
विशाल पै काकोडे
काणकोणात फिल्म सिटी उभारण्याचा प्रस्ताव सुवर्णसंधी, चित्रपट निर्मितीसाठी केंद्रबिंदू, रोजगाराचे साधन आणि पर्यटनासाठी आकर्षण म्हणून मांडला जातो. पण, या झगमगाटाआड एक भयावह सत्य लपलेले आहे. हा प्रकल्प काणकोणच्या नाजूक पर्यावरणाला धक्का देतो, स्थानिक लोकांना विस्थापित करतो, पायाभूत सुविधा कोलमडवतो आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करतो. गोव्याने स्वतःला विचारायला हवे, या विकासाच्या नावाखाली खरा लाभ कोणाला होतो?
काणकोण हे गोव्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि जैवविविधतेने समृद्ध असलेले क्षेत्र आहे. खोतीगाव अभयारण्य, कासव अंडी घालत असलेला गालजीबाग किनारा आणि लोलयेतील हिरवीगार डोंगररांग. हे सर्व एक नाजूक पर्यावरणीय साखळीचे भाग आहेत.
येथे मोठ्या प्रमाणावर काँक्रीट आणि डांबरी पायाभूत सुविधा उभारल्यास ही साखळी कायमची नष्ट होईल. सतत चालणारी बांधकामे, वीज आणि पाण्याचा वापर, वृक्षतोड, अधिवासाचा र्हास आणि नैसर्गिक संसाधनांची नासधूस यातून अपरिवर्तनीय नुकसान होईल.
ज्या दलदली, खाड्या आणि मँग्रोव्हज नैसर्गिक पूर नियंत्रणासाठी आणि कार्बन शोषणासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या पायाभूत सुविधांसाठी नष्ट होऊ शकतात. एकदा का पर्यावरण बिघडले, तर ते पूर्ववत करणे कठीणच नव्हे अशक्यप्राय होते. गोव्याने आधीच अनेक चुका केल्या आहेत, आता काणकोण त्याच वाटेवर जाऊ नये.
या प्रस्तावित प्रकल्पाची सर्वांत महत्त्वाची आणि दुर्लक्षित बाजू म्हणजे यामुळे निर्माण होणारा राष्ट्रीय सुरक्षेचा धोका. लोलये-काणकोण परिसर हा भारतीय नौदलाच्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या आयएनएस कदंब तळाच्या अगदी काही किलोमीटर अंतरावर आहे. अशा ठिकाणी एक गजबजलेली फिल्म सिटी उभारल्यास, मोठ्या प्रमाणावर लोक, उपकरणे, ड्रोनचा वापर, परदेशी कर्मचाऱ्यांची ये-जा आणि व्यापारी हालचालीमुळे नौदलाच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो.
या प्रकल्पाबाबत नौदल आणि संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करण्यात आली आहे का? सुरक्षेची मंजुरी घेण्यात आली आहे का? एवढ्या संवेदनशील परिसरात कोणताही नागरी प्रकल्प अत्यंत काळजीपूर्वक आणि पारदर्शकतेने हाती घेतला पाहिजे, केवळ राजकीय फायद्यासाठी नव्हे.
फिल्म सिटीमुळे पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून असलेली अनेक स्थानिक कुटुंबे मच्छीमारी, शेती, ‘रेंदेर’, आणि इको-टुरिझम विस्थापित होईल. जमिनींचे दर गगनाला भिडतील आणि कौटुंबिक वारसा असलेली जमीन जोर-जबरदस्तीने किंवा अप्रत्यक्ष दबावाने खरेदी केली जाऊ शकते. जे रोजगार दिले जातील, ते बहुतांश वेळा कंत्राटी, अस्थिर आणि निम्न दर्जाचे असतील आणि उच्च-तंत्रज्ञान व चांगल्या पगाराच्या नोकऱ्या बाहेरून आलेल्या लोकांना जातील.
हा प्रकल्प गोव्यातील स्थानिकांना सशक्त करत आहे, की त्यांच्या जमिनीवरून नफा मिळवत आहे?
गोव्यातील लोकांना या प्रकल्पातून रोजगार मिळणार का, हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या संदर्भात स्पष्टता असावी. गोव्यात फिल्म सिटी चालवण्यासाठी लागणारे तांत्रिक, व्यावसायिक मनुष्यबळ उपलब्ध आहे का?
चित्रपट निर्मितीसाठी सिनेमॅटोग्राफर, एडिटर, कॉस्ट्यूम डिझायनर, अॅनिमेटर, दृष्यतंत्रज्ञान तज्ज्ञ, लाइट टेक्निशिअन, प्रॉडक्शन मॅनेजर असे अनेक कुशल लोक आवश्यक असतात. सध्या गोव्यात किती लोकांकडे हे कौशल्य आहे? आपण हे मनुष्यबळ तयार करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी सज्ज आहोत का?
* फिल्म सिटीमुळे निर्माण होणाऱ्या रोजगारांची संख्यात्मक व श्रेणीवार यादी
* त्या नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्य व पात्रता
* सध्या गोव्यात उपलब्ध पात्र उमेदवारांची संख्या
* स्थानिक लोकांना प्रशिक्षित करण्याची योजना व कालावधी या गोष्टी समोर आल्या नाहीत, तर रोजगाराचे आश्वासन हे फक्त घोषणाच राहील.
आजच्या डिजिटल युगात, प्रत्यक्ष सेट्सची गरज मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञान, व्हर्च्युअल स्टेज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने, निर्माते कोणतेही दृश्य, कोणतेही ठिकाण स्टुडिओमध्येच तयार करू शकतात.
जगभरात अनेक स्टुडिओ आता मोठे सेट्स कमी करत आहेत आणि डिजिटल-आधारित कॉम्पॅक्ट स्टेजेसकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत, कोट्यवधी रुपये खर्चून, नैसर्गिकदृष्ट्या नाजूक परिसरात भव्य फिल्म सिटी उभारणे म्हणजे पर्यावरणाची हानी तर आहेच, पण तांत्रिकदृष्ट्याही कालबाह्य निर्णय आहे.
काणकोणात आधीच पायाभूत सुविधा कमकुवत आहेत. पाण्याचा तुटवडा, अपुरी आरोग्य व्यवस्था, खराब रस्ते आणि अनियमित सार्वजनिक वाहतूक हे रोजचे प्रश्न आहेत. फिल्म सिटीमुळे वाहतूक, पाणी, वीज आणि कचऱ्याचा ताण वाढेल.
या भागाची खास सांस्कृतिक ओळख, निसर्गाशी नाते, पारंपरिक जीवनशैली आणि साधेपणादेखील नष्ट होण्याचा धोका आहे. जमिनींचे दर वाढतील, कुंपणाआतील गृहप्रकल्प येतील आणि व्यापारीकरणामुळे स्थानिक लोकांना केवळ जागाच नव्हे, तर त्यांची जीवनपद्धतीही गमवावी लागेल.
लोलये-काणकोण येथे फिल्म सिटी उभारण्याचा प्रस्ताव म्हणजे एक मायाजाल आहे. हा प्रकल्प गोव्याच्या पर्यावरणाला, स्थानिक लोकांना, संस्कृतीला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकार हे मायाजाल पुढे करीत असताना दुसरीकडे आजची चित्रपट निर्मिती अधिकाधिक डिजिटल होत चाललेली आहे.
गोव्यास सध्या आवश्यक आहे ती शाश्वत, समावेशक आणि पारदर्शक योजनांची; श्रीमंत वर्गासाठी बनवलेल्या भव्य प्रकल्पांची नव्हे. अजून वेळ गेलेली नाही, सरकारने हा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा.
काणकोण ही फिल्म सिटीसाठीची मोकळी जागा नाही. ती एक सजीव आणि संवेदनशील जागा आहे. ती तशीच राखली गेली पाहिजे. काणकोणला सेट नको, अभयारण्यच ठेवणे गोव्याच्या भल्याचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.