
Medical Infrastructure Goa: अत्यवस्थ जिवांना मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत बाहेर काढणारे गोमेकॉ इस्पितळ गोवेकरांसाठीच नाही तर नजीकच्या राज्यांतील रुग्णांसाठीही वरदान ठरले आहे. महाराष्ट्र, कर्नाटकच्या तुलनेत गोव्यात चांगल्या आरोग्य सेवेचा लौकिक आहे. तथापि, सर्वकाही क्षेम आहे असा त्याचा अर्थ नाही. वाढत्या रुग्णसंख्येसोबत व्यवस्थेत त्या-त्या वेळी काही उणिवा निर्माण होतात, ज्या हेतुपुरस्सर सिंहावलोकनातून समजून घेता येतात.
परंतु उणिवा म्हणजे खात्याची अवनती अशी भ्रामक धारणा बनल्यावर नव्या समस्या जन्माला येतात. गोमेकॉत शनिवारी जो प्रकार घडला, त्यावर आम्ही याच स्तंभातून कठोर भाष्य केले आहे. डॉक्टरांनी संप मागे घेतला हे बरे झाले. आता आरोग्य व्यवस्थेत काही मूलभूत बदलांची गरज आहे. पहिली बाब - वशिल्याची लोकांना गरज भासते याचाच अर्थ व्यवस्थेत कमतरता आहेत, हे मान्य करावे लागेल.
त्या दूर करण्याऐवजी ‘व्हीआयपी’ उपचारांसाठी ‘एसओपी’चा मार्ग अवलंबण्याचे योजल्यास ते ये-रे माझ्या मागल्या ठरेल. गोमेकॉ ही आरोग्य पंढरी आहे. तेथील दैनंदिन रुग्णसंख्या आणि उपलब्ध मनुष्यबळातील व्यस्त प्रमाण वशिलेबाजीचे उगमस्थान आहे. अख्ख्या गोव्यातून रुग्णांचा गोमेकॉवर भडिमार होतो. अनेकदा जमिनीवर झोपवून रुग्णांना उपचार द्यावे लागतात. ती अपरिहार्यता बनते. डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर ताण पडतो. त्यासाठी मनुष्यबळ, ‘कॅज्युएल्टी’ची संख्या वाढवणे दृष्टिक्षेपात हवे.
‘हॉस्पिसिओ’, ‘आझिलो’ रुग्ण पुढे पाठवण्याची केंद्रे बनली आहेत. राज्यात सरकारची सहा इस्पितळे, सहा सामुदायिक, चोवीस प्राथमिक व चार नागरी आरोग्य केंद्रे आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा नक्की व्हायला हव्यात. ‘गोव्यात आजारी पडावे तर शनिवार, रविवार सोडून’! हे वास्तव जीवघेणे नाही का? सुटीच्या दिवसांत रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून पर्यायी व्यवस्था सक्षम नाही. पणजीतील आपत्कालीन केंद्रात रक्तदाबाविषयी शंका घेऊन कुणी जाईल तर ‘आम्ही केवळ इमर्जन्सी रुग्ण हाताळतो’ असे उत्तर मिळाल्यास काय करावे?
दबक्या पावलांनी येणारा हृदयविकार ‘कुणाला तू अत्यवस्थ आहेस’ असे सांगून येतो का? ते तपासणीअंतीच कळते. त्याची जाण आरोग्य कर्मचाऱ्यांना हवी. जीएमसी प्रकरणातही ‘त्या’ डॉक्टरने संबंधित महिलेला इंजेक्शन दिले असते तर आभाळ कोसळले नसते. आरोग्यसेवेत वशिला नकोच; पण त्यासाठी कठोर शिस्त हवी. जी लावणे सोपे नाही. त्यासाठी तक्रार निवारण व्यवस्था मजबूत हवी. तरच वचक राहील. क्रियाशीलतेचे डोस देऊन गोमेकॉत जनसंपर्क अधिकाऱ्यांची संख्या वाढवावीच लागेल.
डॉक्टरांना देव मानले जाते. परंतु या प्रतिमेपलीकडे दुसरी एक बाजू आहे, ज्यावर भीतीपोटी चर्चा टाळली जाते. इस्पितळात येणारा रुग्ण भावभावनांनी समृद्ध असतो. त्यांच्याशी सौहार्दपूर्ण शंका निरसन करण्याचे कौशल्य विकसित करण्यात वैद्यक महाविद्यालय यशस्वी झालेय का, याचे आत्मपरीक्षण व्हावे. गोमेकॉत घडलेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर इस्पितळ परिसरात छायाचित्रणास बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाणार असला तरी तो न्यायालयीन कसोटीवर टिकणारा नाही. डॉक्टर वा वैद्यकीय व्यवस्था चुकत असल्यास रुग्ण वा त्याच्या नातेवाइकांनी चित्रीकरण केल्यास गैर ते काय?
डॉ. कुट्टीकर प्रकरणात चित्रीकरणामागे निराळी छटा असली तरी चित्रीकरणामुळेच पारदर्शकता राहिली, हे विसरता नये. डॉक्टर सदा सर्वदा योग्यच असतात, असे कसे मानता येईल? उडदामाजी काळे गोरे असणारच. वशिलेबाजी मोडण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे हवीच. शिवाय अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांची नि:पक्षपाती समिती हवी, जी राज्यातील आरोग्य केंद्रांसह इस्पितळांना वरचेवर भेटी देईल, व्यवस्थेतील उणिवा शोधून सरकारला सूचना करेल. रोगी कल्याण समित्यांचे अस्तित्व तर कागदापुरतेच राहिले आहे. ज्या पूर्वी आरोग्य केंद्र देखरेख समित्या म्हणून ओळखल्या जायच्या.
त्यावरील नियुक्त्या राजकीय हेतूने प्रेरित असतात. बहुतांश सदस्यांना कर्तव्याचा गंधही नसतो. त्यांचा काय उपयोग? रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी तत्पर हेल्पलाईनसारखी व्यवस्था विकसित करणे काळाची गरज आहे. अशा मुद्द्यांवर कठोर पावले उचलली तरच अर्थ आहे. ठरावीक लॉबी भल्या भल्या डॉक्टरांना घाबरवत असे. ते प्रकार आता बंद होतील, अशी आशा आहे. गोमेकॉसह आरोग्य व्यवस्था लोकाभिमुख करणे, ती तशीच राहू देणे गरजेचे आहे.
यात अन्य संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेणे लाभदायक ठरू शकते. प्रचंड गर्दी असते तेव्हा प्रत्येकाची विचारपूस, चौकशी, धीर देणे, अन्य पर्यायांविषयी मार्गदर्शन करणे डॉक्टरांना शक्य होत नाही. अशा वेळी त्याची पर्यायी व्यवस्था असल्यास अनेक समस्या कमी होतील. त्या दूर करण्याचा मार्ग ‘व्हीआयपी’ उपचारांसाठी ‘एसओपी’ हा नव्हे. उलट नव्या समस्यांचे डोंगर उभे राहतील व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरोग्यसेवेचे मूळ तत्त्वच नाहीसे होईल. गोमेकॉ पूर्वीपेक्षा यंत्र, तंत्रज्ञानाने सुसज्ज झाले आहे. आरोग्यसेवेचे सामर्थ्य वाढले आहे. ही सेवेची सज्जता लोकांपर्यंत नीट पोहोचलीच नाही तर? ती पोहोचावी यासाठी व्यवस्थेत सुधारणा व्हावी. उणिवा दूर व्हाव्यात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.