
सांस्कृतिक पर्यावरणीय संरचना एक अमूर्त त्रांगडे. दाखवता येत नाही. सांगताही येत नाही. पण सहन करायला हवे. अशी संकल्पना. समाजपुरुष, समाजमन, सामाजिक जाणिवा, नेणिवा व उणिवाही संपन्न करणारं अस काहीतरी. याआधी बरेचसे झालेय सांगून. विषय समापन करताना यातील काही घटक सापडणारी घटना घटिते. पाहिलेली नव्हेत. प्रत्यक्ष बघितलेला. अनुभवलेला. पाहणे आणि बघणे तसे एकाच अर्थाचे.पण रिसर्च आणि संशोधन एवढा मोठा फरक.
१. काळ तसा फार आधीचा नव्हे. विसाव्या शतकाची, साठीनंतरची दोन दशके. काही धारणा, प्रेरणा, अनुसाशन पाळणारा. सेक्युलरिजम, सर्वधर्मसमभाव असे बुळबुळीत झालेले शब्द वापरात नसले तरीही एकता, बंधुता पालन करणारा. काळ आणि समाज व्यवस्थेचे उद्बोधक दर्शन घडविणारा. (खरं तर माझ्या आयुष्यातील उमेदीचा कार्यकाल) एक पाटोवरची सरकारी वसाहत. संक्रांतीचे हळद-कुंकू. वाणे वाटायचीयत. शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगावा जायचा, यात सर्व जाती, धर्म, पंथ यांचा समावेश. ख्रिश्चन महिला कपाळाला हळदकुंकू लावून घेत. वाण हाती घेऊन त्या गृहिणीचा नमस्कारही स्वीकारीत. मुस्लीम महिला हळदकुंकू हातावर घेत तर कधी पालथ्या तळहातावर लावून घेत. कोण दलित, कोण पतित, कोण पावन याचा विचार तेथे नसायचाच.
२. कालापूरला ग्रामदेवतेची पालखी संचाराला निघायची. वाटेवरील धर्मभेद बाजूला सारलेली घराची अंगणे स्वच्छ व्हायची. घरात असेल तर लामणदिवा, नसलाच तर मेणबत्त्या व्हरांड्यात पेटायच्या. कधी अर्पण होत नारळ, केळी, फुले, उदबत्ती असेही काही. एखादे परधर्मीय घर, पताकाही लावायचे.
३. म्हाळशेची पालखी शिगमोत्सवात ढोल-ताशांच्या रौद्र संगीताचा घणघणाट करत. वेलींग गावात एका साकवाजवळील पेडावर स्थिरायची. फक्त तीन-चार मीटर आधी एक मशीद. छोटेखानी कौलारू घर असावे. साकवापलीकडे मुस्लीम वाडा. काही घरांची वसती. साकव ओलांडू न काही माणसे यायची. कधी देवीला काही अर्पण करायची. त्यांच्या चेहऱ्यावरील देव या शक्तीचे उमटलेले भक्तिभाव स्वच्छ, स्पष्ट टिपता यायचे.
४. फोंडा शहरातील पुराना दर्गा. तेथील पिराला शिगम्याचे निमंत्रण देण्यासाठी घुमट, शामेळ अशी सुवारी वाजवत जाणारे गावकरी. हे आमंत्रण स्वीकारून तेथील काजी दुसऱ्या दिवशी नारळ, फुले, उदबत्त्या घेऊन विठोबाच्या मंदिरात यायचा. आजही चालू असावे.
५. उसगावजवळील गांजे. हो, खरं सांगितलेले बरं. गांज संस्कृत शब्द. अर्थ व्यापार. हा एके काळचा व्यापार समृद्ध गाव. नौका हे त्या वेळचे व्यापाराचे प्रमुख साधन. म्हणून देवता तशी. नौकेवरील ग्रामदेवता-गांजेश्वरी. शिगम्यात संचाराला निघते. वाटेत एक पिराचा दर्गा. जवळपास एकच मुस्लीम वास्तू. पिराच्या उत्सवाला मात्र येत गोव्याच्या विविध भागातून विशेषतः वास्कोतून तो समाज. देवस्थानतर्फे पिराला हिरवी चादर चढवायची व या कुटुंबामार्फत देवीला ओटी अर्पण व्हायची. या गावात मशीद उभी राहिली अलीकडेच.
६. प्रियोळातील पंचमे येथे कर्माने योद्धे, जन्माने ब्राह्मण असलेल्या देसाईंचा मोठा वाडा. येथील अनंत चतुर्दशी व्रत-गणेशचतुर्थीनंतर येणारे, पूजनीय देवतेचे प्रतीक म्हणून असते. विशिष्ट वेणींचा चौदा गाठींचा रेषमी दोरा. प्रतिवर्षी दोरा बनवून देण्याचे काम म्हार्दोळ बाजारातील एका मुस्लीम कुटुंबाचे. फक्त नारळ, मागाहून काही रोख रक्कम देऊन दोरा आणला जायचा. आज माहिती नाही.
७. येथील मुस्लीम समाज शिगमोत भाग घेण्यासह संपूर्णतः स्थानीय संस्कृतीशी जुळवून घेतलेला, घेणारा असा होता. गणेशचतुर्थीतील सहभाग धरून.
८. तिसवाडीतील मिश्रधर्मीय वाडे तद्वत नव्या काबिजादीतील अनेक ठिकाणी ‘चवथी’त सहभाग घेणाऱ्यात अन्य धर्मीयही. यात ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ तोंडपाठ म्हणणारे कितीतरी. नमस्कार झडत नव्हता, पण पंचखाद्य वा मोदक भक्षण.
९. म्हार्दोळ वेलींगमधील हा समाज पूर्णतः गावकरी म्हणून वावरणारा. यांच्या लग्नात वधूच्या हाती हळकुंड येत. तर विवाहाआधी तेथील राखणदाराचा योग्य तो मानपान संबंधितांमार्फत होत असे.
१०. ‘रातीब’ नावाचा यांचा एक प्रकार. कला अकादमीने लोकसंगीतात दाखवलेला, म्हणे हे लोक विजापूरहून आलेले. कारण त्यांचे वसती स्थल नव्याने उपटणे झालेले. तिस्क-उसगाव.
११. बारा वांगड. बारा जण या आधीच देवस्वरूप झालेले. जुनी पुराणी व्यवस्था. विसाव्या शतकाच्या पंचविशीनंतर फार थोड्या ठिकाणी टिकून, तगून राहिलेली. यात बारा जातींचे प्रतिनिधी एकत्र.
१. भटजोयशी. २. सोनारशेठ. ३. वैष्यवाणी. ४. मेस्त- चारी ५. मटकार -गौंसाय. ६. महार -परवार. ७. भाट-देवळी. ८. म्हालो-न्हावी. ९.नाईक-भंडारी गावात राहणाऱ्या प्रमुख जमातींचा अंतर्भाव असलेली व्यवस्था. वांगडांनी एकत्र बसून गावातील सांस्कृतिक व सामाजिकही संबद्ध निर्णय घ्यायचा तो एकमतानेच. बहुमत तेथे अवैधानिक.
संस्कृतीचा मूलाधार. श्रद्धा, विश्वास आचरण आविष्करणातील गती-विधी- विधानांचे आचरण ते पोसलेले प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती अशा संकल्पना शब्दांनी. सामन्यतः अर्थ एक. रितीरिवाज हा शब्द तर पोर्तुगीज दप्तरातही घुसलेला. पोर्तुगालच्या तत्कालीन सुप्रीम कोर्टाने-रलासांव, रितीरिवाजांचे पालन करा असा आदेश निवाड्यात दिलेला.
प्रथा-परंपरा. अनामकालापासून चालत आलेल्या अलिखित रितीभाती. या बदलत असतात. देश, काल, परिस्थिती समाजपुरुषाचे चलन-वलन, आहार-विहार, आचार-विचार, यानुसार. परंतु त्यातील बीज घटक कायम राहतात. धरणी गर्भात खोलवर मुळे रुजवलेल्या वृक्षाप्रमाणे. आचरण, आविष्करण, रूप बदलले तरीही. आणि म्हणूनच त्या जिवंत आहेत. स्थिर झाल्या तर कधीच संपल्या असत्या. गोव्याची सांस्कृतिक अस्मिता मानल्या गेलेल्या घुमटाचे घोरपडीचे चांबडे हळूहळू दुसऱ्या प्रकारात परिवर्तित झाले. परिणामी गाज गेला, नाद आला. पण या वाद्याचे सांस्कृतिक स्थान कायम राहिले. ड्रम आला असता तर ते प्रदूषण.
प्रदूषणमुक्त संस्कृती म्हणजेच मानवजातीचा, समाज पुरुषाचा अभिव्यक्ती मंत्र. मंत्र विसरला गेला तर तंत्र तर नष्ट होतेच. पण समाज यंत्रवत होण्याचा मोठा धोका असतो. केवळ चिंतनीय नव्हे तर आचरणीय असावे. असे हे सूत्र. अलम् अति विस्तरेण.
विनायक खेडेकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.