
मुकेश थळी
‘सकाळ झाली, कोंबडा आरवला, भैरू उठला....’ अशा प्रकारचा एक धडा प्राथमिक शाळेत होता. आता सकाळ होते. कोंबडे आरवत नाही, मित्रमंडळी एकमेकांना वॉट्सऍपवरून कचरा टाकायला सुरुवात करतात. टाकाऊतून टिकाऊ म्हणतात त्या उक्तीप्रमाणे असंच एक कचऱ्यातून आलेलं खत माझ्या कला पोषणासाठी मिळालं.
व्हिडिओ होता. बीबीसीची मुलाखत - अभिनेत्री दीप्ती नवल. बीबीसी या नावातच प्रॉफेशनलीझमचं तेज व वलय आहे. आमच्या शेकडो चॅनलवरून मुलाखतींचा मारा होत असतो. बहुतांश मुलाखती या मुलाखती कशा नसाव्यात त्याचं उदाहरण. बीबीसीच्या मुलाखती वा डोक्युमेंटरीज हा वस्तुपाठ असतो. दिल्लीत आमच्या एका परिषदेत एका बीबीसी मुलाखतकाराने अभ्यासाची त्यांची पद्धत सांगितली होती ती ऐकून कौतुक वाटलं होतं.
मुलाखतकार इरफान हा अनुभवी. तो फक्त प्रश्न विचारत होता. एका तासामध्ये एक क्षणसुद्धा ‘हा’, ‘हूं’, ‘आं’ किंवा तोडून बोलणं नाही. हे बघूनच होतकरू मुलाखतकार शिकू शकतो. फक्त शिकण्याची आग हवी.
दीप्ती मुलाखतीत सांगते, ‘मी आरशात बघून शिकत होते. इतकी चिमुरडी होते, की माझी उंची आरशापर्यंत जात नव्हती. हॅट स्टॅण्ड होता. टोप्या ठेवण्यासाठी. त्याच्या खाली एक रॉड होता. त्याच्यावर दर दिवशी मी उभी राहून आरशापर्यंत पोचते की काय हे बघत होते. काही वर्षांनी मी तिथं पोहोचले.
मी आरशात दिसू लागल्यावर आनंद झाला. दर दिवशी आरशात चेहरा न्याहाळणं, विविध अदा, चेहऱ्याच्या छटा, डोळे, हालचाली करत राहणं हा अभिनय-यात्रेतला माझा आरंभीचा सराव होता. आरशाने माझे हे पौगंडावस्थेतील कुमारवयापर्यंतचे खेळ जरूर बंदिस्त केले असतील.
मला माझ्या संपूर्ण भावना, आसू, हसू हे चेहऱ्यावरूनच अभिनित करायचे होते. इतर आंगिक, वाचिक अभिनय नंतर. चेहऱ्यावरील मुद्रा आविष्कृत करूनच रडणं, ओरडणं, शोक, दु:ख, वैताग या भावना अभिव्यक्त करायच्या होत्या.’
दीप्ती नवलना कलेचं वेड होतं, त्याचं संतृप्त पोषण झालं. अमृतसरमध्ये आई हाडाची पेंटर व शिक्षिका होती. हयातभर चित्रं, पेंटिंग्स यात ती मग्न राहिली. दीप्तीने हा गुण आईकडून घेतला. फावल्या वेळात पेंटिग्स काढण्याचा सपाटाच लावला. वडील इंग्रजीचे प्राध्यापक. आईवडील कलेच्या विविध अंगांवर चर्चा करत त्या दीप्ती लहान वयापासून ऐकत असे. हे बाळकडू तिच्या अभिनय कलेच्या प्रवासाला आकार आणत होतं. ते संमिश्र रंग तिच्या अभिनयातून नवीन रंग घेऊन व्यक्त होत.
मीनाकुमारी ही तिची आवडीची अभिनेत्री. मीनाकुमारीचा डोळ्यांचा अभिनय हा शिकणाऱ्या अनेक अभिनेत्रींना एक धडा. साधना ही सुद्धा आवडीची अभिनेत्री. ती अतीव बारकाईने त्यांचे अभिनय शिकत असे. अभिनेत्री म्हणून शारीरिक उंची नाही, हे ती प्रामाणिकपणे स्वीकारते.
अभिनय शिकणं-शिकत राहणं हे नाट्य शाळेत शिक्षण घेतलं म्हणून होत नाही. तो आपला एक प्रवास असतो, असोशी हवी असं ही चिंतनशील अभिनेत्री सांगते. बीबीसीच्या मुलाखतीत दीप्ती कसलाही मेकअप न करता बसलेली दिसते.
७० प्लस वयात तिच्या वैचारिक बैठकीत एक उच्च पातळीचा पोक्तपणा व परिपक्वता दिसते. रंगमंच असो की फिल्म, अभिनेते जितके चिंतनशील, प्रयोगशील, अभ्यासू असतात तितके ते अर्थपूर्ण, परिपूर्ण आविष्करण देऊ शकतात. अशा वृत्तीचा एक्टर आपल्या प्रातिभा विश्वात फुलणाऱ्या सृजनशीलतेला नवनवीन धुमारे देत असतो.
आयाम चढवत असतो. रसिकांना आनंद देत असतो. दीप्तीने आपल्या पावलांचे ठसे समांतर सिनेमाच्या पटलावर उमटविले. शबाना, स्मिता पाटील व दीप्ती नवल या त्रयीने एक काळ गाजवला व समांतर सिनेसृष्टीत नवीन प्रयोग आणले.
दीप्ती नवल यांची भूमिका मनात ठसली ती ‘चष्मेबद्दूर’ चित्रपटात. सुंदर व लाजवाब. दीप्ती नवल ७० आणि ८०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून लौकिकास पात्र ठरली. करिअरची सुरुवात रंगभूमी कलाकार. दीप्ती आणि फारुख शेख यांची जोडी खूप गाजली. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले.
दीप्ती शब्दखिलाडी. बालपणीच्या दिवसांवर तिनं आत्मकथनात्मक पुस्तक इंग्रजीत लिहिलं आहे. तिच्या कविता आहेत. ती संवेदनशील चित्रकार. चित्र रेखाटताना कुंचल्याचा स्ट्रोक, कविता माध्यमातून शब्दांचं रेखाटन व नृत्यातील थिरकन, लय अशा अनेक कला-धमन्यांचे प्रवाह तिने उमजून घेतले.
हा सर्व ओलसर, संमिश्र, परिपाक तिच्या अभिनयातून असा काही आविष्कृत होत असे की प्रेक्षकांच्या हृदयावर नाममुद्रा कोरून जाई. पेशकश अशी दमदार की दीप्ती अभिनयाची कविता व रंगचित्र सुंदर रेषांतून रेखाटते, असं वाटावं. सर्व कलांची मुळं एकमेकांना आंतरिकपणे जोडलेली असतात. त्या अनुबंधांची जाण दीप्तीला खोलपणे होती म्हणून ती नवकल्पनांतून आगळं देऊ शकली!
दीप्तीच्या वडिलांची इच्छा होती की तिनं चित्रकार व्हावे, पण दीप्तीची आवड थिएटरमध्ये होती. दीप्तीनं करिअरची सुरुवात १९७८मध्ये आलेल्या ‘जुनून’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
मात्र आजही त्या ‘चश्मेबद्दूर’ची नायिका म्हणून ओळखल्या जातात. या चित्रपटात त्यांनी सेल्सगर्लची भूमिका साकारली होती जी डिटर्जंट पावडर विकायची. पावडरचं नाव होतं ‘चमको’. ‘चमको’ची जाहिरात करताना तिला संवादलेखकाने धुलाई पावडर किती छान आहे त्याची जबदरस्त विशेषणं असलेले डायलॉग दिले होते.
दीप्तीची ही सर्वोच्च शिखराची भूमिका फार लोकप्रिय झाली. वर्ष १९७९मध्ये ‘एक बार फिर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करणाऱ्या व त्यानंतर ६० चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या दीप्ती नवल यांना अनेक पुरस्कार मिळाले. अभिनयाखेरीज दिग्दर्शन आणि छायाचित्रकार म्हणूनही आपला ठसा उमटवलेल्या दीप्ती नवल या चित्रपटांमध्ये संवेदनशील भूमिका साकारण्याबाबत ओळखल्या जातात. भारतीय महिलांची बदलती ओळखही नवल यांनी अनेक चित्रपटांतून आगळ्या ढंगात साकारली.
हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांचं एक वाक्य आहे, ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है, दिखावा नहीं।’ प्रकाशमान दीप्ती उधळणारी समझदार दीप्ती सूचकपणे अभिनयाचे विविधांगी रंग कसलाही देखावा, मेलोड्रामा न करता सहजसुंदरपणे करते तेव्हा प्रेमचंदाच्या उक्तीची आठवण येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.