
मिलिंद म्हाडगुत
दामूंची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द व ‘लहानपण देगा देवा’ अशी असलेली मानसिकता पाहिल्यास त्यांना हे अवघड जाईल असे बिलकूल वाटत नाही.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार दामू नाईक यांची वर्णी लागली आहे. दामू नाईक यांची राजकीय कारकीर्द ‘किस्मत की हवा कभी गरम कभी नरम’ या प्रकारातली. विधानसभा निवडणुकीत दोनदा जीत, तर तीनदा हार ही दामूंच्या राजकीय कारकिर्दीची गोळाबेरीज. २००२च्या निवडणुकीतील त्यांचे यश जसे अनपेक्षित तसेच २०१२मधले अपयशही अनपेक्षित.
२०१२मधल्या त्यांच्या अपयशामागे त्यांच्याच पक्षातील काही ‘दिग्गज’ नेते असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. पण दामू अचल राहिले. भाजपशी एकनिष्ठ राहिले. अपयशाची हॅट्रिक होऊनसुद्धा ते डगमगले नाहीत. म्हणूनच असेल कदाचित त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असावी. अर्थात ’भंडारी कार्ड ’हे यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे बोलले जात असले तरी दामूची भाजपशी असलेला प्रामाणिकपणा नजरेआड करता येत नाही हेही तेवढेच खरे.
आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून नुकतेच उतरलेल्या सदानंद शेट तानवडे यांच्या पावलावर पाऊल ठेवायचे आहे. तानावडेंचे उत्तराधिकारी होणे म्हणजे एक आव्हानच आहे. तानावडेंनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जी छाप सोडली आहे ती पुसून काढून नवीन छाप निर्माण करणे, वाटते तितके सोपे काम नाही. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचे निराकरण करणे ही तानवडेंची खासियत असायची. पंचायत, झेडपी, नगरपालिकांसारख्या स्थानिक निवडणुकांतही त्यांचा संचार असायचा.
२०२३साली झालेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीत भाजपची स्थिती म्हणावी तेवढी समाधानकारक नव्हती. काही नगरसेवकांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे लोक भाजपच्या विरोधात जाण्याच्या मार्गावर होते. पण तानवडे मैदानात उतरले. फोंड्याची विशेष माहिती नसूनसुद्धा त्यांनी किल्ला लढवला. त्यावेळी मी दैनिक ‘गोमन्तक’करता या निवडणुकीचे विश्लेषण करत होतो. इथेच माझी तानावडेंशी भेट झाली. भाजपचे काही माजी नगरसेवक ‘डेंजर झोन’मध्ये आहेत हे कळल्यावर त्यांनी त्या त्या प्रभागात जाऊन डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. एवढेच कशाला फोंडा व साखळी पालिका निवडणुकांबाबतची मुलाखत माझ्या घरी येऊन दिली.
भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी घरी येऊन मुलाखत देणे यातच त्यांचे वेगळेपण अधोरेखित होते. हाच फॉर्म्युला त्यांनी साखळीत वापरला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कर्नाटकात प्रचाराला गेल्यामुळे जबाबदारी तानवडेंवर पडली. आणि ती त्यांनी शंभर टक्के निभावली. त्यामुळे भाजपला नेहमी हुलकावणी देणारी साखळी पालिका यावेळी भाजपच्या पदरात पडू शकली. फोंडा पालिकेतही भाजपने देदीप्यमान यश मिळवले.
अगदी मुद्देसूद बोलणे, समोरच्यावर आपला प्रभाव टाकणे, दुसऱ्याला तेवढेच महत्त्व देणे, वेळ पडल्यास कठोर होणे या गुणांमुळेच तानावडे प्रभावी प्रदेशाध्यक्ष होऊ शकले. म्हणूनच ते भाजप कार्यकर्त्यांना आपलेसे वाटत होते. गेल्या पाच वर्षांत त्यांनी आपली अशी छाप सोडली ती याच गुणांमुळे.
प्रत्येक निवडणुकीत झोकून देण्याबरोबरच ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही वाढविताना दिसत असत. त्यामुळेच ते भाजप कार्यकर्त्यांत बरेच लोकप्रिय ठरले होते. आता याच पार्श्वभूमीवर दामूंना कार्य करायचे आहे. भाजपची कार्य करण्याची पद्धत ही नेहमीच वेगळी असते. नियोजन हा त्यांच्या कार्यप्रणालीचा आत्मा असतो.
अर्थात दामू या कार्यप्रणालीशी चांगलेच वाकबगार आहेत यात शंकाच नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुशीतून तयार झाल्यामुळे भाजपचे सर्व हातखंडे त्यांना चांगलेच ज्ञात आहेत. त्यात परत ते एक चांगले कलाकार असल्यामुळे परिस्थितीनुरूप कसे बदलायचे हेही चांगले ठाऊक आहे.
भाजप विरोधी पक्ष असताना दामूंनी पर्रीकरांएवढीच विधानसभा गाजवली होती हे विसरणे शक्यच नाही. पण दुर्दैवाने भाजप जेव्हा सत्तेवर आला तेव्हा दामू विधानसभेत नव्हते आणि त्यामुळे ते मंत्री होऊ शकले नाहीत, हेही तेवढेच खरे.
आता त्यांना गोव्यातील संपूर्ण भाजप पक्षावर नियंत्रण ठेवायचे आहे. दोन वर्षानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तानावडेनी लिहिलेल्या वस्तुपाठाचे पुढचे पान लिहायचे आहे. दामूंची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द व ‘लहानपण देगा देवा’ अशी असलेली मानसिकता पाहिल्यास त्यांना हे अवघड जाईल असे बिलकूल वाटत नाही. पण या अपेक्षांना प्रत्यक्षात येण्याकरता काही दिवस थांबावे लागणार आहे एवढे मात्र निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.