेत गोमंतकीय युवक बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्वाच्या किंवा कल्पकतेच्या बाबतीत कुठेच कमी नाही, उलट पश्चिमात्य संस्कृतीच्या दिर्घकालीन संपर्कातून ज्या गोष्टी त्याला लाभलेल्या आहेत त्यांचाही तो अतिशय उत्तम तऱ्हेने वापर करू शकतो.‌ इतरांच्या तुलनेने त्याच्याशी निश्चितच एक वेगळेपणा आहे- तो असा युवक आहे, ज्याने मुक्तीनंतरच्या काळात विविध क्षेत्रात आपली ओळख बनवली आहे. 

गोवा प्रदेश मुक्त नव्हता तेव्हादेखील इथला युवक भारतात स्वतःला चांगल्या तऱ्हेने प्रस्थापित करत होता. मुक्तीनंतर तर अधिक चांगल्या संधी त्याच्यासमोर आल्या आणि त्यातून तो अधिक घडत गेला आहे. म्हणजेच आमची जी एकूण व्यवस्था आहे- आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा प्रशासनिक- त्या व्यवस्थांसाठी गोमंतकीय युवक पात्र किंवा योग्य नाही असे होऊच शकत नाही.‌ जर तो त्या व्यवस्थेत दिसत नसेल तर त्याचे कारण त्या युवकाची अपात्रता किंवा त्याच्यातील कमतरता हे नक्कीच नसेल. ही कारणे कोणती असतील हे मात्र आम्हाला शोधावे लागेल.

कोणत्याही व्यवस्थेत मनुष्यबळाच्या वापराबद्दलची योजना निश्चित झालेली असते. अल्पकालीन किंवा दीर्घकालीन अशाप्रकारची ही व्यवस्था असते. या व्यवस्थेचे किंवा त्याच्या नियोजनाचे धुरीणत्व ज्या लोकांनी पत्करले आहे त्या लोकांनी जर गोमंतकीय युवकाला केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थेचा विचार केलेला नसेल तर मात्र तो युवक त्यासाठी पात्र नाही असा गैरसमज होऊ शकतो.  सध्याच्या स्थितीत जर कोणाला वाटत असेल गोव्याच्या विविध व्यवस्थांमध्ये स्थान मिळविण्यात गोव्याचा युवक पात्र नसेल तर ते मान्य करणे निश्चितच कठीण असेल.

कारण हाच युवक गोव्याबाहेर आणि देशाबाहेरही जाऊन आपले कर्तृत्व, आपली बुद्धिमत्ता सिद्ध करत आला आहे. म्हणजेच गोव्यातील व्यवस्थेतही त्याला स्थान असायलाच हवे. त्याशिवाय तो युवक गोमंतकीय असल्याने त्याला इथल्या भूमीत एक विशेष अधिकार खचित आहे. भाषावार तत्त्वाच्या आधारावरच गोवा राज्य देखील तयार झाले आहे आणि त्यात तो ज्या भाषेचे प्रतिनिधित्व करतो तिथे त्याला स्थान मिळायलाच हवे. मात्र जर व्यवस्थेच्या मांडणीत दोष असतील तर ते दोष दुरुस्त करायच्या ऐवजी गोमंतकीय युवकाला दोष देऊन अर्थ नाही. 

Goa Youth Skills
Goa Jobs Update: गोव्यात ग्रामीण भागात मिळणार नोकऱ्या, सरकार उचलणार मोठे पाऊल; स्थानिकांची मिटणार चिंता

मुळात गोमंतकीय हा सहसा कुणाला परकी मानत नाही.‌ याबाबतीत तो सौम्य असतो त्यामुळे गोव्यात असे झाले आहे की अनेकांनी गोव्यात येऊन आपले हातपाय पसरून आपआपले कंपू तयार केले आहेेेत आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी ज्यातऱ्हेने व्यवस्थेची रचना केली जात आहे त्यातून गोमंतकीय युवकांना अन्याय सहन करावा लागतो असे म्हणायला वाव आहे. त्याबाबत दुर्दैवाने आम्ही सावध नाही आहोत. गोमंतकीय युवकाकडे पात्रता नाही, त्याच्याकडे कौशल्य नाही अशा प्रकारचा मतप्रवाह तयार करण्याचे प्रयत्न जर चालले असतील तर गोमंतकीय युवकांनी आता जागे होऊन त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे. 

Goa Youth Skills
Goa Job: गोमंतकीय युवकांसाठी गूड न्यूज! खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही मिळणार संरक्षण, CM सावंतांची घोषणा

गोमंतकीय युवकांनी आता प्रश्न विचारायला शिकले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी या परिस्थितीचा अभ्यासही करण्यास शिकले पाहिजे.‌ शासन आणि प्रशासन जी धोरणे तयार करत आहेत त्याकडे जर त्यांनी लक्ष दिले नाही तर त्यांना 'तुला जमत नाही' असे म्हणण्याचे प्रकार वाढत जाणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तर गोमंतकीय युवक मागासलेला आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती तर अजिबात नाही. त्याने स्वतःला जागतिक स्तरावरही अनेकदा सिद्ध केलेले आहे. मग हा युवक आपल्याच मातीत अपात्र कसा काय ठरवला जातो? मला वाटते की यामागे  आपलीच काहीशी बेपर्वाई आहे. युवकांनाच या परिस्थितीचा विचार करावा लागेल.‌ आमच्या मातीची सेवा करण्यास आमच्याच मातीत आम्ही कसे काय अपात्र ठरतो याचा विचार त्यांनी तातडीने करायला हवा. गोव्याच्या युवकांनी संघटित व्हायची वेळ आली आहे!

प्रा. नारायण देसाई - शिक्षणतज्ज्ञ 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com