Goa Police: पोलिस खात्‍यात 'गुडलर'सारखे निरीक्षक असल्‍यास लोकांनी न्‍याय मागावा कुणाकडे?

Goa Police Department: पोलिस खात्‍यात अनेक गुडलर आज कार्यरत आहेत. इथून पुढे गुन्‍हा शाबीत करण्‍याचे आव्‍हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर आहे.
Sunil Gudlar Arrest, Police Arrest
Sunil GudlarDainik Gomantak
Published on
Updated on

मिंधे, लाचार, स्‍वत:ची विश्‍‍वासार्हता गमावलेल्‍या पोलिसांच्‍या कार्यप्रणालीवर आम्‍ही याच स्‍तंभातून काल भाष्‍य केले. त्‍याची शाई वाळण्‍याआधीच सुनील गुडलर या पोलिस निरीक्षकाने हवालदाराच्‍या साथीने खंडणी उकळण्‍याचा चालवलेला गोरखधंदा उघडा पडला. खंडणीच्‍या मागणीने व्‍यथित झालेल्‍या बेळगावातील एका मटण व्‍यापाऱ्याने अखेर खाकी वर्दीतील खाटकांना इंगा दाखवला.

‘त्‍या’ व्‍यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्‍यानेच गुडलरचे पाप समारे आले; अन्‍यथा नाव ‘गुड’लर आणि प्रत्‍यक्षात वाल्‍याची कुकर्मे अविरत सुरू राहिली असती. कोण आहे हा बेशरम गुडलर? तर एका राजकीय नेत्‍याच्‍या हातापाया पडून पोलिस दलात दाखल झालेला वशिल्‍याचा तट्टू, खाकी वर्दीतील गुंड. गुडलरची कारकीर्द नेहमीच वादग्रस्‍त राहिली.

कधी ड्रग्‍ज माफियांसोबत लागेबांधे, तर कधी बेहिशेबी मालमत्तेचा धनी म्‍हणून. ड्रग्‍ज प्रकरणात तो सबळ पुराव्‍यांच्‍या अभावी दोषमुक्‍त झाला; तथापि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी त्‍याच्‍यावर आरोपपत्र दाखल झाले आहे, ज्‍याची सुनावणी अद्याप बाकी आहे. ज्‍याच्‍यावर आरोपपत्र आहे, असा अधिकारी पोलिस दलात कार्यरत राहणे हीच मोठी शोकांतिका आहे. जिथे लोके मोठ्या विश्‍‍वासाने तक्रारी देण्‍यासाठी येतात, त्‍या पोलिस खात्‍यात गुडलरसारखे लांडगे असल्‍यास लोकांनी न्‍याय मागावा तरी कुणाकडे?

विरोधाभास पाहा- राजकीय नेत्‍यांना हवी ती कामे करू शकणारे पोलिस पायाशी हवेच असतात. त्‍याच कौशल्‍यामुळे गुडलरने वेळोवेळी हव्‍या त्‍या जागी नियुक्‍त्‍या मिळवल्‍या. माथी आरोपपत्र असूनही तो दिमाखात राहिला. त्‍या उलट कर्तव्‍यनिष्‍ठ महिला अधिकारी असा लौकिक मिळवलेल्‍या; भल्‍या भल्‍या गुन्‍हेगारांना घाम फोडणाऱ्या सुनीता सावंत यांना त्‍यांचा काही अपराध नसताना अधीक्षक पदावरून अडीच महिने दूर ठेवण्‍यात आले होते.

लांगूलचालन करणारे पोलिस अधिकारी सरकारला हवेत, असा त्‍याचा सरळ अर्थ होतो. सातत्‍याने गुन्‍हेगारी कृत्‍ये करून जामिनावर बाहेर पडणारे भुरटे आणि कुकर्मांमुळे वादग्रस्‍त ठरणारे पोलिस यांच्‍यात फरक तो काय? कीड लागलेली प्रवृत्ती डोकं वर काढतेच. पोलिस खात्‍यात सव्‍वा वर्षात २२ हून अधिक पोलिस अधिकारी निलंबित झालेत. लुटमार, छेडछाडीचेही काहींवर आरोप झाले. आसगाव घर पाडण्‍याचे प्रकरण तर सरकारच्‍या अंगाशी आले. पोलिस महासंचालक जसपालसिंग यांना हाकलावे लागले होते.

साहेबापासून शिपायापर्यंत गैरकृत्‍ये सुरू आहेत आणि सरकार मौन बाळगते. ही वृत्ती कमकुवत विरोधकांमुळे दुणावते. विरोधक ‘एक्‍स’पुरते मर्यादित राहतात. समाज माध्‍यमांवर दोन ओळीत मत मांडून मोकळं होण्‍याचा त्‍यांचा संकुचितपणा समाजास घातक आहे. गुडलर २००६च्‍या बॅचचा उपनिरीक्षक. अमलीपदार्थ विरोधी पथकात काम करताना ड्रग्‍ज पेडलर अटालाचा दोस्‍त डुडू या इस्रायली ड्रग्‍ज पेडलरच्‍या संपर्कात आला. नंतर एका प्रकरणात त्‍याला अटकही झाली. परंतु तपासातील त्रुटींमुळे तो सुटला. तपास कोणी केला? पोलिसांनीच.

Sunil Gudlar Arrest, Police Arrest
Sunil Gudlar: दोनवेळा ACB च्या जाळ्यात फसलेला 'सुनील गुडलर'! बरबटलेली कारकीर्द; कसे पकडले रकमेसह? जाणून घ्या

तो निर्दोष सुटला तरी प्रवृत्ती बदलली नाही. मडगाव रेल्‍वे स्‍थानक हे बेकायदा मद्य वाहतुकीचे केंद्र बनले आहे. दाखवण्‍यापुरत्‍या काही कारवाया होतात, पण ते हिमनगाचे टोक. बीफ संदर्भातही तेच. अशा जागेवर ज्‍याने कुणी गुडलरची वर्णी लावली, त्‍याची नियतही तपासण्‍याची गरज आहे. पोलिस खात्‍यात अनेक गुडलर आज कार्यरत आहेत. इथून पुढे गुन्‍हा शाबीत करण्‍याचे आव्‍हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर आहे. आजतागायत खात्‍याकडे तक्रारी करूनही रंगेहाथ पकडलेले बरेच संशयित सुटले आहेत.

Sunil Gudlar Arrest, Police Arrest
Konkan Railway Raid: मडगाव रेल्वे पोलिस स्थानकावर भ्रष्टाचार विरोधी पथकाचा सापळा; दोन अधिकारी अडकले जाळ्यात

एका माजी मुख्‍यमंत्र्याचा नातेवाईकही अशाच कारवाईत सापडून सबळ पुराव्‍याअभावी सुटला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सापळे रचून कारवाया करतो, याचा अर्थ त्‍यात सत्‍यता असते, असे मानण्‍यात येते. तरीही संशयित सुटत असतील तर लोकांचा व्‍यवस्‍थेवरील विश्‍‍वास कसा राहील? म्‍हणूनच काही महिन्‍यांपूर्वी ‘तक्रारी करा’, अशी आर्त हाक देण्‍याची एका अधिकाऱ्यावर वेळ आली होती. सुनील गुडलरवरील कारवाईला नक्‍कीच प्रतिआव्‍हान मिळेल; परंतु तो दोषी होता हे सिद्ध करून दाखवा. भ्रष्‍टाचाराची वाळवी कुणीतरी रोखायला हवी. निलाजऱ्या सरकारने नाहक चोचले पुरे करावे. अशा गुडलरना कायमचेच घरी पाठवा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com